या पाच देशात फिरा, बक्कळ खरेदी करा पण पैशाची चिंता अजिबात नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:00 PM2018-01-13T17:00:33+5:302018-01-13T17:09:13+5:30
आपल्या चलनाचं मूल्य किती कमी आहे असा निराशाजनक विचार तुमच्या मनात सारखा येत असेल तर तुम्ही अशा देशांबद्दल जाणून घेतलंच पाहिजे, जिथे भारतीय चलनाला चांगली प्रतिष्ठा आहे. या देशांमध्ये भारतीय रूपया अगदी खणखणीत चालतो. इंडोनेशिया, आयर्लण्ड, कंबोडिया, व्हिएतनाम आणि नेपाळ या देशांची माहिती म्हणूनच हवी!
- अमृता कदम
कितीही पैसे कमावले तरी माणसाच्या गरजा इतक्या असतात की ते कमीच वाटत राहतात. त्यातही आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत घसरत असल्यानं आपल्याला गरीबीचं फीलिंग येत असतं. आपल्या चलनाचं मूल्य किती कमी आहे असा निराशाजनक विचार तुमच्या मनात सारखा येत असेल तर तुम्ही अशा देशांबद्दल जाणून घेतलंच पाहिजे, जिथे भारतीय चलनाला चांगली प्रतिष्ठा आहे. या देशांमध्ये भारतीय रूपया अगदी खणखणीत चालतो.
इंडोनेशिया
स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि गर्द हिरवाई हे इंडोनेशियातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र असतं. याशिवाय टोबा तलाव, बालियम पर्वतरांगा, माऊंट ब्रोमो, कोमोडो नॅशनल पार्कसारखी स्थळं पर्यटकांना खुणावत असतात. भारतीय रूपया इथे किती जोरात चालतो याची कल्पना तुम्हाला दोन्ही देशांतल्या चलनाची तुलना केल्यावर येईल. इंडोनेशियाचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रु पयाची किंमत इंडोनेशियातल्या 208 रूपयांइतकी आहे.
आयर्लण्ड
युरोपमधल्या आयर्लण्डमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. इथल्या स्वार्तीफोस, ब्रिडाविक बीच, आस्कजा, स्कोगाफोस, ब्लू लगून सारख्या ठिकाणांवर तुम्हाला अगदी स्वर्ग धरतीवर अवतरल्याचा अनुभव येईल. क्रोना हे आयर्लण्डचं चलन आहे. त्याच्याशी तुलना केली तर भारताच्या एका रूपयाची किंमत क्रोनामध्ये 1.60 रु पये इतकी होते.
कंबोडिया
या देशात गेल्यावर तुम्हाला कदाचित भारताची फारशी आठवण येणार नाही. कारण आपल्या देशासारखीच कंबोडियामध्ये अनेक मोठी-मोठी मंदिरं आहेत. जगातलं विष्णुचं सर्वांत मोठं मंदिरही कंबोडियामध्येच आहे. याशिवाय अंकोर वट, क्राती, कोहरोंग सारखी ठिकाणं आकर्षणाचं केंद्र आहेत. राईल हे कंबोडियाचं चलन आहे. एका भारतीय रूपयाची किंमत कंबोडियन राइलमध्ये 62.19 रूपये इतकी होते.
व्हिएतनाम
कम्युनिस्ट चीनचा प्रभाव असलेला व्हिएतनाम. इथे राजधानी हनोई, ला लोंगची खाडी, वॉटर पपेट (पाण्याच्या अद्भुत बाहुल्या) पॅराडाईजच्या गुहा, व्हिएतनामी म्युझियम अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. डोंग हे व्हिएतनामचं चलन आहे. व्हिएतनामी डोंगमध्ये एका भारतीय रूपयाची किंमत 349 रु पये इतकी होते.
नेपाळ
नेपाळ हे आपलं एक महत्वाचं शेजारी राष्ट्र आहे. नेपाळमध्ये फिरताना तुम्हाला भारतीय संस्कृतीशी मिळत्याजुळत्या अशा अनेक गोष्टी दिसतील. नेपाळमध्ये बाबर महल, पुजारी मठ, गोरखा मेमोरियल म्युझियम, पाटन म्युझियम, चितवन नॅशनल पार्कसारख्या अनेक ठिकाणी भारतीय पर्यटकांची गर्दी असते. नेपाळचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रूपयाची किंमत नेपाळमधल्या रूपयात 1.60 रु पये इतकी होते.
पर्यटनाची जी अनेक कारणं असतात, त्यात शॉपिंगचाही समावेश होतो. नव्या ठिकाणी, त्यातही नव्या देशात गेल्यावर आपल्याला तिथून काहीतरी खरेदी करावंसं वाटत असतंच. पण अनेकदा खिशाला कात्री लागेल या भीतीनं आपण परदेशात सावध असतो. पण वर नमूद केलेल्या देशांत मात्र तुम्हाला ही चिंता फारशी करावी लागणार नाही. तेव्हा या देशात गेलात तर अगदी बिनधास्त शॉपिंग करु न या.