भारतातल्या मंदिरांचं वैभव अनुभवायचं असेल तर ओडिशाला जायलाच हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:28 PM2017-08-18T18:28:00+5:302017-08-18T18:42:17+5:30

भारताच्या पूर्व किनाºयावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.

Odisha gives you chance to experience prosperity of architecture of temple | भारतातल्या मंदिरांचं वैभव अनुभवायचं असेल तर ओडिशाला जायलाच हवं!

भारतातल्या मंदिरांचं वैभव अनुभवायचं असेल तर ओडिशाला जायलाच हवं!

googlenewsNext
ठळक मुद्दे* परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे.* लिंगराज मंदिर हे ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे.* केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. इथल्या उदियगरी आणि खंदिगरी गुंफा प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.



- अमृता कदम


आपण जेव्हा फिरायला जाण्याचा बेत करतो तेव्हा फार कमीजणं असतील जे आवर्जून ओडिशाला जाण्याचा विचार करत असतील. पर्यटनाच्या नकाशावर अजूनही फारसं ठळक झालं नसल्यानं इथे नेमकं पहायचं काय असा प्रश्नही पडू शकतो. पण भारताच्या पूर्व किना-यावर वसलेलं हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.
असं म्हणतात की सातव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान या शहरामध्ये तब्बल 7000 मंदिरं होती. आज मात्र इथे अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच मंदिरं आहेत.
परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे. मंदिरासमोर विशाल प्रांगण आहे. प्रवेशद्वारावर आठ ग्रह कोरलेले आहेत. नंतरच्या काळात या मालिकेत नववा ग्रहही आला.


 

मुक्तेश्वर मंदिर

या मंदिराची उभारणी दहाव्या शतकात करण्यात आली. इथल्या भिंतींवर देवी-देवतांच्या चित्रांसोबतच धर्मग्रंथातले प्रसंग आणि मंदिरातलं दैनंदिन धार्मिक कार्य यासंबंधीची चित्रंही कोरली आहेत. या मंदिराची रचना कलिंग स्थापत्यशैलीमधली आहे.
इथल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या काळातली ही मंदिरं वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचं दर्शन आपल्याला घडवतात. इतिहास आणि वास्तुशास्त्राचे जाणकार नसाल तरी या मंदिरांचं स्थापत्य तुमचं मन आकर्षून घेतात.
भुवनेश्वरमधलं अजून एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे कोटीतीर्थेश्वर मंदिर.

 

 

लिंगराज मंदिर

हे ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिराच्या कळसाची उंची तब्बल 55 मीटर एवढी आहे. यावरूनच इथल्या मंदिरांच्या भव्यतेची कल्पना यावी. सध्या आपण जे मंदिर पाहतो, ते अकराव्या शतकातलं आहे. पण मूळ मंदिराच्या उभारणीची सुरूवात ही सहाव्या शतकात झाली. काही संस्कृत ग्रंथातील उल्लेखानुसार ती सातव्या शतकात झाली. कलिंग शैलीतलं हे मंदिर एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.
इथल्या मंदिरांसोबतच जोडलं गेलेलं पवित्र नाव म्हणजे बिंदुसागर तलावाचं. या तलावाशी अनेक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. तहानलेल्या पार्वतीला पाणी प्यायला मिळावं म्हणून शंकराने जमिनीत त्रिशूळ मारला आणि तिथे एक झरा उत्पन्न झाला. या झ-यातूनच बिंदुसागर तलावाची निर्मिती झाली.
या झ-याच्या जवळच अनंत वासुदेव मंदिर आहे. भगवान विष्णुचं हे मंदिर 13 व्या शतकात गंग राजघराण्यातल्या राणी चंद्रिकाने बांधलं. या मंदिराचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केला. मंदिर विष्णुचं असलं तरी त्याचं स्थापत्य हे बरंचसं लिंगराज मंदिरासारखंच आहे.

 

अनंत वासुदेव मंदिरामध्ये बनणा-या प्रसादाचंही खास वैशिष्ट्य आहे. मातीच्या भांड्यांमध्ये बनवल्या जाणा-या या प्रसादामध्ये बटाटा किंवा इतर कोणतीही परदेशी भाजी वापरली जात नाही. इतकंच नाही तर त्या त्या मौसमात न पिकणा-या भाज्याही इथल्या प्रसादात वापरत नाहीत. म्हणजे इथला प्रसाद बनवणं किती अवघड काम आहे, याचा विचार करा. केवळ अनंत वासुदेवच नाही, तर ओडिशातल्या अनेक मंदिरात ही पद्धत आहे.
केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. इथल्या उदियगरी आणि खंदिगरी गुंफा प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.
ही फक्त भुवनेश्वरमधली मंदिरं आहेत. ओडिशाचा विचार केला तर पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेलं कोणार्कचं सूर्यमंदिरही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
एकूणच ओडिशा किंवा भुवनेश्वरची तुमची ट्रीप ही केवळ धार्मिक पर्यटन नसेल तर समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा समजून घेण्याचाही एक प्रयत्नही असेल
त्यामुळे पुढच्या वेळेस ट्रीप प्लॅन करताना ओडिशाचा विचार आवर्जून करा.

Web Title: Odisha gives you chance to experience prosperity of architecture of temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.