पावसाळ्यात फोटोग्राफीसाठी ३ बेस्ट डेस्टिनेशन्स, इथे जाल तर 'स्वर्ग' पाहून याल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 12:37 PM2019-07-04T12:37:36+5:302019-07-04T12:37:41+5:30
पावसाळा म्हटलं की, जशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची क्रेझ असते, तशीच फोटोग्राफर्सना फोटोंची क्रेझ असते.
पावसाळ्यात भारतातील काही ठिकाणांचं सौंदर्य इतकं खुलतं की, जणू समोर दिसतंय ती एक कल्पना वाटावी. पावसाळा म्हटलं की, जशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची क्रेझ असते, तशीच फोटोग्राफर्सना फोटोंची क्रेझ असते. या दिवसात फोटोग्राफर्ससाठी एकापेक्षा एक सुंदर क्लिक्सची संधी मिळत असते. पण त्यासाठी योग्य ठिकाण निवडणंही महत्त्वाचं ठरतं. तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल आणि सोबतच फिरायचंही असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत.
फुलांची घाटी, उत्तराखंड
पावसाळ्यात निसर्ग किती परिवर्तन आणू शकतो याचा साक्षात अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इथे यायला हवं. पावसाळ्यात इथे चारशेपेक्षा जास्त प्रजातींचे फूल उमलतात. त्यामुळे फिरण्यासोबतच फोटोग्राफीचाही मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. फुलांवर प्रेम करणाऱ्यांसाठी हे ठिकाणा स्वर्गापेक्षा कमी नाही. पांढरे शुभ्र ढग, खळखळून वाहणारं पाणी त्यात निसर्गाचा सुंदर नजारा हे मनाला एक वेगळीच शांतता आणि आनंद देणारं चित्र असेल.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेलं हे ठिकाण राष्ट्रीय उद्यान आणि यूनेस्कोने संरक्षित केलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. तसेच पावसाळ्यात ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. इथे तुम्ही जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान एका वेगळ्याच विश्वाची सैर करू शकता.
यमथांग व्हॅली, सिक्कीम
तसं तर नॉर्थ इस्टमधील प्रत्येक ठिकाण हे सुंदर आहे. पण सिक्कीमच्या यमथांग व्हॅलीसारखा अनोखा नजारा दुसरीकडे बघायला मिळणार नाही. समुद्र सपाटीपासून हे ठिकाण ११ हजार ६९३ फूट उंचीवर आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुले बघू शकता. रोडोडेंड्रन फुलांच्या तुम्ही इथे कमीत कमी २४ प्रजाती बघू शकता. त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला जणू एखाद्या रोमॅंटिक सिनेमाच्या सेटवर आल्याचा भास होईल. या ठिकाणी तुम्ही फेब्रुवारी ते जून दरम्यान जाऊ शकता.
जोखू व्हॅली, नागालॅंड
(Image Credit : Lost With Purpose)
उंचच उंच हिरवे डोंगर, निळं आकाश आणि खळखळून वाहणारी नदी. या सगळ्यात जांभळ्या रंगांची जोखू लिलीची फुले हा नजारा मनाला वेगळाच आनंद देणारा ठरू शकतो. जोखू लिलीची फुले इथे केवळ पावसाळ्यात बघायला मिळतात. इथे पोहोचण्याचा रस्ता जरा कठीण आहे. पण 'स्वर्ग' कुठे सहज बघायला मिळतो का?
(Image Credit : Lost With Purpose)
साधारण तीन तासांची ट्रेकिंग केल्यावर तुम्हाला हे ठिकाण दिसायला लागतं. इथे पोहोचण्यासाठी मणिपूर किंवा नागालॅंडचा कोणताही मार्ग निवडू शकता.मणिपूरच्या माउंट इशू येथून तुम्ही इथे पोहोचू शकता. पण पहिल्यांदा जाणाऱ्यांसाठी नागालॅंडच्या विशेमामधून जाणार रस्ता अधिक सोयीस्कर ठरेल. इथे तुम्ही जून ते सप्टेंबर दरम्यान जाऊ शकता.