शिमल्याजवळील ऑफबीट डेस्टिनेशन्स; गुलाबी थंडीचा घ्या अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:41 PM2018-10-31T17:41:22+5:302018-10-31T17:41:55+5:30
हिवाळ्याची गुलाबी थंडी सुरू झाली असून वातावरणातही गारवा पसरू लागला आहे. अनेकांनी तर आपली सुट्टी एन्जाय करण्यासाठी वेगवेगळे प्लॅनही केले आहेत.
हिवाळ्याची गुलाबी थंडी सुरू झाली असून वातावरणातही गारवा पसरू लागला आहे. अनेकांनी तर आपली सुट्टी एन्जाय करण्यासाठी वेगवेगळे प्लॅनही केले आहेत. तुमचाही काही प्लॅन आहे की नाही? काय म्हणताय, अजून काहीच प्लॅन नाही केलात? एवढा कसला विचार करताय? विंटर व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी विदेशातच जाण्याची गरज नाही. भारतातच अनेक हटके डेस्टिनेशन्स आहेत. जिथे जाऊन तुम्ही तुमचं विंटर व्हेकेशन निसर्गासोबत एन्जॉय करू शकता.
विंटर व्हेकेशनसाठी भारतातील ठिकाणांबाबत विचार केला असता प्रामुख्याने सर्वांची पसंती ही शिमल्याला असते. हिवाळ्यात शिमला फिरण्याची बात काही औरच... पण शिमल्याच्या आजूबाजूलाही अनेक अशी ठिकाणं आहेत ज्या फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. त्या ठिकाणांच निसर्गसौंदर्य पर्यटकांना भूरळ घालतं. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...
मनाली :
उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर सर्वजण थंडीचा अनुभव घेण्यासाठी मनालीचा प्लॅन करतात. येथील वातावरण नेहमी थंड असतं. पावसाळ्यामध्ये तर येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. मनाली शिमल्यापासून 265 किलोमीटर अंतरवर आहे. जर विमानमार्गे जाण्याचा विचार करत असाल तर 128 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
वाइल्ड फ्लॉवर हॉल (Wild Flower Hall) :
हिंदुस्थान-तिबेट रोडवर असलेलं Wild Flower Hall शिमल्यापासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे. 2,498 किलोमीटर उंचावर असल्यामुळे येथे बर्फवृष्टी होते. फूलं आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ पर्यटकांना फार भूरळ घालते.
मशोबरा :
मशोबरा शिमल्यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. मशोबराची उंची 7700 फूट आहे. मशोबरामधील सुंदर डोंगर, तेथील पार्क, दगड फोडून तयार केलेल्या खुर्च्या पाहून तुम्ही आनंदी व्हाल.
नालदेहरा :
नालदेहरा 6706 फूट उंचावर असून शिमल्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. येथे भारतातील सर्वात जुनं गोल्फ सेंटरही आहे. हे पर्यंटाकांमध्ये सर्वात सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे करण्यात आले आहे.
तत्ता पाणी :
शिमल्यापासून 51 किलोमीटर अंतरावर असलेलं तत्ता पाणी तेथील गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी ओळखलं जातं. येथील पाण्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. मासेमारीसाठी आणि आंघोळीसाठी पर्यटकांमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
कुफरी :
शिमल्यापासून 22 किलोमीटर अंतरावर कुफरी हॉर्स रायडिंग, Bungee Jumping, Rope Climbing आणि Ziplining करण्यासाठी लोकं येथे येतात.
फागू :
शिमलापासून 23 किलोमीटर अंतरावर हिंदुस्तान-तिबेट रोडवर असलेलं फागू नेहमी बर्फाची चादर पांघरलेलं असतं. ट्रेकिंगसाठी ही फार सुंदर जागा आहे.
नरकंडा :
नरकंडा शिमल्यापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सर्वात उंच शिखरावर हाटू पीक आहे. याची उंची 9017 फूट आहे. Trekking आणि स्कायकिंगसाठी येथे पर्यटक येत असतात.