केवळ चार माणसाचं शहर.. पाहायचंय का तुम्हाला? मग कॅनडाला चला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:28 PM2018-01-11T18:28:28+5:302018-01-11T18:32:26+5:30

अतिशय निवांत जागी जाण्यासाठी एक ठिकाण आहे. हे असं शहर आहे जिथे केवळ चारच लोक राहातात.हे ठिकाण पाहायचं असेल, इथली शांतता अनुभवायची असेल तर फक्त कॅनडाला जावं लागेल इतकंच. कारण हे ठिकाण कॅनडात आहे.

Tilt Cove- City of four people | केवळ चार माणसाचं शहर.. पाहायचंय का तुम्हाला? मग कॅनडाला चला !

केवळ चार माणसाचं शहर.. पाहायचंय का तुम्हाला? मग कॅनडाला चला !

Next
ठळक मुद्दे* कॅनडामधलं टिल्ट कोव या शहरात पोस्ट आॅफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही या ठिकाणी आहे. पण तरीही या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात.* डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते.* नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा इथे फिरण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ. याच काळात इथलं हवामान फिरण्यासाठी सर्वांत योग्य असतं.

-अमृता कदम 


गावाकडून शहराकडे हा सध्याच्या धावपळीच्या जीवनाचा प्रवाह बनलाय. शहरांमध्ये रोजगाराच्या, पोटापाण्याच्या अनेक संधी असल्या तरी जगण्यासाठीची शांती मात्र सापडत नाही. त्यामुळेच शहरातले लोक या मानसिक शांतीच्या शोधात हिल स्टेशन किंवा छोट्याशा गावांकडे सुट्टीसाठी वळतात. अनेकदा आपल्या फिरण्यामागचं कारण असा निवांतपणा मिळावा हेच असतं. तुम्हीपण अशा निवांतपणाच्या शोधात असाल तर एका अतिशय भन्नाट ठिकाणाची ओळख तुम्ही करून घ्यायलाच हवी...एक अशी जागा ज्या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण असं ठिकाण खरंच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे.

 



कॅनडामधलं टिल्ट कोव

या भन्नाट शहराचं नाव आहे टिल्ट कोव. पोस्ट आॅफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही या ठिकाणी आहे. पण तरीही या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात. या चौघांचं राहाण्याचं कारणही काय, तर यांना या जागेची देखभाल करावी लागते. असं सांगतात की एकेकाळी हे शहर गजबजलेलं होतं, अनेक लोक इथे राहातही होते. पण 1967 मध्ये जेव्हा इथल्या खाणउद्योगावर संकट कोसळलं तेव्हा मात्र या शहराची स्थिती बदलली. शहर सोडून लोक दुस-या शहराच्या शोधात निघाले आणि टिल्ट कोव ओस पडू लागलं. तेव्हापासून या जागेच्या नशिबी केवळ एकांतवासच आहे. अर्थात कुठल्याही संकटात एक संधी लपलेली असते असं म्हणतात. या शहराच्या बाबतीतही तसंच झालं. कारण हे सुनंसुनं शहर पहायलाही लोकांची गर्दी होऊ लागलीये. लोक नसले तरी शहराची भौतिक रचना मात्र जशीच्या तशी राहिली आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी या सुन्यासुन्या शहरालाही दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

इथलं आकर्षण

डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या पर्वतराजी आणि त्यासोबत तितकेच सुंदर तलाव आणि झरे. इथे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचा आनंद लुटण्यासाठीही अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

 



कसे पोहचाल

कॅनडाला पोहचण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइटस उपलब्ध आहेत. कॅनडाच्या राजधानी टोरांटोपासून टॅक्सीनं अगदी दोन ते तीन तासांच्या अंतरावरच हे शहर आहे.

फिरण्यासाठी उत्तम काळ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा इथे फिरण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ. याच काळात इथलं हवामान फिरण्यासाठी सर्वांत योग्य असतं.
अर्थात, केवळ हे एकमेव शहर पाहण्यासाठी कॅनडाचं तिकीट काढणं परवडणारं नाही. पण जर कुठल्या निमित्तानं कॅनडामध्ये गेलाच तर मात्र हे अनोखं शहर पाहायला विसरु नका. ते तुम्हाला भूतकाळाच्या आठवणींमध्ये नक्की घेऊन जाईल.

 

 

Web Title: Tilt Cove- City of four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.