सोलो ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट आहे उत्तराखंडमधील 'रूपकुंड'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 11:42 AM2019-08-06T11:42:13+5:302019-08-06T11:46:17+5:30
पावसाळ्यामध्ये सोलो ट्रिप म्हणजेच, एकट्यानेच ट्रॅवलिंगची गंमत अनुभवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत.
(Image credit : Thrillophilia)
पावसाळ्यामध्ये सोलो ट्रिप म्हणजेच, एकट्यानेच ट्रॅवलिंगची गंमत अनुभवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. हे ठिकाण म्हणजे, निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि नयनरम्य दृश्यांची पर्वणीच. दूरदूरपर्यंत पसरलेली हिरवळ आणि डोंगररांगा, ट्रेकिंग आणि अॅडव्हेचर यांसारख्या मन प्रसन्न करू टाकणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येतील. त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी अजिबात वेळ वाया न घालवता अनेक गोष्टींचा आनंद लूटू शकता. उत्तराखंड म्हणजे, हिमालयाच्या कुशीत वसलेलं सुंदर ठिकाण. आज आम्ही तुम्हाला जे ठिकाण सांगणार आहोत, ते उत्तराखंडमधीलच आहे.
(Image credit : trekdestinations.com)
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये स्थित असलेलं रूपकुंड ट्रॅक. येथे दूरदूरपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल आहे. असं म्हटलं जातं की, ही जागा फार रहस्यमयी आहे. तसेच चौफेर पसरलेली हिरवळ आणि पर्वतरांगा या ठिकाणाला आणखी खास बनवतात. हे ठिकाण हिमालयाच्या दोन शिखरं त्रिशूल आणि नंदघुंगटीच्या तळाशी स्थित आहे. या जागेवर नेहमी ट्रेकिंग आणि अॅडव्हेचर्सची आवड असणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. येथे काही मंदिर आणि एक छोटासा तलावही आहे. जे या रूपकुंडचं सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त येथे वाहणारे झरेही अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
रूपकुंडला कंकाल झील असंही म्हणतात...
दरम्यान, रूपकुंडला कंकाल झील असंही म्हटलं जातं. यामागेही एक रोचक कथा दडलेली आहे. येथील स्नानिकांच्या सांगण्यानुसार, 1942मध्ये येथे 500हून अधिक मानवी सांगाडे आढळून आले होते. तेव्हापासूनच या तलावाला कंकाल झील म्हणजेच, सांगाड्यांचा तलाव असं म्हटलं जातं. ज्यावेळी या सांगाड्यांचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी असं समोर आलं की, हे मानवी सांगाडे 12व्या आणि 15व्या शतकातील लोकांचे आहेत. दरम्यान, रूपकुंड तलाव थंडीमध्ये पूर्णपणे गोठून जातो.
(Image credit : blog.weekendthrill.com)
कसे पोहोचाल?
रूपकुंडला जाण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हरिद्वारला पोहोचावं लागेल. त्यानंतर ऋषिकेश आणि तिथून देवप्रयागमार्गे श्रीनगर गढवाल. तिथून पुढे कर्मप्रयाग आणि थराली, देबाल, वांणबेदनी, बुग्याल त्यानंतर बुखुवाबासा. येथून तुम्ही केलू विनायकमार्गे जाऊन तुम्ही पोहोचाल रूपकुंडला. याशिवाय तुम्ही काठगोदाम मार्गेही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता.
दरम्यान, तुम्ही फक्त रूपकुंडला जाण्याऐवजी व्यवस्थित ट्रिप प्लॅन करून रूपकुंडसोबतच इतरही अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.