कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार
By अनिकेत घमंडी | Published: February 13, 2018 04:22 PM2018-02-13T16:22:28+5:302018-02-13T16:28:19+5:30
वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ होणार आहे. यासाठी कुठलेही नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होणार आहे.
डोंबिवली: वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ होणार आहे. आधीच कल्याणमध्ये असलेल्या ७.५ हजार अधिकृत रिक्षांमध्ये आता अडीच हजार रिक्षांची वाढ होणार असून डोंबिवलीची स्थिती आणखीनच भयंकर होणार आहे. सध्या डोंबिवलीत साडेपाच हजार वैध तेवढ्याच संख्येने अवैध रिक्षा धावत असून त्यात ५ हजारांची भर पडणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या नियोजनात जून्यांसह नव्याने येणा-या रिक्षा उभ्या करण्यासाठी स्टँडचे कुठलेही नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीसह ठाकुर्ली परिसरातील सर्वच रिक्षा या रेल्वे स्थानकाकडे येतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजलेले असतात. सामाजिक संस्थांसह रिक्षा युनियन आणि वाहतूक नियंत्रण पोलिस, वॉर्डन यांच्या हाताबाहेरची परिस्थिती ओढावलेली असते. त्यात आता नव्या रिक्षांची भर पडल्याने कोंडी जास्त वाढणार असल्याने वाहतूक पोलिसांसमोर मोठा पेच आहे.
नव्याने रिक्षा वाढत असतांनाच देण्यात येणा-या इरादा पत्रांची चौकशी व्हावी असे पत्र कल्याणमधील रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रकाश (नाना) पेणकर यांनी ठाणे, कल्याण आरटीओ अधिका-यांना पत्र दिले आहे. पण पत्रानंतर आणि त्या आगोदर उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी स्वत:हून एकाही अर्जाची छाननी करतांन इरादापत्राची चौकशी व्हावी अशी नोंद केलेली नाही, तसा अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेला नाही ही शोकांतिका असल्याचे पेणकर ‘लोकमत’ला म्हणाले. यावरुनच इरादापत्र वाटपाचा कारभार पारदर्शी झाला नसल्याची टिका त्यांनी केली. कल्याण आरटीओ अधिकारी सक्षम असून त्यांनी या पत्राकडे गांभिर्याने बघावे. पेणकर यांच्या अर्जावर आरटीओकडुन जे उत्तर आले त्यात काही गैर आढळल्यास नीदर्शनास आणुन द्यावे असे म्हंटले आहे. पण त्या पत्रामुळे ते समाधानी नसून आरटीओ अधिका-यांनीच गैरकारभाराला चाप लावण्यासाठी पुढे यावे. इरादापत्रासाठी आलेल्या अर्जांमधील रहिवासी दाखले योग्य आहेत की नाही ते तपासावे, नसतील तर चौकशी करण्यासाठी तहसीलदारांना द्यावेत. जेणेकरुन पारदर्शी कारभार होईल, शंकेला वाव राहणार नाही असेही ते म्हणाले.
* कल्याण-डोंबिवली शहरांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आता रिक्षांचे प्रमाण प्रचंड झाले आहे. रस्ते छोटे असून मागेल त्याला परमिट या संकल्पनेमुळे रिक्षा घेणा-यांचे प्रमाण वाढलेले आहे. नव्या रिक्षांपैकी सुमारे २० टक्के रिक्षा या चालक मिळत नसल्याने उभ्या आहेत. त्याचा फायदा काय झाला. तसेच भरमसाठ रिक्षा आल्यााने पूर्वी मालकासह इंधनाची खर्ची वगळता चालक साधारणपणे शिपमागे ३०० ते ४०० रुपये घरी घेऊन जात असे. पण आता शिपमागे चालकाला अवघे १००-१५० रुपये मिळतात ही वस्तूस्थिती असल्याचे पेणकर म्हणाले. त्यामुळे आता मागेल त्याला परमिट ही सुविधा निदान या शहरांसाठी बंद करा अशी मागणी ते करणार आहेत.
* सूत्रांच्या माहितीनूसार आरटीओच्या सिरीजमधील डीसी कोड अंतर्गत १० हजार रिक्षा कल्याण आरटीओ क्षेत्रात आल्या, आता डिक्यू सिरीज सुरु आहे. त्यातीलही ५०० रिक्षांचे वाटप झाले आहे. सीपी सिरीज आधीच बंद झाली आहे. दुचाकीची सिरीज ही दोन महिन्यात पूर्ण होते, तर तीन चाकी वाहनांची साडेतीन महिन्यात, आणि चार चाकी वाहनांची वर्षाकाठी सिरीज पूर्ण होते. यामुळे दुचाकीसह तीन चाकी वाहनांची कल्याण आरटीओ क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. पण त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक कोंडी जटील होणार आहे.
* कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे स्टँडचे जाळे विकसीत करण्याची क्षमता नाही, मानसीकता नाही. गल्ली तिथे स्टँड असे डोंबिवलीतले विदारक चित्र आहे. अशातच नव्याने देण्यात येणा-या इरादापत्रामुळे कोंडीत वाढ होणार हे स्पष्ट आहे. एकीकडे शहरातील प्रदुषणाची समस्या असतांनाच वेगाने वाढणा-या वाहनांमुळे ध्वनी, वायु प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच वाहतूक नियंत्रण विभागाकडे अपु-या मनुष्यबळामुळे कोंडी सोडवायची कशी हे आव्हान आहे.