ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टीव्ही संच चोरी करणा-यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 08:50 PM2018-01-30T20:50:34+5:302018-01-30T20:57:43+5:30
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून एलसीडीची चोरी करणा-यास सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळ चोरीच्या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे : अलिकडेच जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका बाळाच्या चोरीचा ठाणे पोसिलांनी मोठ्या कौशल्याने छडा लावल्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एलएडी टीव्ही संच चोरीचा प्रयत्न झाला. या चोरीप्रकरणी राजेंद्र निरुखेकर (४९, रा. चिरागनगर, ठाणे) याला एका सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील दंत चिकित्सा बाहय रुग्ण विभागात (ओपीडी) भिंतीवर लावलेला हा १५ हजारांचा एलएडी टीव्ही संच २९ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र चोरून नेत होता. हा प्रकार रुग्णालयातील सफाई कर्मचारी अजय सोलंकी (४९) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी आरडाओरडा करून त्याला रंगेहाथ पकडून ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून हा टीव्ही संचही हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाळाच्या चोरीनंतर दक्षता...
आठवडाभरापूर्वी लेबर वार्ड मधून भिवंडीतील एका महिलेचे अवघ्या चार तासांचे बाळ डोंबिवलीतील एका महिलेने त्याच्या आईची दिशाभूल करून चोरले होते. ठाणे पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ३६ तासांमध्ये तपास करून बाळाची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुखरुप सुटका केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सफाई कामगाराच्या दक्षतेचे रुग्णालय वर्तुळात कौतुक होत आहे.