भारतातल्या या आठ ट्रेन्सनी रेल्वे प्रवासाला केलंय प्रेक्षणीय, अविस्मरणीय, श्रीमंत आणि आरामदायी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:35 PM2017-10-27T18:35:06+5:302017-10-27T18:40:57+5:30
भारतात अशाही काही रेल्वे गाड्या आहेत, ज्यांचं भांडं विमानापेक्षाही जास्त आहे. ज्यातून प्रवास करताना तुम्हाला एखाद्या टूरच्या पॅकेजएवढी रक्कम मोजावी लागू शकते. असे रेल्वेमार्ग आहेत जे तुमच्या प्रवासांच्या आठवणींना अविस्मरणीय बनवून टाकतात.
- अमृता कदम
भारतासारखा विविधतेनं नटलेला देश समजून घ्यायचा असेल, अनुभवायचा असेल तर रेल्वे प्रवासारखं उत्तम साधन नाही. पण आपल्याकडे रेल्वेकडे केवळ स्वस्त आणि मस्त प्रवासाचं साधन एवढ्याच मर्यादित दृष्टिनं पाहिलं जातं. पण भारतात अशाही काही रेल्वे गाड्या आहेत, ज्यांचं भांडं विमानापेक्षाही जास्त आहे. ज्यातून प्रवास करताना तुम्हाला एखाद्या टूरच्या पॅकेजएवढी रक्कम मोजावी लागू शकते. असे रेल्वेमार्ग आहेत जे तुमच्या प्रवासांच्या आठवणींना अविस्मरणीय बनवून टाकतात. रेल्वेच्या प्रवासातच एका संपूर्ण ट्रीपचा आनंद घ्यायचा असेल तर या खास रेल्वेगाड्यांची माहिती असणं गरजेचं आहे.
1. डेझर्ट क्वीन (जोधपूर-जैसलमेर)
नावावरूनच ही गाडी राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून फेरफटका मारत जाते, हे स्पष्ट होतं. सोनेरी वाळू, त्यात अधूनमधून दिसणारे उंटांचे तांडे हे दृश्य तुम्हाला नेहमी पहायला मिळणार नाही. मावळतीची किरणं पडून बदलणारा वाळूचा रंग, संध्याकाळचा मस्त गारठा अनुभवयाचा असेल तर या गाडीनं एकदा तरी सफर केलीच पाहिजे. राजस्थानची ट्रीप प्लॅन केली असेल किंवा करणार असाल, तर डेझर्ट क्वीनचं बुकिंग करायला अजिबात विसरु नका.
2. द महाराजा एक्सप्रेस (मुंबई-दिल्ली)
नावाप्रमाणेच ही ट्रेन शाही सफारीचा अनुभव देते. ही भारतातली सगळ्यांत महागडी लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये असं काय आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर या ट्रेनमध्ये तुम्हाला सर्वांत मोठा डायनिंग हॉल, बार, लाऊंज, जनरेटर, एलसीडी टीव्ही, डायरेक्ट डायल फोन, इंटरनेट, स्वीट बाथरूम असा सगळा सरंजाम मिळतो. मुंबई-दिल्ली प्रवासासाठी या ट्रेनचं आठ दिवस-सात रात्रींचं पॅकेज आहे. कारण हा थेट मुंबईवरून दिल्ली असा प्रवास नाहीये, तर वाटेतल्या सगळ्यां प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत देत हा प्रवास होतो.
3. द हिमालयन क्वीन (कालका-शिमला)
या गाडीला ख-या अर्थानं झुकझुक गाडी म्हणता येईल. कारण ही टॉय ट्रेन आहे. ही ट्रेन 2008 सालापासून युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीमध्ये आहे. सूचीपर्णी वृक्षांच्या दाटीतून वाट काढत जाणारी ही ट्रेन तुम्हाला हिमालयीन सौंदर्याचं दर्शन घडवते. देवदार वृक्ष, फुलांची कुरणं, शुभ्र फेसाळते पाण्याचे प्रवाह पाहून मन आणि डोळे अगदी निवून जातात. शिवाय घाटातली वळणं तुमची थ्रील आणि एक्साइटमेंटचीही हौस पूर्ण करतात.
4. पॅलेस आॅन व्हील्स (राजस्थान टूर)
26 जानेवारी 1982 साली सुरु झालेली ‘पॅलेस आॅन व्हील्स’ भारतातली पहिली सुपर लक्झरी ट्रेन आहे. आॅगस्ट 2009 मध्ये ही ट्रेन नव्या रूपात आणि अधिक आरामदायी सुविधांसह सादर करण्यात आली. आज जगातल्या सर्वोत्तम लक्झरी ट्रेन्सच्या यादीत ‘पॅलेस आॅन व्हील्स’ चौथ्या क्रमांकावर आहे. उत्तमोत्तम रेस्टॉंरण्ट, म्युझिक, इंटरनेट कनेक्टिव्हिटीपासून एक्झॉटिक स्पापर्यंत सर्व काही तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळेल. फक्त खिसा थोडा सैल सोडायची तयारी हवी.
5. एनजी हिमालयन रेल्वे
‘मेरे सपनों की रानी’ गाण्यातली ती शिट्टीचा आवाज करत, धूर सोडत जाणारी गाडी आणि खिडकीतली शर्मिला टागौर अनेकांना आठवत असेल. त्यानंतर विद्या बालनच्या परिणिती, प्रियंका चोप्राच्या बर्फीमध्येही ही गाडी आपलं दर्शन देऊन जाते. ही महागडी, लक्झुरियस ट्रेन निश्चितच नाहीये, पण वाटेत दिसणारा निसर्ग तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतो. दार्जिलिंंगच्या चहाच्या मळ्यांतून वाट काढत जाणारी ही छोटी ट्रेन तुमच्या प्रवासाचा आनंदच द्विगुणित करते.
6. मांडवी एक्सप्रेस (मडगाव-मुंबई)
एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुस-याबाजूला अरबी समुद्र...यापेक्षा सुंदर नजारा अजून काय असू शकतो? गोवा आणि मुंबईला जोडणारी ही गाडी नयनरम्य दृश्यांचं दर्शन घडवत जाते. भाताची शेतं, नारळाच्या झाडांच्या रांगा, कोकणातली छोटीछोटी गावं...फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी हा प्रवास एकदम परफेक्ट आहे.
7. द गोल्डन चॅरिएट (बेंगलुरु -गोवा)
या गाडीच्या नावाचं शब्दश: भाषांतर म्हणजे सुवर्णरथ. कर्नाटक राज्य पर्यटन विभागानं या लक्झरी ट्रेनची सुरूवात केली. ही गाडी राज्यातल्या सगळ्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांशी जोडली गेलेली आहे. 19 कोचेसची ही गाडी दोन रेस्टॉरण्ट्स, एक लाऊंज बार, कॉन्फरन्स रु म, जिम, स्पा अशा सगळ्या सोयीसुविधांनी सज्ज आहे. हम्पीच्या प्रसिद्ध स्टोन चॅरिएट वरूनच या गाडीचं ‘गोल्डन चॅरिएट’ हे नाव ठेवण्यात आलंय.
8. कन्याकुमारी-त्रिवेंद्रम एक्सप्रेस
हा प्रवास खरंतर अवघ्या दोन-अडीच तासांचाच आहे. पण भारताच्या दक्षिण टोकाकडून ‘देवभूमी’ केरळपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जातो. दाट हिरवाईतून मार्ग काढत ही गाडी प्रवास करते तेव्हा हा दोन तासांचा प्रवास संपूच नये, अशी भावना तुमच्या मनात निर्माण होते.