BLOG: सायकलिंग ट्रॅक, शिल्पकलेचे नमुने, गुलाबाचे ताटवे; ही स्मशानभूमी आहे की गार्डन...?
By अतुल कुलकर्णी | Published: October 19, 2021 06:39 PM2021-10-19T18:39:59+5:302021-10-19T18:42:31+5:30
4 नोव्हेंबर 1876 रोजी ही स्मशानभूमी सुरू झाली. आजपर्यंत येथे जवळपास 1,75,000 हजार लोकांनी चिरविश्रांती घेतली आहे.
>> अतुल कुलकर्णी
टोरोंटोमध्ये मी फिरायला जायचे म्हणून निघालो... रस्त्यात पार्ककडे जाण्याचा रस्ता अशी पाटी दिसली... चला, आज पार्कात फिरू म्हणून आत गेलो... तेथे काही लोक छोट्या बाळांना बाबागाडीत बसवून फिरायला आलेले... काही वयोवृद्ध नागरिकही तिथे फिरत होते... तर काही जॉगिंग करत होते... काही तरुण कपल्स तेथे असणाऱ्या बेंचवर बसून घरून आणलेले डबे खात होते... कोणत्याही सर्वसाधारण उद्यानात जसे दृश्य असते ते या ठिकाणी होते. उत्सुकतेने आम्ही आत गेलो. आतमध्ये त्या गार्डनचा नकाशा दिसला... कुठे काय आहे हे पाहावे म्हणून नकाशाजवळ गेलो आणि त्यावर लिहिलेले वाचून धक्काच बसला. ते गार्डन नसून स्मशानभूमी होती. हा धक्का भारतीय मानसिकतेला तडा देणारा होता.
ती होती कॅनडाच्या सर्वात ऐतिहासिक स्मशानभूमींपैकी एक अशी माऊंट प्लेझेंट स्मशानभूमी..! 1876 साली तिची उभारणी एका खाजगी कंपनीने केली. ही स्मशानभूमी म्हणजे माजी पंतप्रधान विल्यम ल्योन मॅकेन्झी किंगसह अनेक प्रमुख कॅनेडियन लोकांचे अंतिम विश्रांती ठिकाण आहे. कॅनडाची पहिली महिला सर्जन जेनी स्मिली-रॉबिन्सन, लोकप्रिय मॅटिस कलाकार यंगफॉक्स, आणि प्रसिद्ध पियानोवादक ग्लेन गोल्ड यांना देखील इथेच अंतिम विश्रांतीसाठी आणले गेले...! इथे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ झाडांमुळे ही जागा उत्तर अमेरिकेतील सर्वात महत्वपूर्ण बोटॅनिकल गार्डनपैकी एक म्हणून ओळखली जाते. 4 नोव्हेंबर 1876 रोजी ही स्मशानभूमी सुरू झाली. आजपर्यंत येथे जवळपास 1,75,000 हजार लोकांनी चिरविश्रांती घेतली आहे. टोरंटोच्या माऊंट प्लेझंट स्मशानभूमीत जर तुम्हाला दफन करण्यासाठी जागा हवी असेल तर तेथे एका प्लॉटची किंमत अंदाजे 15 ते 25 हजार डॉलर असते. तर शहराबाहेरील स्मशानभूमीमध्ये तुम्हाला कायमच्या चिरविश्रांतीसाठी हजार डॉलर मोजावे लागतात.
ही जागा केवळ खडकाच्या किंवा दगडांच्यामधून जाणारा वॉकिंग ट्रॅक एवढी मर्यादित नाही. शहराच्या मध्यभागी 205 एकर जागेवर पसरलेल्या या स्मशानभूमीभोवती टोरोंटोच्या भूतकाळातील भला मोठा प्रवास आहे. कॅनडासाठी हे एक राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ आहे. जुनी दफनभूमी ही ऐतिहासिक वास्तुकलेचे नंदनवनच नाही तर धावपटू आणि सायकलस्वारांसाठी आदर्श पायवाट आणि देशात कॅनडातील उल्लेखनीय व्यक्तींची अंतिम विश्रांतीची जागा देखील आहे. या ठिकाणी एक, तीन आणि पाच किलोमीटरचे वॉकिंग ट्रॅक आहेत. तिथे तुम्ही सायकलिंगही करू शकता. फुलांच्या मोठ्या बागा, वेगवेगळ्या जातीचे पक्षी आणि वन्यजीव या परिसराचे सौंदर्य वाढवतात. कलाकारांनी बनवलेल्या शिल्पकलांचा अप्रतिम नमुना येथे पाहायला मिळतो. डेव्हिसव्हिल स्टेशन वरून जाताना ही स्मशानभूमी दिसते. 2000 मध्ये या स्मशानभूमीला कॅनडाचे राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित केले गेले. इराकमधील नजफ ही जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. पाच लाखांहून अधिक लोक तेथे दफन आहेत. त्यात बहुसंख्य शिया मुस्लिम आहेत.
टोरोंटोच्या या स्मशानभूमीत फुलांच्या बागा आहेत. गुलाबाचे ताटवे आहेत. कारंजी आहेत. फॉरेस्ट ऑफ रिमेब्रन्स नावाचे झाडांचे एक स्टँड आहे. जिथे राख दफन केली जाऊ शकते. ग्रॅनाईट, संगमरवरी आणि लाकडी कलाकुसरीचे काम येथे पाहायला मिळते. जॉर्जियन वास्तुकलेची अनेक उत्तम उदाहरणे येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे येथे लोक फिरायला येतात. अगदी नवजात बालकापासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण येतात. बागेमध्ये बसतात. डबे खातात. घरात एखादी आनंदाची किंवा दुःखाची घटना घडली तर लोक येथे येऊन आपल्या दफन केलेल्या नातेवाईकांना ती गोष्ट सांगतात. एखादा रविवार आपल्या दफन केलेल्या नातेवाईकांसोबत घालवावा म्हणूनही अनेकजण येतात. मनातल्या अनेक गोष्टी त्यांना सांगून मन मोकळं करतात... माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता...!
आपल्याकडे ज्या पद्धतीच्या स्मशानभूमी पाहायला मिळते, तिथली अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे जाणारा तर जातोच... मात्र जाणाऱ्याला शेवटचा निरोप देण्यासाठी जाणाऱ्यांनाही जीव नकोसा होतो. आपल्याकडच्या स्मशानभूमीत असे दृश्य कधी पाहायला मिळेल...? आपण साध्या गोष्टी देखील इतक्या किचकट आणि बिकट का करून ठेवतो कळत नाही. आपल्याकडे अशा स्मशानभूमी करता येतील का...?