पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:33 AM2023-02-03T11:33:53+5:302023-02-03T11:34:50+5:30
हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे
कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरातील अनेक देशातील पर्यटनस्थळे उघडण्यात आली आहेत. कोरोनानंतर हाँगकाँग सुद्धा पुन्हा एकदा जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आपल्या देशात खुलेआम प्रवाशी आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाँगकाँग पर्यटन मंडळाकडून विशेष ऑफर दिली जात आहे.
हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे. जवळपास पाच लाख प्रवाशांना हजारो एअर तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून मोफत विमान तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. हाँगकाँग शहरातील टूरसाठी पर्यटन मंडळाने ही बंपर ऑफर आणली आहे.
हाँगकाँग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज
एअरलाइन्सला पाठिंबा देण्यासाठी मोफत तिकिटे खरेदी करण्यात आली आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू संपत आहे, असे हाँगकाँग पर्यटन मंडळाचे कार्यकारी संचालक डॅन चेंग म्हणाले. तसेच, हाँगकाँग पर्यटन मंडळाने अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हॅलो, हाँगकाँग! आम्ही तुमचे परत स्वागत करण्यास उत्सुक आहोत. हाँगकाँगच्या अॅरॉन क्वोक आणि सॅमी च्युंग सारख्या स्टार्सच्या वेषभूषा करताना या शहराला जाणून घ्या. हाँगकाँगचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला पाच लाख मोफत विमान तिकिटे आणि व्हाउचर दिले जात आहेत."
खूप दिवसांपासून हाँगकाँगला जायला घाबरत होते परदेशी पर्यटक
कोरोना महामारीमुळे हाँगकाँग बरेच दिवस बंद होते. बऱ्याच दिवसांपासून कोणताही परदेशी पर्यटक या शहरात जाण्यास घाबरत होता. तसेच अलिकडच्या काही महिन्यांतील कोविड प्रवास निर्बंध आता मागे घेण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत पर्यटकांच्या कमतरतेमुळे हाँगकाँगच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.
कोविड धोरणांमुळे पर्यटकांची संख्या घटली
2020 पर्यंत जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ हाँगकाँगमध्ये कोरोना महामारी सुरू होण्याच्या एका वर्षापूर्वी पाच कोटी 60 लाख पर्यटकांपर्यंत पोहोचले होते. परंतु, कोरोना निर्बंध आणि चीनच्या झिरो कोविड धोरणांमुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. आता शहराला त्याच्या पर्यटन उद्योगाद्वारे कोरोना साथीच्या रोगाच्या व्यापक प्रभावातून सावरण्याची आशा आहे. विमानतळ प्राधिकरण हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी फ्रेड लॅम टिन फूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोफत तिकिटे हाँगकाँग-आधारित एअरलाइन्स कॅथे पॅसिफिक, एचके एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्सद्वारे वितरित केली जातील. पर्यटक आपल्या वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.