भर उन्हाळ्यात ट्रेकिंगची लहर आलीय, मग या पाचातून एकाची निवड करा!
By Admin | Published: May 9, 2017 05:30 PM2017-05-09T17:30:58+5:302017-05-09T17:33:37+5:30
महाराष्ट्राच्याच डोंगरखोऱ्यात अशी ठिकाणं आहेत,जिथे तुम्ही उन्हाळ्यातही ट्रेकिंगला जाऊ शकता.
-अमृता कदम
उन्हाळा आणि ट्रेकिंग हे दोन शब्द सोबतीनं उच्चारले तरी दमछाक होईल. मग उन्हाळ्यात तेही अगदी रणरणत्या मे महिन्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार तर लांबच! पण जर तुम्ही शारीरिक क्षमतेच्या मुलभूत निकषांनुसार तंदुरु स्त असाल आणि उन्हाळा सहन करण्याची तुमची तयारी (अर्थातच योग्य ती काळजी घेऊनच) असेल तर महाराष्ट्राच्याच डोंगरखोऱ्यात अशी ठिकाणं आहेत,जिथे तुम्ही उन्हाळ्यातही ट्रेकिंगला जाऊ शकता.
1.राजमाची
लोणावळ्यापासून अवघ्या 15 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण. राजमाची किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत.. श्रीवर्धन आणि मनरंजन. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना ‘कातळदरा’ ही खोल दरी आहे. शिवाय दोन्ही बालेकिल्ल्यांकडे जाताना वाटेत खोदलेल्या गुंफाही आढळतात. असं हे ठिकाण वर्षभर सुंदरच असतं. राजमाचीच्या अगदी पोटातच कोंडाणे लेणी आहेत. ही लेणी सातवाहनकालीन आहेत. त्याचबरोबर किल्ल्यावर उदयसागर तलाव आणि शंकराचं एक मंदिरही आहे. अगदी सकाळी लवकर तुम्ही चढायला सुरूवात केलीत, तर हा ट्रेक एका दिवसातही पूर्ण होऊ शकतो. काही खड्या चढणी असल्या तरी तुलनेनं हा ट्रेक सोपा आहे. तुम्ही अगदी सराईत ट्रेकर नसला तरी हा ट्रेक पूर्ण करु शकता. सोबत पुरेसं पाणी घ्यायला मात्र अजिबात विसरु नका. तुम्हाला मुक्कामी जायचं असेल तर आजूबाजूच्या गावांतही राहण्याची सोय होऊ शकते.