पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:54 AM2022-07-11T06:54:53+5:302022-07-11T06:55:22+5:30

डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

Tourists turn to rainy season tourism palghar district rainfall | पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

Next

तुकाराम रोकडे 
खोडाळा : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर पालघर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे पांढरेशुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहणाऱ्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक ग्रामीण भागात पोहोचतात. डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

मुसळधार पाऊस सुरू झाला की पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते ग्रामीण भागातील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्याचे. मग त्यांची पावले आपोआप धबधबे, धरणे व उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचे वातावरण हे सारे अनुभवण्यासाठी वळतात. पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. ढगांचा गडगडाट, थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि बहरलेला निसर्ग हे सर्व काही जुळून येते ते पावसाळ्यातच.

जूनमधील दोन-चार दिवसांचा पाऊस सोडला तर जुलैमध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षाच केली जात असतानाच पुनर्वसू नक्षत्रात पाऊस दोन-तीन दिवस धो-धो कोसळला अन् पावसाळी पर्यटक स्वच्छंद फिरण्यासाठी गावरानावर वळू लागला. 

पालघर-नाशिकचे धबधबे आकर्षण
पालघर तसेच नजीकच्या नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण, भावली धरण, भावली धबधबा, देवगाव परिसर, भंडारदरा धरण, खोडाळा, कळसूबाई, श्रीघाट, सूर्यमाळ, आमले घाट, अशोका धबधबा, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, जव्हार, इगतपुरी या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे या ठिकाणीही पावसाळ्यात गर्दी होत असते. कसारा घाटातील धुके अनुभवण्यासाठी सकाळपासूनच अनेक तरुण धुके अनुभवण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात.

Web Title: Tourists turn to rainy season tourism palghar district rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.