अनेक रहस्यांनी भरलेले आहे हिमाचल प्रदेशातील 'हे' मंदिर, देवीला दिला जातो 'या' पदार्थाचा लेप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 10:33 PM2022-07-05T22:33:18+5:302022-07-05T22:50:04+5:30
सात दिवसांच्या यात्रेनंतर हे लोणी काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र हे लोणी खायचे नसते तर ज्यांना कुणाला दुर्घर त्वचारोग असतील त्यांनी ते त्वचेवर लावले कि रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे.
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात नगरकोट धाम येथे असलेले प्रसिध्द शक्तीपीठ ब्रजेश्वरी माता मंदिर एका विशेष गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या देवी मातेला लोण्याचा लेप चढविण्याची प्रथा असून दर मकरसंक्रांतीला लोण्याचा लेप पिंडी स्वरूप असलेल्या मातेला चढविला जातो. सात दिवसांच्या यात्रेनंतर हे लोणी काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र हे लोणी खायचे नसते तर ज्यांना कुणाला दुर्घर त्वचारोग असतील त्यांनी ते त्वचेवर लावले कि रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे.
या मागे अशी कथा सांगतात की महिषासुराशी युध्द करताना देवी मातेला जखमा झाल्या होत्या. तिने नागरकोट येथे येऊन त्या जखमांवर लोणी लावले आणि त्या बऱ्या झाल्या. तेव्हापासून येथे लोणी लेपन करण्याची प्रथा पाळली जाते. उत्तर प्रदेशातील बऱ्याच नागरिकांची ही कुलदेवता आहे त्यामुळे त्या राज्यातून मोठ्या संखेने भाविक येथे येतात. जावळविधी येथे केला जातो तसेच नव परिणीत जोडपी सुद्धा मातेच्या दर्शनाला येतात. यज्ञात जाळून घेतलेल्या सती मातेचे जागोजागी ५२ ठिकाणी अवयव तुकडे पडले होते त्यात सतीमातेचे डावे वक्ष येथे पडले असा समज आहे.
असेही सांगतात कि पांडव वनवासात होते तेव्हा देवीने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर येथे मंदिर बांधा असा आदेश दिला होता आणि पांडवानी एका रात्रीत मंदिर बांधले होते. हे मंदिर १९०५ च्या मोठ्या भूकंपात नष्ट झाले. आता या जागी नवे मंदिर बांधले गेले आहे.
या मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे आहेत. त्यात अठरा भुजा असलेली दुर्गा, सूर्यमंदिर, यज्ञशाळा, शीतला माता मंदिर, क्षेत्रपाल देवता, राममंदिर, हनुमान मंदिर अशी मंदिरे आहेत. शिवाय लाल रंगाची एका भैरव मूर्ती असलेले मंदिर आहे. काही संकट येणार असेल तेव्हा या भैरव मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात असे सांगितले जाते.