आता अभयारण्यं पर्यटनासाठी खुली होतील. पण जंगल सफारीला जाताना या दहा गोष्टी विसरू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:49 PM2017-09-18T18:49:55+5:302017-09-18T19:29:14+5:30

वाइल्ड लाइफ सफारीमध्ये आनंदाबरोबरच तुमची सुरक्षितता आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचं संवर्धनही महत्त्वाचं आहे.त्यामुळे जंगल सफारीला जाताना काही नियम पाळणं गरजेचं असतं.

Now the sanctuary will be open for tourism. But do not forget these ten things. | आता अभयारण्यं पर्यटनासाठी खुली होतील. पण जंगल सफारीला जाताना या दहा गोष्टी विसरू नका !

आता अभयारण्यं पर्यटनासाठी खुली होतील. पण जंगल सफारीला जाताना या दहा गोष्टी विसरू नका !

ठळक मुद्दे* जंगल सफारीच्या वेळेस स्ट्राँग वासाचा परफ्यूम, डिओडरन्ट मारु नका* जंगलात फोटोग्राफी करताना फ्लॅशचा वापर करायचा नसतो.* सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणी तुमच्या हिशोबानं चालत नाहीत. त्यांची ‘दिनचर्या’ ही आपल्यासारखी घड्याळाच्या काट्याशी बांधलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दाट जंगलातून बाहेर येण्याच्या ठराविक वेळाच असतात.

 

- अमृता कदम



पावसाळ्याचे चार महिने बंद असलेली अभयारण्य आणि नॅशनल पार्क पर्यटकांसाठी खुले व्हायला लागतील. तीन-चार दिवसांच्या सुटीमध्ये ट्रीप प्लॅन करायची असेल तर आता जंगल सफारीचा आॅप्शनही तुमच्याकडे असेल. पण जंगलामध्ये फिरायला जाताना तुमचा पोशाख कसा असेल इथपासून तुम्ही काय नियम पाळले पाहिजेत याची माहिती असणंही गरजेचं आहे. कारण वाइल्ड लाइफ सफारीमध्ये आनंदाबरोबरच तुमची सुरक्षितता आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचं संवर्धनही महत्त्वाचं आहे.
 

 

जंगली सफारीचे नियम

1. जंगल सफारीसाठी जाताना रंगीबिरंगी कपडे घेऊ नयेत. आजूबाजूच्या गोष्टींशी मेळ साधतील असे कपडे असावेत. आॅलिव्ह ग्रीन, करडा, तपकिरी रंगाच्या छटा वापराव्यात. कपडे सुटसुटीत असावेत. पायघोळ, तंग कपडे घालू नयेत.

2. जनावरांची वास घेण्याची क्षमता तीव्र असते. त्यामुळे जंगल सफारीच्या वेळेस स्ट्राँग वासाचा परफ्यूम, डिओडरन्ट मारु नका.

3. जंगलात फिरायला जाताना शांतता खूप महत्त्वाची आहे. आरडाओरडा, गप्पा-गाणी यामुळे जनावरं बुजू शकतात, बाहेर येत नाहीत. त्यामुळे जंगलाची शांतता अनुभवा आणि प्राण्यांनाही पाहण्याचा आनंद घ्या.

 

 

4. वाईल्ड लाइफ सफारीच्या वेळेस जास्त धाडस दाखवण्याची किंबहुना ‘हिरोगिरी’ करण्याची गरज नसते. प्राणी समोर दिसल्यावर फोटो काढण्यासाठी जीपमधून खाली उतरण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. असं धाडस जीवावर बेतू शकतं. बहुतांश अभयारण्यात तशा सूचनाही दिलेल्या असतात. या सूचना टाळण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात.

5. जंगल सफारीच्या वेळेस कचरा करु नका. चॉकलेट, वेफर्स खाऊन त्याचे रॅपर्स इकडे-तिकडे टाकणं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकणं अशा गोष्टी करु नका. जंगलांच्या स्वच्छतेची सोय निसर्गानेच केलीये आणि त्यात प्लॅस्टिक, टीनच्या कच-यासाठी जागा नाहीये.

6. तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल आणि तुम्हाला मस्तपैकी फोटो टूर प्लॅन करायची असेल तर तिथल्या स्थानिक गाइडशी संपर्क साधा. ते तुम्हाला तशा टूर्स आयोजित करु न देतील. काही संस्थासुद्धा वाइल्ड लाइफ फोटो टूर अरेन्ज करून देतात.

7. जंगलात फोटोग्राफी करताना फ्लॅशचा वापर करायचा नसतो. फ्लॅश लाइटमुळे जनावरं बुजतात. त्यामुळे चांगले फोटो घेण्यासाठी काही वेगळे प्रयोग करा.

8. सफारीला जाण्याआधी तिथली योग्य माहिती करून घ्या. सफारी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यापासून सुरु होत असल्या तरी प्राणी, स्थलांतरित पक्षी पहायचे असतील तर नेमका काळ कोणता याची माहिती असलेली चांगली. म्हणजे तिथे गेल्यावर तुमची निराशा होत नाही.

9. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणी तुमच्या हिशोबानं चालत नाहीत. त्यांची ‘दिनचर्या’ ही आपल्यासारखी घड्याळाच्या काट्याशी बांधलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दाट जंगलातून बाहेर येण्याच्या ठराविक वेळाच असतात. एरवी ते बाहेर दिसतीलच असं नाही. त्यामुळे त्यांना बळजबरीनं बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवणं, आवाज करणं असले प्रकार करणं योग्य नसून ते कदाचित अंगलट येण्याचीच शक्यता जास्त असते.

10. लक्षात ठेवा, तुम्ही प्राण्यांच्या ‘घरी’ जात आहात. त्यामुळे त्यांच्या हिशोबानं चालणंच तुम्हाला भाग आहे. म्हणून स्वत:वर थोडीशी बंधन घालून जंगलाचा आनंद लुटा.



 

 

Web Title: Now the sanctuary will be open for tourism. But do not forget these ten things.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.