आसामची टूर प्लॅन करत असाल तर ही दहा ठिकाणं नक्की पाहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:25 PM2017-11-22T16:25:41+5:302017-11-22T16:33:43+5:30
आसाम म्हटलं की काझीरंगा अभयारण्य एवढंच नाव आपल्याला आठवतं. पण त्यापलिकडेही आसाममध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे. आसाममधील दहा ठिकाणं चुकवू नये अशीच आहे.
अमृता कदम
आसाम राज्याच्या पर्यटन विभागाची जाहिरात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा या जाहिरातीत आसामची सदिच्छादूत म्हणून झळकतीये. आसाम म्हटलं की काझीरंगा अभयारण्य एवढंच नाव आपल्याला आठवतं. पण त्यापलिकडेही आसाममध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. या जाहिरातीतून आसामच्या निसर्गसौंदर्याचं, तिथल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. या राज्यात फिरायला गेल्यावर खरोखर खूप काही पाहायला मिळू शकतं. आसामची टूर प्लॅन करत असाल तर पुढील ठिकाणं त्यात अवश्य समाविष्ट करून घ्या.
गुवाहाटी
ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर वसलेलं हे शहर आसामची राजधानी आहे. पण राजधानीच्या शहरासारखा गजबजाटी फील इथे येत नाही. इथल्या मंदिरांमुळे या शहरामध्ये आध्यात्मिक आनंदाची एक वेगळीच अनुभूती येते. इथलं कामाख्या मंदिर सर्वांत प्रसिद्ध आहे. त्याशिवाय गुवाहाटीमधलं नवग्रह मंदिर, उमानन्दा मंदिरही पाहण्यासारखं आहे.
जोरहाट
जोरहाट हे सुद्धा आसामच्या प्रमुख शहरांपैकी एक आहे. भोगदाई नदीच्या काठावर वसलेल्या जोरहाटमधली बाजारपेठ प्रसिद्ध आहे. इथे चौकीहाट आणि माचरहाट नावाचे दोन बाजार आहेत. जोरहाटमध्येच वैष्णव धर्माशी संबंधित अनेक मठही आहेत. इथल्या माजौलीमध्ये औनिआती, दक्षिणपथ, गारामूर आणि कमलाबाडी ही वैष्णव धर्माची तीर्थस्थानं आहेत.
तेजपूर
तेजपूरमध्येही अनेक ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतात. अग्निगढ, कोलिया भोमोरा सेतू, पद्म पुखुरी, महाभैरव मंदिर, हलेश्वर मंदिर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. हे शहर आहेही अतिशय शांत.
दिग्बोई
दिग्बोई हे शहर छोटं आहे पण इथेही पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. 19व्या शतकाच्या शेवटी इथे खनिज तेल सापडलं आणि दिग्बोई भारताच्या नकाशावर ठळकपणे सामोरं आलं. त्यानंतर आसामची तेलभूमी म्हणूनच हा प्रदेश प्रसिद्ध आहे. त्याशिवाय नामेरी राष्ट्रीय उद्यान, बुरा-चापोरी वन्यजीव अभयारण्य, नागशंकर मंदिर आणि केतकेश्वर मंदिरही फिरण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाणं आहेत.
दिफू
दिफूमध्ये तुम्ही दोन दिवस आरामात घालवू शकता. इथलं बॉटनिकल गार्डन, म्युझियम, अर्बोरेटम, तरलांगो सांस्कृतिक केंद्र पाहण्यामध्ये तुमचा वेळ आरामात निघून जाईल. त्यामुळे आसाम फिरायला येणारे पर्यटक दिफूला भेट द्यायला विसरत नाहीत.
हाजो
इथे तुम्हाला बौद्ध, हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा एक अनोखा मेळ पाहायला मिळतो. हयग्रीव माधव मंदिर, केदारेश्वर मंदिर, धोपारगुरी सत्रा, जॉय दुर्गा मंदिर, गणेश मंदिर ही हिंदू धर्माशी संबंधित स्थळं आहेतच. शिवाय पोवा मशिद आंओ िबौद्ध विहारही आहेत.
गोलाघाट
नुसतं हे नाव वाचून तुमच्या काही लक्षात येणार नाही. पण याच शहरात काझीरंगा अभयारण्य आहे हे समजल्यावर तुम्हाला या शहराचं महत्त्व लक्षात येईल. हे अभयारण्य युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. एकशिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा प्रसिद्ध आहे. एकशिंगी गेंड्यांशिवाय इथे हत्ती, रानगवे, हरणांच्या वेगवेगळ्या जाती आणि वाघही पाहायला मिळतात. इथे अनेक स्थलांतरित पक्षीही येतात.
सिलचर
आसामची ओळख असलेल्या चहाच्या बागा सिलचरच्या परिसरात पाहायला मिळतात. डोंगर उतारावरच्या चहाच्या हिरव्यागार मळ्यांशिवाय इथे रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली भातांची शेतंही दिसतात. डोळ्यांना सुखावणारी ही हिरवाई आणि मंदिरं यामुळे इथे पर्यटक आवर्जून येतात.
दिब्रूगढ
दिब्रूगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर बसून शांतपणे सूर्यास्त पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याशिवाय इथे दनिजोय सतरा, दहिंग सतरा आणि कोलिआई स्थान सारखी प्राचीन स्थळंही आहेत.
शिवसागर
दिखो नदीच्या किना-यावरच हे टुमदार गाव इथल्या प्राचीन शिवसागर तलावामुळेच ओळखलं जातं. या तलावाला लागूनच शिवडोल, विष्णुडोल आणि देवीडोल ही प्राचीन मंदिरं आहेत.
या ठिकाणांशिवाय आसामचं प्रसिद्ध बिहू नृत्य, आसामचं रेशीम आणि त्यांच्या पारंपरिक साड्या या गोष्टीही आसामच्या पर्यटनाचा एक खास भाग आहेत.