थंडीमध्ये फिरायला जाण्यासाठी खास ऑफबीट डेस्टिनेशन्स, यादगार ट्रीपसाठी इथे द्या भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:36 PM2023-11-06T15:36:50+5:302023-11-06T15:38:46+5:30
Offbeat places : अनेकांना हिवाळ्यात ऑफबीट डेस्टिनेशनला फिरायला जायचं असतं. अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Offbeat places : थंडी वाढायला सुरूवात झाली की, लोक थंडीचा आनंद घेण्यासाठी कुठेना कुठे फिरायला जाण्याचा प्लान करतात. कारण थंडीच्या दिवसात फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते. लोक गुलाबी थंडीत वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करतात. पण अनेकांना हिवाळ्यात ऑफबीट डेस्टिनेशनला फिरायला जायचं असतं. अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आरु व्हॅली, काश्मीर
हिवाळ्याचा विषय निघतो आणि त्यात बर्फात खेळण्याचा उल्लेख होत नाही, असं तर होऊ शकत नाही. पण बर्फात खेळण्यासाठी तुम्हाला यूरोपलाच जाण्याची गरज नाही. काश्मीरमध्ये असे अनेक डेस्टिनेशन्स आहेत, जिथे तुम्ही कधीही एन्जॉय न केलेल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. पहलगाममध्ये जेव्हा स्नोफॉल होतो, तेव्हा जगभरातील पर्यटक इथे गर्दी करतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीवर स्नोबूट घालून बर्फाचे गोळे खेळण्याचा आनंद काही औरच. अशातही तुम्ही वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर तुम्ही पहलगामपासून केवळ १२ किमी दूर असलेल्या पाइन फॉरेस्टच्या मधोमध असलेल्या आरु व्हॅलीला भेट देऊ शकता. उंचच उचं देवदारची झाडे आणि सगळीकडे बर्फाची चादर हे दृश्य फारच मनोहारी असेल. या व्हॅलीमध्ये जम्मू अॅन्ड काश्मीर टुरिजमचे सुंदर कॉटेजही तयार केले आहेत. या कॉटेजमध्ये राहून तुम्ही सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. या जंगलात तुम्हाला फ्रोजन वॉटरफॉलही बघायला मिळू शकतो.
तातपानी, हिमाचल प्रदेश
हिवाळ्यात हिमाचल प्रदेशचा नजारा काही औरच असतो. हिमाचलमध्ये निसर्गाने अशी काही कमाल करुन ठेवली आहे की, तुम्ही इतक्या थंडीतही गरम पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये आंघोळ करण्यासाठी उडी माराल. शिमलापासून ५६ किमी आणि कालकापासून ११० किमी अंतरावर एक छोटं ठिकाण आहे. या ठिकाणाला तातापानी म्हणतात. हे गरम पाण्याचे स्त्रोत मेडिशनल व्हॅल्यूजसाठी आहेत. हे ठिकाण आपल्या वेगळ्या वातावरणामुळे उत्तर भारतात वेलनेस हॉलिडेसाठी एक चांगला पर्याय म्हणून समोर आलं आहे. त्यामुळे आता आयुर्वेद आणि पंचकर्मासाठी केरळला जाण्याची गरज नाही. इथे आंघोळ करुन अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते असे म्हटले जाते. त्यामुळे लोक दूरदूरुन इथे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठ येतात.
तीर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश
द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या आजूबाजूला अनेक सुंदर डोंगर आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करु शकता. अशीच एक व्हॅली तीर्थन व्हॅली आहे. हे ठिकाण तीर्थन नदीच्या किनारी आहे. इथे काही दिवस राहून तुम्ही हिमाचल प्रदेशच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. स्थानिक लोकांनी इथे पर्यटकांसाठी कॉटेज तयार केले आहेत. या लोकांकडूनच जंगलाच्या मधोमध कोणत्याही मोठ्या हॉटेलप्रमाणे सुविधा दिल्या जातात. हे कॉटेज पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. तसेच इथे तुम्ही मोकळ्या आकाशाखालीही कॅम्प लावून राहू शकता. हे कॅम्प आधुनिक सुविधा असलेले असतील. यासोबतच तीर्थन व्हॅलीमध्ये तुम्ही ट्रॅकिंगचाही भरपूर आनंद घेऊ शकता. तसेच नदीमध्ये तुम्ही फिशिंगचाही आनंद घेऊ शकता.