प्रख्यात सुरबाहर वादक डॉ.अश्विन दळवी यांच्या सुरबाहर वादनाने रौप्यमहोत्सवी पं.राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 04:29 PM2018-12-17T16:29:39+5:302018-12-17T16:54:49+5:30
प्रख्यात सुरबाहर वादक डॉ.अश्विन दळवी यांच्या सुरबाहर वादनाने रौप्यमहोत्सवी पं.राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात झाली.
ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित पं.राम मराठे संगीत समारोह कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रख्यात सुरबाहर वादक डॉ.अश्विन दळवी याच्या सुरबाहर वादनाने यंदाच्या पं.राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात झाली.
यावेळी सभागृह नेते नरेश मस्के, नगरसेवक संजय वाघुले,उपआयुक्त संदीप माळवी,नाट्य परिषद ठाणे शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर आदी उपस्थित होते. पं.राम मराठे संगीत समारोहाचे यंदा २४ वर्ष पूर्ण करून २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. दिनांक १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत संपन्न होणाऱ्या पं.राम मराठे संगीत समारोहाची सुरुवात जयपूरचे प्रख्यात सुरबाहर वादक डॉ अश्विन दळवी यांच्या सुरबाहर वादनाने झाली. डॉ.दळवी यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील ख्यातमान तबलावादक श्री.महेश दळवी यांच्याकडून मिळाला आहे.वडिलांच्या मागर्दर्शनाखाली त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.पुढे इटावा घराण्याचे पंडित अरविंद पारीख यांच्या कडून त्यांनी सुरबाहरचे धडे घेतले.पंडित राम मराठे संगीत समारोहाच्या पहिल्या सत्रात त्यांनी धृपद आणि ख्याल याचा मिलाप तसेच वाटाली आणि तंत्रकारी अंग याचा मिलाप त्यांनी सादर केला.त्यांच्या या सुरबहार वादनाने नाट्यगृहातील रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या. समारोहाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात शास्त्रीय गायिका ज्योती खरे- यादवार यांचे शास्त्रीय गायन झाले. विविध पुरस्कारने सन्मानित असलेल्या गायिका ज्योती खरे यांनी आपला गायनाचा सुरेख मिलाफ साधत विविध राग उलगडले.त्यांच्या सुरेख अशा शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पं.राम मराठे संगीत समारोहाला शानदार अशी सुरुवात झाली असून पुढील ४ दिवस देखील ठाण्यातील संगीत रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्रमापुर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध आहेत असे आवाहन केले आहे.