देशातील ते ठिकाण जिथे सर्वातआधी उगवतो सूर्य, सकाळी ३ वाजताच रंगतो किरणांचा खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:32 AM2018-08-30T11:32:55+5:302018-08-30T11:34:58+5:30
आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही.
अमेरिकन लेखक आणि पत्रकार जेनेट वॉल्सने आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे की, तुम्हाला जर देवाला जवळून अनुभवायचं असेल तर तुम्ही सूर्योदय होतांना पहायला हवं. आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही. लाल आणि पिवळ्या आकाशासोबत जेव्हा सूर्याची चमकदार किरणे जमिनीवर पडतात तेव्हा स्वर्गाचा अनुभव येतो.
आपल्या बिझी शेड्यूलमधून तुम्हीही कधीना कधी सूर्योदय नक्की पाहिला असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, देशातील कोणत्या भागात सर्वातआधी सूर्योदय होतो. आश्चर्याची बाब ही आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या बिछान्यावर झोपले असता आणि खिडकी बाहेर आकाश काळं असतं. तेव्हा कोण्या एका कोपऱ्यात सुर्याची किरणे पसरायला सुरुवात होते. असे केवळ दुसऱ्या देशात नाही तर आपल्या देशातील एका भागातही होतं. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा जागेबाबत सांगणार आहोत जिथे सर्वातआधी सूर्योदय होतो.
कुठे होतो सर्वातआधी सूर्योदय?
देशात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो. या प्रदेशाच्या नावातूनच हे स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी मानलं जातं. या प्रदेशातील लहान ठिकाण डोंग व्हॅलीमध्ये सर्वातआधी सूर्य उगवताना पाहिला जाऊ शकतो.
रात्री ३ वाजतापासून सुरु होते प्रक्रिया
सूर्याचा प्रकाश आणि किरणांची लाल रंगाची चादर डोंग व्हॅलीमध्ये रात्री ३ वाजतापासून बघायला मिळते. लोहित नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला निसर्गाची देण म्हटलं जातं. १९९९ मध्ये या गोष्टीचा शोध लावण्यात आला होता की, भारतात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग व्हॅलीमध्ये होतो. चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि निळ्या आकाशावर पसरलेल्या सूर्यांच्या रंगात रंगलेले लाल-पिवळे ढग डोळे दिपवणारा नजारा असतो.
८ किमी ट्रेकिंग करुन जावे लागते
नव्या वर्षानिमित्ताने देशभरातील पर्यटक सूर्याची पहिलं किरणं बघण्यासाठी डोंग व्हॅलीच्या देवांग घाटीत येतात. ही घाटी लोहित जिल्ह्याच्या मॅकमोहन लाइनजवळ आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये तशा तर बघण्यासाठी अनेक जागा आहेत पण लोक सूर्योदय बघण्यासाठी ८ किमी डोंगरांवर ट्रेकिंग करुन येतात. समुद्रसपाटीपासून १२४० मीटर उंचीवर असलेल्या या डोंग व्हॅलीमध्ये लोक एक वेगळीच शांतता आणि एक वेगळाच अनुभव घेऊ शकतात.