सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला किल्ले रायगड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:09 PM2019-02-19T13:09:45+5:302019-02-19T13:13:54+5:30

'हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला.

Shiv Jayanti : know intresting facts about raigad fort of hindavi swarajya | सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला किल्ले रायगड!

सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला किल्ले रायगड!

googlenewsNext

'हिंदवी स्वराज्या व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. महाडच्या उत्तरेस 245 किमी अंतरावर वसलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2851 फूट उंचीवर आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये वसलेला रायगड चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. रायगडाच्या पूर्वेला लिंगाणा आणि जर निरभ्र आभाळ असेल तर, राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडापासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरागांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महाराजांनी पुण्यातील राजगड सोडून पश्चिम डोंगररांगांमध्ये वसलेल्या रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. 

(Image Credit : Thrillophilia)

रायगडाचा थोडासा इतिहास :

रायगडाचे प्राचीन नाव खरं तर 'रायरी' होतं. पण ब्रिटीश लोक याला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत असत. जिब्राल्टरचं ठाणं जितकं अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य. साधारणतः पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्याला रायगडाचं रूप नव्हतं. त्यावेळी तो नुसताच डोंगर होता. तेव्हा त्याला 'रासिवटा' आणि 'तणस' अशी दोन नावं होती. निजामशाहीत रायगडाचा उपयोग फक्त कैदी ठेवण्यासाठी करण्यात येत असे. पुढे महाराजांनी रायगडास वेढा दिला आणि रायगड स्वराज्यामध्ये आला. 

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणं :

पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : 

उतारवयात जिजाऊना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास 'तक्क्याची विहीर' असंही म्हणतात.

नाना दरवाजा : 

या दरवाजास 'नाणे दरवाज' असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. 1674 च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस 'देवडा' असं म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

चोरदिंडी : 

महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

हत्ती तलाव : 

महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

राजसभा : 

महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखरीमध्ये नमूद केल्यानुसार, 'तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.'

नगारखाना : 

सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. याव्यतिरिक्त येथे पाहण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. ज्या क्षणोक्षणी स्वराज्याच्या इतिहासाचे दाखले देत असतात.

गडावर जाण्यासाठी :

- मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बस असतात. तसेच बस स्थानकात बाहेरून जीपही जातात. जिथे पायऱ्या सुरू होतात तेथे उतरून पायऱ्यांनी गडावर जाता येते. जवळ जवळ 1500 पायऱ्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

- नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायऱ्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने तुम्ही गड चढू शकता.

Web Title: Shiv Jayanti : know intresting facts about raigad fort of hindavi swarajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.