रिफ्रेश करणारी दक्षिण सफर

By admin | Published: April 4, 2017 03:52 PM2017-04-04T15:52:33+5:302017-04-04T15:52:33+5:30

उत्तर भारत तर हिलस्टेशनसाठी प्रसिध्द आहेच पण दक्षिणेकडेही अशा काही ठिकाणं आहेत जी पर्यटकांना भर उन्हातही ताजतवानं करतात. डोळ्यांना आणि मनाला हिरव्यागार निसर्गाचा सुंदर अनुभव देतात.

Refreshing South Tour | रिफ्रेश करणारी दक्षिण सफर

रिफ्रेश करणारी दक्षिण सफर

Next

उत्तर भारत तर हिलस्टेशनसाठी प्रसिध्द आहेच पण दक्षिणेकडेही अशा काही ठिकाणं आहेत जी पर्यटकांना भर उन्हातही ताजतवानं करतात. डोळ्यांना आणि मनाला हिरव्यागार निसर्गाचा सुंदर अनुभव देतात.

यंदा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बाहेरगावी फिरायला जायचे बेत आखत असाल तर नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणांपेक्षा काही वेगळी ठिकाणं तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करु शकता. लडाख सारखं भारताचं अगदी टोक असो की हिमालयाच्या कुशीतली अल्मोडा, खज्जियार, कसोलसारखी छोटी छोटी हिलस्टेशन्स किंवा ईशान्य भारतातील सिक्किम, अरूणाचल प्रदेशसारखी निसर्गसौंदर्यानं नटलेली राज्यं. असे अनेक पर्याय उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी उपलब्ध आहेत. उत्तर भारत तर हिलस्टेशन्ससाठी प्रसिद्ध आहेच, पण दक्षिणेकडेही अशी काही ठिकाणं आहेत जी तुम्हाला या सुटीमध्ये एकदम रिफ्रेशिंग अनुभव देऊ शकतात.

अंदमान- भूरळ घालणारी 52 बेटं

निरभ्र आकाश, स्वच्छ आणि सोनेरी वाळूनं व्यापलेले समुद्र किनारे, नीलमण्यांचा भास व्हावा असं पाणी. अंदमानात पाऊल ठेवल्यानंतरच तुम्हाला तुमचे पुढचे दिवस कसे असतील याचा अंदाज येऊच शकतो. 52 बेटांचा समुदाय असलेल्या अंदमानमध्ये पर्यटकांना भुरळ घालतील अशी अनेक ठिकाणं आहेत. राधानगर बीच, चिडीया टापू, महात्मा गांधी मरिन नॅशनल पार्क, राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा ठिकाणांमुळे अंदमानमध्ये फिरणाऱ्याला अजिबातच कंटाळा येणार नाही. पण त्याचबरोबर न चुकता भेट द्यावी असं ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल नॅशनल मेमोरियल. जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ठेवलं होतं. ज्यांना अँडव्हेंचर स्पोर्टसची आवड आहे, त्यांच्यासाठी इथे स्कूबा डायव्हिंग, अंडर-सी वॉकिंग, पॅरासेलिंग, बनाना बोट रायडिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत.

कूर्ग - भारताचं स्कॉटलंड

छोटंस, शांत शहर. हिरवंगार, कॉफीचे मळे आणि मसाल्याच्या शेतांनी वेढलेलं. निवांतपणाचा आस्वाद जिथे घेता येईल अशी जागा. कूर्गमध्येच तळकावेरीला कावेरी नदीचा उगम पहायला जाऊ शकता. आबे फॉल, इराप्पु फॉल्स, ब्रह्मगिरीचं शिखर अशा खास पर्यटकांनी भेटी देण्याच्या जागा आहेतच. पण त्याशिवाय इथलं अजून एक आकर्षण आहे निसर्गधाम आणि एलिफंट ट्रेनिंग कँप. या कँपमध्ये तुम्हाला हत्तींना जवळून पाहता येतं. त्यांना अगदी आंघोळही घालता येते आणि अर्थातच हत्तीवर ऐटीत बसून एक फेरफटकाही मारता येतो. इथल्या निसर्गसौंदर्यामुळे कूर्गला ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणूनही ओळखलं जातं.

कोडाईकॅनाल- बोटिंगपासून योगापर्यंत सर्व काही.

तमीळनाडूमध्ये हिलस्टेशन्स म्हटलं की सगळ्यांत पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे उटी. पण उटीजवळच असलेलं कोडाईकॅनाल हेही एक उत्तम समर डेस्टिनेशन आहे. जंगलं, गवताळ कुरणं, धबधबे, दऱ्या, शांत तलाव...फिरायला जाण्यासाठी एखाद्या ठिकाणी जे जे हवं, ते इथं आहे. कोडाईकॅनाल लेक, ब्रायंट पार्क, पिलर रॉक, डॉल्फिन्स नोझ रॉक, बेअर शोला फॉल्स ही इथली काही प्रसिद्ध ठिकाणं. कोडाईकॅनालमध्ये तुम्ही बोटिंगपासून ट्रेकिंगपर्यंत आणि सायकल रायडिंगपासून योगापर्यंत सर्व काही ट्राय करु शकता. त्यामुळेच हे दक्षिण भारतातील एक लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन बनत चाललं आहे.

मुन्नार-एलिफंट सफारी आणि बरंच काही  

‘God’s Own Country’असं बिरूद मिळवणाऱ्या केरळमधलं हे ठिकाणं तुम्हाला अगदी ताजंतवानं करून टाकतो. इथल्या पाचूसारख्या हिरव्यागार टेकड्या, चहाचे मळे, प्रसिद्ध कुंडल तलाव मुन्नारची भेट जास्तीत जास्त अविस्मरणीय करून टाकतात. कुंडल लेक, इको पॉइंट, एलिफंट लेक, टाटा टी म्युझियम ही इथली पर्यटकांची खास आकर्षणं. मुन्नारमध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही इथल्या ट्री-हाऊसमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. कुंडल लेकमधली शिकारा राइड, माऊंटन बायिकंग, एलिफंट सफारी मुन्नारच्या ट्रीपला अविस्मरणीय बनवतात.

होर्सले हिल्स- निवांत होण्याचं ठिकाण

आंध्र प्रदेश म्हटलं की पहिल्यांदा आठवतं तिरूपती. बालाजीच्या दर्शनासाठी इथे लाखोंनी भाविक येतात. आंध्रला देवदर्शनासाठी जाताना थोडी वाट वाकडी करु न या हिल स्टेशनलाही जाता येऊ शकतं. तिरूपतीपासून 160 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे हिलस्टेशन स्थानिकांमध्ये येलुगू मल्लाम्मा कोंडा म्हणून ओळखलं जातं. इथे सनसेट पॉइंट, तालकोना आणि कैगल धबधबे, मल्लाम्माचा देऊळ, विंड रॉक अशा ठिकाणांना तुम्ही भेटी देऊच शकता. पण इथे येण्याचा मूळ उद्देश म्हणजे रोजच्या धकाधकीपासून दूर जाऊन निवांत होणं हाच! ही दक्षिण भारतातील काही निवडक ठिकाणं आहेत. जी रूढार्थानं पर्यटनस्थळं बनली नाहीत, पण तुम्हाला भटकंतीचा आनंद देण्यात जराही कमी पडणार नाहीत एवढं नक्की! अमृता कदम

Web Title: Refreshing South Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.