या सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:07 PM2017-09-06T19:07:43+5:302017-09-06T19:14:38+5:30
आवड, तडजोड किंवा सोय यापैकी कारण कोणतंही असो रेल्वेचा प्रवास अनेकजण नेहेमी करतात. हा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी आपण आवर्जून घ्यायला हवी.
- अमृता कदम
विमानाचा प्रवास हा वेगवान, वेळ वाचवणारा असला तरी तो सगळ्यांनाच परवडतो असं नाही. वेगानं प्रवासाच आणखी एक साधन म्हणजे रेल्वे. हे केवळ एक साधन नसून प्रवासाचा हा मार्ग अतिशय लोकप्रिय आणि रंजकही आहे. रेल्वे प्रवासाची एक वेगळी गंमत आहे. पळती झाडं मागे टाकत एका विशिष्ट लयीत होणाºया प्रवासाता एक प्रकारचा रोमॅण्टिसिझम आहे.
अनेकदा योग्य कनेक्टिव्हीमुळेही लोक विमानाऐवजी रेल्वेला प्राधान्य देतात. आवड, तडजोड किंवा सोय यापैकी कारण कोणतंही असो रेल्वेचा प्रवास अनेकजण नेहेमी करतात. हा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी आपण आवर्जून घ्यायला हवी.
तुमचा रेल्वेचा प्रवास आठ तासांपेक्षा जास्त मोठा असेल तर काहीछोट्या पण चटकन लक्षात न येणा-या गोष्टीही फार उपयोगी ठरु शकतात. त्यामुळे रेल्वेचा प्रवास आनंददायक करायचा असेल तर या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
रेल्वेनं प्रवास करताना..
1. ट्रेनमधल्या प्रवासात सामानाची सुरक्षितता ही सगळ्यात आवश्यक बाब. ट्रेनमध्ये अनेकदा सामान चोरीला जाण्याची शक्यता असते. प्रवास अनेकदा 8-10 तासांपेक्षा मोठा असतो. शिवाय कधीकधी रात्रभरही प्रवास होतो. अशावेळी तुमचं सामान ट्रेनमधल्या बाकाखाली रॉडला बांधून ठेवलेलं चांगंलं, जेणेकरून ते पळवून नेण्याची संधी कुणाला मिळणार नाही.
2. ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही तुमच्या सवयÞीतली एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवायला हरकत नाही. थंडीच्या दिवसातल्या प्रवासात ती उपयोगी ठरतेच, शिवाय बेड रोल चांगल्या स्थितीतला नाही मिळाला, तर अशावेळी किमान आतून पांघरण्यासाठी अशा शाल किंवा चादरचा हमखास उपयोग होतो. आणि पांघरुणाअभावी रात्रभर कूस बदलत जागं राहावं लागत नाही.
3. ट्रेनच्या प्रवासात चांगलं खायला कसं मिळणार याची चिंता अनेकांना सतावते. किंबहुना अनेकजण केवळ या गोष्टीमुळेही ट्रेनचा प्रवास टाळतात. रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला ही सेवा पुरवतात. तुमच्या प्रवासादरम्यान जवळच्या रेल्वे स्टेशनवर ही डिलिव्हरी पोचवली जाते. थाळी मागवा, इडली डोसा, किंवा आणखी काही. हे सगळं तुम्हाला आॅनलाइनही उपलब्ध होऊ शकतं.
4. ट्रेनच्या एका बोगीत विविध त-हेची, स्वभावाची माणसं असू शकतात. त्यामुळे तुमच्या कोचवर शेजारचा प्रवासी हा शांत स्वभावाचाच मिळेल याची काही खात्री नाही. शिवाय उत्तम गप्पा मारणारा शेजारी मिळाला तर चांगलंच, नाहीतर काही लोकांची अखंड बडबड तुमचा प्रवास त्रासदायक आणि कंटाळवाणा करु शकते. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही तुमचा इअरफोन जरूर सोबत ठेवा. छान संगीत ऐकत तुमचा प्रवास सुखद होऊ शकतो. शिवाय रात्री झोपताना लाईट चालू-बंद करण्यामुळे झोपमोड होते. त्यासाठी रेल्वेनं प्रवास करताना आयमास्कही सोबत असू द्यावा.
5. आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळेची उपलब्धता ही समस्याच बनलीय. त्यामुळे ट्रेनच्या लांब प्रवासाचा सदुपयोग करावा. एखादं छोटं पुस्तक किंवा काही नवं शिकवणारी गोष्ट सोबत ठेवायला विसरु नका. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रवास कसा संपला हे कळणारही नाही, शिवाय तुमच्या ज्ञानातही भर पडेल.
6. ट्रेनच्या प्रवासात सकाळी 8 ते 9 या वेळेत बाथरु म सर्वात जास्त व्यस्त असतं. त्यामुळे थोडंसं लवकर उठून तुम्ही प्रात:विधी उरकणं महत्वाचं आहे. गर्दी टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.