प्रवासाला जाताना या गोष्टी थोड्या जास्तीच असू द्या तुमच्या बॅगेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:48 PM2017-11-09T15:48:45+5:302017-11-09T15:51:22+5:30
अत्यावश्यक गोष्टींच्या यादीत त्यांचा समावेश नक्की करा..
- मयूर पठाडे
नेहमीचा प्रश्न.. प्रवासाला जायचं तर किती सामान सोबत बरोबर न्यायचं? महिलांसाठी तर हा प्रश्न खरोखरच खूपच गंभीर असतो. अर्थातच तुम्ही प्रवासाला कुठे आणि किती दिवसासाठी जाताय यावर बरोबर किती सामान घ्यायचं हे ठरतं. अनेक प्रवासप्रेमी माणसं सांगतात, आपल्या सोबत कमीत कमी सामान ठेवावं. आपल्या बॅग कधीच ओव्हरपॅक करू नका. तुमच्या प्रवासाचा मजा त्यामुळे किरकिरा होईल आणि प्रवासाच्या आनंदापेक्षा तुमचा हमालच जास्त होईल. अगदी खरं आहे ते. दोन दिवसांच्या प्रवासासाठी चार चार, पाच पाच ड्रेस कशासाठी? तेवढं तारतम्य आपण बाळगायलाच हवं.
पण त्यालाही दुसरी एक बाजू आहे. बॅग ओव्हरपॅक करू नका, जास्त सामान बरोबर घेऊ नका, हे तर खरंच, पण काही गोष्टी खरंच जास्त घेणं गरजेचं असतं. या गोष्टी तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तर केव्हाही चांगलं..
काय आहेत अशा गोष्टी? फार थोड्या आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या. सॉक्स, अंडरवेअर्स, टॉप्स.. सॉक्सचे काही पेअर तर जास्तीचे हवेतच. बºयाचदा प्रवासात आपण कायम शूज घातलेले असतात. अशावेळी सॉक्सचा घाण वास येतो. ते वेळीच बदलावे लागतात. काही वेळा प्रवासात ऊन असलं तर खूप घाम येतो. इनरवेअर्सही घामानं ओले झाले तर त्यामुळे आपल्याला अगदी अनइझी होतं. दिवसभर तशाच अवस्थेत आपण फिरू शकत नाही. शिवाय या घामाचाही वास यायला लागतो.
जे टॉप किंवा शर्ट आपण घालतो, त्याचाही एखाद दुसरा जोड जास्तीचा असणं फायद्याचं ठरतं. कधी चहा-कॉफीच सांडली, त्याचा डाग पडला, धुळीमुळे ते खराब झाले, तर तसंच आपण बाहेर वावरू शकत नाही. त्यासाठी या कपड्यांचे काही जोड आपल्याकडे जास्तीचे हवेतच. अत्यावश्यक कपड्यांच्या यादीत याचा समावेश करायला हवा.
कोणतं सामान जास्त आणि कोणतं मोजकं याचं तारतम्य ठेवलं, तर आपला प्रवास मजेत होईल.