सुंदर जंगलांचं सुंदर ठिकाण नेतरहाट, शांत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:27 PM2019-01-04T16:27:45+5:302019-01-04T16:30:55+5:30
झारखंडचा हा परिसर आदिवासी बहुल आहे आणि जास्तीत जास्त परिसरात जंगल पसरलेलं आहे.
जंगलात फिरण्याची आणि निसर्गाचा वेगळाच आनंद घेण्याची तुम्हाला आवड असेल आणि फिरायला जाण्यासाठी अशा ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत. हिवाळ्यात नेतरहाट इथे तुम्ही जाऊन कधीही न अनुभवलेला आनंद घेऊ शकता.
नेतरहाटचा अर्थ
झारखंडचा हा परिसर आदिवासी बहुल आहे आणि जास्तीत जास्त परिसरात जंगल पसरलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची उंचच उंच झाडे आहेत. येथील स्थानिक भाषेत नेतरहाटचा अर्थ बांस का बाजार म्हणजेच बांबूचा बाजार असा होतो. इथे हिंदी आणि संथाली भाषा बोलली जाते. हे ठिकाण उन्हाळ्यात हैराण झालेल्या इंग्रजांनी शोधून काढलं होतं. फिरण्यासाठी इथे अनेक ठिकाणे आहेत.
सूर्योदय आणि सूर्यास्त
या डोंगराळ भागातील सर्वात मोठं आकर्षण येथील सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. तसे तर ही दृश्ये येथे कुठूनही पाहिली जाऊ शकतात. पण येथे हे पाहण्यासाठी काही खास स्पॉट्स आहेत. टूरिस्ट बंगला, हॉटेल प्रभात विहार इथे लोक गर्दी करतात.
अप्पर घाघरी फॉल
येथून ४ किमी अंतरावर अप्पर घाघरी फॉल आहे. डोंगराला चिरून येणारं पाणी पाहण्यात इथे वेगळीच मजा येते. हा धबधबा भलेही लहान असेल पण फारच सुंदर आहे. पर्यटक इथे आल्यावर लोअर आणि अप्पर घाघरी फॉल बघायला आवर्जून जातात. इथे पोहोचण्याचा रस्ता हा गावातून जातो आणि पक्का रस्ताही नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांची मदत घेऊन इथे पोहोचता येतं. पण इथे इंटरनेट अजिबात चालत नाही.
लोअर घाघरी फॉल
लोअर घाघरी फॉलमधून ३२० फूट उंचीवरुन पाणी खाली पडतं. या धबधब्याजवळ सुंदर निसर्ग आहे. या धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा येते.
मॅग्नोलिया सनसेट पॉईंट
नेतरहाटपासून साधारण १० किमी अंतरावर मॅग्नोलिया पॉईंट आहे. या सुंदर जागेसोबत एक प्रेम कथाही जुळलेली आहे. अशी प्रेमकहाणी जिथे प्रेमी युगुलाच्या जीवनाचा सूर्यास्त होतो. एका इंग्रज अधिकाऱ्याची मुलगी मॅग्नोलियाला एका गरीब मुलाशी प्रेम होतं. दोघांचं प्रेम चांगलंच बहरलेलं असतं, पण त्यांना सामाजिक मान्यता मिळत नाही. अशात त्या मुलाची हत्या होते. त्यानंतर मॅग्नोलियाही दरीत उडी घेत आपला जीव देते. ही कहाणी इथे मूर्तींच्या रुपात सांगण्यात आली आहे.
कधी जाल?
इथलं वातावरण नेहमीच चांगलं राहतं आणि इथे पाऊसही भरपूर होतो. येथील डोंगर फार जुने आहे त्यामुळे इथे भूस्खलनाची भीती नसते. वर्षातल्या कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही इथे जाण्याचा प्लॅन करु शकता.
कसे जाल?
रेल्वे आणि हवाई मार्गाने रांची सगळीकडे जोडलं गेलं आहे. त्यामुळे रेल्वेने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. रांचीला पोहोचल्यावर तुम्ही रस्ते मार्गे १५० किमीचं अंतर पार करुन नेतरहाटला पोहोचू शकता.