‘ट्रॅव्हल पॅकेज’ घेताय?- जरा जपून!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:29 AM2023-12-21T08:29:35+5:302023-12-21T08:29:40+5:30
जाहिराती पाहून तुम्हीही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सखोल माहिती घेणं गरजेचं आहे.
वर्षाअखेर सुटीदरम्यान कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचे नियोजन करत असाल, तर जरा जपून. आकर्षक टूर पॅकेज देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. रोजच्या धावपळीतून काही क्षण निवांत घालवण्याच्या उद्देशाने लोक पर्यटनस्थळांना पसंती देतात. या काळात ट्रॅव्हल कंपन्यांकडून ट्रॅव्हल पॅकेजविषयी जाहिराती केल्या जातात. अशा जाहिराती पाहून तुम्हीही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सखोल माहिती घेणं गरजेचं आहे.
१. पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, कोणत्या गोष्टींसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार हे पाहावं.
२. पॅकेज अंतर्गत कोणती पर्यटनस्थळं दाखवली जाणार, त्या ठिकाणची प्रवेश फी वेगळी द्यायची का ती पॅकेजमध्ये समाविष्ट आहे, याची माहिती घ्यावी. पॅकेजमध्ये विमान प्रवास समाविष्ट असेल तर विमान थेट आहे की, कनेक्टिंग आहे ते पहावे.
विमानाचं तिकीट हे ‘ई-तिकीट’ स्वरूपात असतं. त्यामुळे अनेकदा ट्रॅव्हल एजंट पर्यटकांना फसवण्यासाठी जुनं एखादं तिकीट तारीख बदलून देतात. म्हणून पर्यटकांनी ‘ई-तिकीट’ हातात मिळाल्यावर त्यावरील पीएनआर नंबरच्या मदतीनं प्रत्यक्षात आपलं तिकीट बुक झालं आहे का याची माहिती वेबसाइटवरून करून घ्यावी.
४. बुकिंग करताना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल कंपनीकडूनच तुमच्या सहलीचं बुकिंग करा. ती ट्रॅव्हल कंपनी किंवा ट्रॅव्हल एजंट पर्यटन क्षेत्रात किती वर्षे कार्यरत आहे, तसंच त्याची विश्वासार्हता किती आहे, याविषयी चौकशी करायला हवी.
एकूणच पर्यटनाचं नियोजन करताना ट्रॅव्हल कंपनीशी निगडीत सर्व गोष्टींची स्पष्टता झाल्याशिवाय ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्याची चूक करू नका. यामुळे तुमचा त्रास टळेल आणि पर्यटनाचा आनंद मिळवता येईल. तरीही फसवणूक झाल्यास ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, स्थानिक पोलिस स्टेशन तसेच ग्राहक मंच आहेतच. नियोजित सहल रद्द करून भरलेले पैसे देण्यास एखादी ट्रॅव्हल कंपनी चालढकल करत असल्यास ग्राहक त्या विरोधात ग्राहक मंचात दाद मागू शकतात.
- विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप (प.), मुंबई