पर्यटनाचे शौकिन असाल तर ही पाच पुस्तकं वाचाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 07:27 PM2018-01-03T19:27:49+5:302018-01-03T19:32:51+5:30
काही पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला फिरण्यात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अधिक काय जाणून घ्यायला हवं हे उमजतं. म्हणूनच पर्यटन खºया अर्थानं अनुभवण्यासाठी काही पुस्तकं मुद्दाम वाचायला हवीत.
- अमृता कदम
पुस्तकासारखा खरा मित्र नाही असं म्हणतात. पुस्तकं तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान देतात, नव्या दुनियेची सफर घडवून आणतात. कधीकधी एखादं पुस्तक तुम्हाला बसल्याबसल्या नव्या देशाचा जिवंत अनुभव देतं. अशा वाचनानं तुमची जगाकडे पाहण्याची नजर बदलते, तुम्ही अधिक प्रगल्भ होतात. पर्यटनाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. काही पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला फिरण्यात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अधिक काय जाणून घ्यायला हवं हे उमजतं. म्हणूनच पर्यटन ख-या अर्थानं अनुभवण्यासाठी काही पुस्तकं मुद्दाम वाचायला हवीत.
ए पॅसेज टू इंडिया
इ.एम.फोस्टरने लिहिलेलं हे पुस्तक ब्रिटीश काळातल्या भारतीयांच्या जीवनाची कहाणी सांगतं. हे पुस्तक 1920 साली त्यांनी भारतात घालवलेल्या अनुभवांवर आधारित आहे. एका मोठया स्थित्यंतराच्या दरम्यान ते या देशात राहिले होते. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यावर एकप्रकारे स्वातंत्र्यपूर्व कालीन भारताचे दर्शन घडल्यासारखे होते.
सिटी आॅफ डीजिन्स, अ ईयर इन दिल्ली
पर्यटनाबद्दलचं पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णनच असायला हवं असा काही नियम नाही. कधी कधी एखाद्या कादंबरीतही स्थळ, काळाचं असं बहारदार वर्णन असतं की ही ठिकाणं प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मनात निर्माण होते. अशाच निवडक पुस्तकांपैकी एक म्हणजे विल्यम डॉलरिम्पल यांचं हे पुस्तक. या कादबंरीतली पात्रं आणि किस्से इतक्या खुबीनं रंगवली गेलीयत की त्यामुळे एकाचवेळी दिल्ली शहराचा इतिहास आणि बदलती दिल्ली तुम्हाला अनुभवायला मिळते.
इट, प्रे, लव्ह
अमेरिकन लेखिका एलिजाबेथ गिलबर्टचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. इटली, इंडोनेशिया आणि भारत या तीन देशात जे जे तिनं पाहिलं ते सगळं या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलंय. घटस्फोटानंतर लेखिका या देशांच्या सफरीवर निघाली आणि या आठवणींचा सुंदर कोलाज म्हणजे हे पुस्तक. तब्बल 182 आठवडे हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत आपलं स्थान कायम राखून होतं. या पुस्तकावर आधारित पुढे एका चित्रपटाची निर्मितीही झाली.
मॅक्झिमम सिटी: बॉम्बे लॉस्ट अॅण्ड फाउन्ड
मूळचे भारतीय वंशाचे अमेरिकन पत्रकार सुकेतू मेहता यांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक इतकं गाजलं की अनेकदा मुंबईचा उल्लेख या पुस्तकाच्या नावानुसारच म्हणजे ‘मॅक्झिमम सिटी’ असा केला जातो. मुंबईची नाइट लाइफ, इथलं राजकारण या सगळ्याचा परामर्श या कादंबरीत घेण्यात आलाय.
शांताराम
ग्रेगोरी डेविड रॉबर्टस या आॅस्ट्रेलियन लेखकाची ही कादंबरी आहे. या कादबंरीत एक अफलातून पात्र प्रवासवर्णनासाठी गुंफण्यात आलंय. ही कादंबरी म्हणजे आॅस्ट्रेलियाच्या तुरूंगातून पळालेल्या कैद्याची कहाणी आहे. तुरुगातून बाहेर आल्यावर हा माणूस भारत यात्रेवर निघतो. कादंबरीचा हा नायक मुंबईतली जीवनशैली पाहून थक्क होतो. मुंबईचं असं वर्णन क्वचितच कुणी केलं असेल.
अर्थात ही सगळी इंग्रजी पुस्तकांची यादी आहे. पण बाहेरचे लोक आपल्या देशाला कसं बघतात हे पाहण्यासाठी ही पुस्तकं नक्की वाचायला हवीत. बाकी मराठी वाचकांसाठी मराठीतही असं चांगलं प्रवासवर्णनपर साहित्य उपलब्ध आहेच.