मादाम तुसॉं बघायचंय मग लंडनचं तिकिट नको आपल्या दिल्लीचं बुक करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:57 PM2017-12-15T17:57:00+5:302017-12-15T18:06:22+5:30
लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवरच हे म्युझियम दिल्लीत सुरु झालंय. याआधी हे म्युझियम केवळ शनिवार आणि रविवारीच पाहता यायचं. आता त्याचं अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मात्र पर्यटकांना ही सफर नेहमी करता येणार आहे. दिल्लीत आल्यावर या म्युझियमला भेट द्यायचं प्लॅनिंग करणार असाल तर त्या या संग्रहालयाविषयीची थोडीफार माहिती असायलाच हवी.
- अमृता कदम
मादाम तुसाँ या जगप्रसिद्ध संग्रहालयाचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. जगातल्या अनेक नामांकित व्यक्तींचे मेणाचे हुबेहुब पुतळे या ठिकाणी साकारलेले आहेत. चेहरे आणि मुखवट्यांचा हा अस्सल अनुभव आपल्याला थक्क करु न जातो. पण आता त्यासाठी अगदी लंडन, अमेरिकेपर्यंत जायची गरज नाही. कारण देशाची राजधानी दिल्लीत आता ‘मादाम तुसाँ म्युझियम सुरु झालं आहे. 1 डिसेंबरपासून या म्युझियमचं अधिकृत उद्घाटन झालं आहे.
लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवरच हे म्युझियम दिल्लीत सुरु झालंय. याआधी हे म्युझियम केवळ शनिवार आणि रविवारीच पाहता यायचं. आता त्याचं अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मात्र पर्यटकांना ही सफर नेहमी करता येणार आहे. दिल्लीत आल्यावर या म्युझियमला भेट द्यायचं प्लॅनिंग करणार असाल तर त्या या संग्रहालयाविषयीची थोडीफार माहिती असायलाच हवी.
भारतातल्या विविध क्षेत्रातल्या सेलिब्रेटींचे पुतळे या ठिकाणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऋतिक रोशन, माधुरी दीक्षित, कपिल देव, सचिन तेंडुलकर, आशा भोसले आणि मिल्खा सिंह यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे.
भारतीय सेलिब्रिटींसोबतच काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचे पुतळेही दिल्लीतल्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील. हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रो, अँजेलिना जोली, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि डेव्हिड बॅकहेम यांच्यासह अनेक स्टार सेलिब्रेटींचे पुतळे याठिकाणी आहेत. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये जुन्या रिगल थिएटरच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात आलंय. या संग्रहालयाला हेरिटेज, पार्टी, म्युझिक आणि स्पोर्टस अशा वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आलंय.
तिकिटाचं काय?
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 960रु पये तर लहान मुलांसाठी 760 रु पये असं या संग्रहालयाचं तिकीट असणार आहे. या म्युझियमचं तिकीट आॅनलाइन बुक केलंत तर त्यावर 100 रु पयांची सूटही तुम्हाला मिळणार आहे. शिवाय तुम्हाला अॅडव्हान्स बुकिंग करण्याची संधीही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. फॅमिली आणि ग्रूप तिकीटांमध्ये तुम्हाला काही सवलतही मिळू शकते. फक्त एक लक्षात ठेवा की दिल्लीतल्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये दिवसाला चारशेच लोक भेट देऊ शकतील अशी मर्यादा ठेवण्यात आलीय. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 7.30 वाजेपर्यंत हे म्युझियम सुरु राहणार आहे. दिल्लीतल्या राजीव चौक मेट्रो स्टेशनपासून अगदी पायी चालत जाऊ शकाल इतक्या अंतरावर हे म्युझियम आहे.
दिल्लीत संसद, राष्ट्रपती भवन, राजपथ या दिल्लीमधल्या आकर्षणांसोबतच लाल किल्ला,कुतूबमिनार, हुमायूनचा मकबरा अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी अनेक गोष्टींसाठी पर्यटक येत असतात. या यादीत मादाम तुसाँ संग्रहालयाच्या निमित्तानं आता नव्या आकर्षणकेंद्राची भर पडलीय.