'मदर मार्केट' इथे फक्त महिला राज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:47 PM2017-12-14T18:47:58+5:302017-12-14T18:54:22+5:30
कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या मार्केटमध्ये हौसेनं खरेदीला जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या मदर मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.
अमृता कदम
महिलांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं-वाचलं आहे. त्याबद्दल ब-याच चर्चा, वाद-विवादही झालेले आहेत. पण भारतात एक जागा अशी आहे जिथे पुरूषांना प्रवेशबंदी आहे. इथे केवळ बायकांचेच राज्य चालते. पण हे मंदिर नाही तर मार्केट आहे. देशाच्या ईशान्येला वसलेल्या मणिपूरची राजधानी इम्फाळ इथे हे मार्केट आहे. खरंतर कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या माकेर्टमध्ये हौसेनं खरेदीला जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या या मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.
500 वर्षांचा इतिहास
मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये ‘मदर मार्केट’ या नावानं हा बाजार भरतो. थोडीथोडक्या नाही तर तब्बल 500 वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्णपणे महिलांचं हे मार्केट कसं अस्तित्वात आलं याची कहाणीही रंजक आहे. म्हणजे पुरूषांना इथे येऊ द्यायचं असा काही ठराव झालेला नव्हता. पण मणिपूरमध्ये बहुतांश पुरु ष हे देशाच्या रक्षणासाठी लष्करात भरती झालेले आहेत. देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीश आणि त्याहीआधी राजेरजवाड्यांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी ही महिलांवरच येऊन पडली. मार्केटमध्ये सातत्यानं महिलांचं वर्चस्व ठसत गेलं. त्यातून पुढे मग ‘फक्त महिला’ हा या मार्केटचा नियमच तयार झाला
आशियातला मोठा बाजार
‘मदर मार्केट’ हे आशियातल्या सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 5000 हून अधिक महिला एकाचवेळी बाजार भरवतात. या बाजारात मासे, भाजी, बांबू आणि धातूपासून बनवलेली विविध शिल्प आणि अन्य वस्तूंची विक्री होते. या मार्केटच्या माध्यमातून महिला दरमहा 50 हजारांपासून 2 लाख रूपयांची कमाई करत आहेत. हा बाजार म्हणजे केवळ खरेदीविक्रीचं केंद्र नव्हे तर महिलांसाठीचे प्रशिक्षण केंद्रही आहे. या बाजाराच्या माध्यमातून अनेक महिला काम करायला शिकल्या आहेत.
एका महाकाय भूकंपानंतर
2016 मध्ये इम्फाळमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला होता. या भूकंपात या मार्केटचं खूप मोठं नुकसान झालं. आजूबाजूच्या इमारती आणि घरांचं छप्पर या मार्केटवर कोसळलं होतं. या काळात तुटलेल्या रस्त्यांवरच दुकान लावून या महिलांनी आपली रोजीरोटी कमावली. पण हळूहळू या मार्केटची स्थिती पुन्हा सुधारत असून पुन्हा ते जुन्या रु पात सज्ज होताना दिसतंय.
त्यामुळे कधी नॉर्थ इस्टच्या सफरीवर गेलात आणि मणिपूरमध्ये राहण्याचा योग आलाच तर या अनोख्या मार्केटला भेट देण्याची संधी तुम्हाला नक्की मिळेल. अर्थात स्त्री असाल तर... हे यामध्ये ओघानं आलंच.