'ही' नगरी आहे देशातील दुसरी अयोध्या, सुरु आहे रामनवमीची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:55 PM2022-04-07T19:55:27+5:302022-04-07T20:00:01+5:30

ओरछा या गावाला देशातील दुसरी अयोध्या म्हणूनच ओळखले जाते. या गावाचा इतिहास फार प्रसिद्ध आहे. भव्य मंदिरे, अनेक किल्ले असलेले हे गाव बुंदेल राजांच्या पराक्रमाचा इतिहास उराशी बाळगून आहे.

oraccha is famous as second Ayodhya in India | 'ही' नगरी आहे देशातील दुसरी अयोध्या, सुरु आहे रामनवमीची जय्यत तयारी

'ही' नगरी आहे देशातील दुसरी अयोध्या, सुरु आहे रामनवमीची जय्यत तयारी

Next

सध्या देशभरात चैत्र मास साजरा होत असून या महिन्यातच प्रभू रामचंद्र जन्मास आले होते. त्यामुळे रामनवमी साजरी करण्यास सारे रामभक्त आता सिद्ध झाले आहेत. अयोध्येत राममंदिराचे काम प्रगतीपथावर आहेच. पण मध्यप्रदेशातील ओरछा येथेही मोठ्या प्रमाणावर उत्सवाची तयारी सुरु आहे. ओरछा या गावाला देशातील दुसरी अयोध्या म्हणूनच ओळखले जाते. या गावाचा इतिहास फार प्रसिद्ध आहे. भव्य मंदिरे, अनेक किल्ले असलेले हे गाव बुंदेल राजांच्या पराक्रमाचा इतिहास उराशी बाळगून आहे.

ओरछा आता लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे. झांशी पासून १६ किमी वर हिरवाई आणि पहाडांच्या कुशीत वसलेले हे गाव एके काळी बुंदेलखंडची राजधानी होती. गावात प्रवेश करताच प्राचीन वास्तूकला आणि त्यांचे सौंदर्य अनुभवता येते. राम येथे बालरूपात विराजमान आहेत अशी श्रद्धा असून राम दिवसा ओरछा येथे वास्तव्य करतात आणि रात्री अयोध्येला जातात असा भाविकांचा विश्वास आहे.

परिहार शासनकाळानंतर येथे चंदेल आणि बुंदेल राजपरिवाराचे राज्य होते. त्यातील बुंदेल काळात या नगरीला तिचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाले. राजा रुद्रप्रताप यांनी १५३१ मध्ये नव्याने शहर रचना केली. त्यात अनेक मंदिरे, महाल, किल्ले बांधले गेले. सम्राट अकबराच्या काळात येथे मधुकर शाह सत्तेत होता. रुद्रप्रताप यांनी बांधलेल्या किल्ल्यात नंतर वेळोवेळी नवी बांधकामे केली गेली. जहांगीर महाल त्यात फारच खास असून सुंदर पायऱ्या आणि गेटसाठी तो प्रसिद्ध आहे. यात मुघल आणि बुंदेल प्रतीके दिसून येतात. बेनावा नदीच्या कांचन घाटावर बुंदेल राजांच्या अनेक छत्र्या म्हणजे स्मारके आहेत.

ओरछा मध्ये सर्वात महत्वाचा आहे तो महाल म्हणजे रामराजा मंदिर. असे सांगतात कि येथे रामाचे मंदिर उभारायचे होते त्यासाठी अयोध्येतून मूर्ती आणून एका महालात स्थापन केली गेली आणि मंदिराचे काम सुरु केले गेले. पण नंतर मंदिरात मूर्ती नेण्याऐवजी या महालाचेच मंदिर केले गेले. देशात हे एकमेव असे ठिकाण आहे जेथे श्रीराम ‘राजा राम’म्हणून पुजला जातो.

Web Title: oraccha is famous as second Ayodhya in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.