लष्कराबद्दल असलेली उत्सुकता शमवायचीय मग या 5 लष्करी संग्राहालयाला नक्की भेट द्या.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:02 PM2018-01-05T18:02:07+5:302018-01-05T18:13:18+5:30
लष्कराच्या परंपरेत, इतिहासात एक मोठं ज्ञानाचं भांडार लपलेलं आहे. अनेकांना लष्कराबद्दलच्या या खास गोष्टी जाणून घेण्यात रस असतो. लष्कराबद्दलची उत्सुकता शमवणारी खास लष्करी संग्राहलयं आपल्या देशात आहेत. या संग्राहालयाला भेट देवून भारतीय लष्कराबद्दल बरंच काही माहिती करून घेता येतं.
- अमृता कदम
लष्करी गणवेश पाहिल्यानंतर लहानपणी आपण किती हरखून जायचो ना? या यूनिफॉर्मचा एक वेगळाच बाज आहे. मोठं झाल्यावरही त्याबद्दलचा आदर काही कमी होत नाही. भारतीय लष्कर ही प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची बाब तर आहेच. पण या लष्कराच्या परंपरेत, इतिहासात एक मोठं ज्ञानाचं भांडार लपलेलं आहे. अनेकांना लष्कराबद्दलच्या या खास गोष्टी जाणून घेण्यात रस असतो. लष्कराबद्दलची उत्सुकता शमवणारी खास लष्करी संग्राहलयं आपल्या देशात आहेत. या संग्राहालयाला भेट देवून भारतीय लष्कराबद्दल बरंच काही माहिती करून घेता येतं.
1. कुरसुरा पाणबुडी म्युझियम
भारतीय नौदलाचं हे संग्रहालय आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथे आहे. हे संग्रहालय अतिशय अभिनव पद्धतीनं उभारलं गेलंय.त्यामुळे इथे आल्यावर एखाद्या पाणबुडीवरच आल्याचाच भास होतो. समुद्राच्या पोटात शिरून नौसैनिक कसे काम करत असतील याची कल्पना इथे फिरल्यावर येते. आशियातलं अशा पद्धतीचं हे पहिलंच संग्रहालय आहे. 2002 साली त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आजही नौदलाचे काही विशेष कार्यक्र म या ठिकाणी आयोजित होत असतात.
2. जैसलमेर युद्ध संग्रहालय
राजस्थानच्या वाळवंटात भारताच्या अगदी सीमेवर जैसलमेर वसलेलं आहे. जैसलमेर पासून 10 किमी अंतरावर जोधपूर हायवेवर हे युद्ध संग्रहालय आहे. भारतीय लष्कराकडूनच ते उभारण्यात आलंय. 1965 आणि 1971 साली जे भारत-पाकिस्तान युद्ध झालं, त्यात देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या त्यागाचं प्रतीक म्हणून हे संग्रहालय उभारण्यात आलंय. या जवानांचं शौर्य किती अफाट होतं याची झलक इथे पाहायला मिळते. अनेक युद्ध पदकं, लढाईतली जुनी शस्त्रं, वाहनं या ठिकाणी पाहायला मिळतात.
3. भारतीय युद्ध मेमोरियल
राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात हे संग्रहालय आहे. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असताना भारतीय लष्करानं जे पराक्र म केलेले आहेत, त्याची आठवण या संग्रहालयात पाहायला मिळते. पानिपतसारख्या ऐतिहासिक युद्धाबद्दलची रोचक माहितीहीइथे पाहायला मिळते. याशिवाय देशाबाहेर झालेल्या अनेक युद्धातली पदकं, झेंडे आणि गणवेश या ठिकाणी आहे. तुर्की आणिन्यूझीलंडच्या लष्करासोबत झालेल्या संयुक्त मोहिमेच्या काही आठवणीही इथे भेटतात.
4. नौसेना म्युझियम
गोव्यामध्ये भारतीय नौदलाचं हे म्युझियम पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. हे संग्रहालय दोन भागांमध्ये विभागण्यात आलंय. त्याच्या बाह्य भागात प्रदर्शन तर दुस-या भागात एक मोठी गॅलरी आहे. नौदलाच्या इतिहासाची आणि अजोड पराक्र माची साक्ष तुम्हाला इथे पाहायला मिळते.
5. सामुद्रिका: नेव्हल मरीन म्युझियम
अंदमान बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाला फिशरीज संग्रहालय म्हणूनही ओळखलं जातं. भारतीय नौदलाकडूनच या संग्रहालयाचं व्यवस्थापन केलं जातं. समुद्राच्या पाण्यातलं पर्यावरण आणि समुद्री जीवन याबाबत लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं हे संग्रहालय उभारण्यात आलंय.
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वरीलपैकी एखाद्या शहरात गेलात तर आपल्या देशाच्या उज्ज्वल इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी या संग्रहालयांना भेट देण्यासाठीही अवश्य वेळ काढा.