तामिळनाडूतलं ‘ट्रान्केबार’ हे गाव थेट युरोपातल्या एका देशात घेवून जातं. या गावात आहे डच संस्कृतीच्या अनेक खुणा.
By admin | Published: July 5, 2017 07:44 PM2017-07-05T19:44:59+5:302017-07-05T19:44:59+5:30
‘गाणाऱ्या लाटांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारंट्रान्केबार गाव तुम्हाला घेऊन जातं थेट युरोपमधल्या एका देशामध्ये म्हणजे डेन्मार्कमध्ये!
-अमृता कदम
तामिळनाडूमधल्या कारिकलपासून 15 किलोमीटर अंतरावर वसलं आहे एक छोटंसं गाव. ‘गाणाऱ्या लाटांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारं हे गाव तुम्हाला घेऊन जातं थेट युरोपमधल्या एका देशामध्ये म्हणजे डेन्मार्कमध्ये!
या गावाच्या प्रवेशद्वारापाशीच तुम्हाला इथल्या वेगळेपणाची कल्पना येते. या गावाच्या प्रवेशद्वाराचं स्थापत्य थेट डॅनिश शाही स्थापत्यशैलीची आठवण करु न देतं. जागोजागी डच संस्कृतीच्या खुणा बाळगणारं हे गाव आहे ट्रान्केबार. अर्थात ट्रान्केबार हे या गावाचं जुनं नाव आहे, डचांच्या काळातलं! तमीळ भाषेत या गावाचं नाव आहे थरंगमबाडी.
ट्रान्केबार गावात काय काय दिसतं?
17 व्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या डचांनी पॉंडिचेरीमध्ये आपली व्यापारी केंद्र उभारायला सुरूवात केली होती. त्याच काळात ओव्ह गिड नावाच्या डॅनिश अॅडमिरलला या गावातल्या शांत, सुंदर, निवांत किनाऱ्यांनी आकर्षून घेतलं. त्यामुळे तंजावरच्या महाराजांकडून व्यापारी हक्क मिळाल्यानंतर इथे एक किल्ला बांधण्याचं ठरवलं. हा किल्ला ‘फोर्ट डान्सबोर्ग’ म्हणून ओळखला जातो.
व्यापाराचा विस्तार करताना युरोपीयन सत्तांचं अजून एक उद्देश होतं, ते म्हणजे धर्मांतर. मग डचही त्यात कसे मागे राहतील? धर्मांतरासाठी हे लहानसं गाव सोपं लक्ष होतं. धर्मांतराबरोबरच इथे ख्रिश्चन आस्था- प्रतीकंही आली. युरोपियन वळणाची चर्चेस आजही इथे दिमाखात उभी आहेत.
तुम्ही विचाराल फिरण्याचं तर ठीक आहे, पण या छोट्या गावात राहण्याची सोय काय? समुद्रकिनाऱ्यावरचे टुमदार बंगले तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या बंगल्यांमध्ये राहताना डेन्मार्कमध्ये राहण्याचा अनुभव नक्की येईल. कारण यातले अनेक बंगले हे डचांनी वसाहती वसवण्याच्या काळातले आहेत.
फारसं प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन नसल्यामुळे बऱ्याचजणांना इथपर्यंत कसं यायचं हे माहित नसेल. ट्रान्केबारला पोहचण्यासाठी तुम्हाला आधी चेन्नईला जावं लागतं. चेन्नईवरु न ट्रान्केबारला जाण्यासाठी ट्रेन्स आहेत. किंवा चेन्नईहून त्रिचीला जाणाऱ्या फ्लाईट्सही आहेत. त्रिचीपासून ट्रान्केबार तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. प्रवास लांबचा असला तरी या गावामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचा सगळा शिणवटा विसरून निवांतपणाचा अनुभव घ्याल हे नक्की!