बाळ लहान असलं तरीही बिनधास्त प्रवास करा... फक्त एवढी काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:54 PM2017-09-12T18:54:43+5:302017-09-12T18:54:43+5:30

काही गोष्टींची काळजी घेतली तर बाळांना घेऊनही लांबचा जवळचा कोणताही प्रवास सुखकर होऊ शकतो. बाळ सोबत आहे म्हणून प्रवास टाळण्याचं कारणच उरत नाही.

Traveling with baby.. No problem.. Only take care of this | बाळ लहान असलं तरीही बिनधास्त प्रवास करा... फक्त एवढी काळजी घ्या..

बाळ लहान असलं तरीही बिनधास्त प्रवास करा... फक्त एवढी काळजी घ्या..

googlenewsNext
ठळक मुद्दे* वजनाला हलका, फोल्ड करता येईल असा बेबी स्ट्रोलर नेहमी सोबत ठेवा. त्यामुळं तुम्हाला बाळाला घेऊन फिरणं सोयीचं होईल.* प्रवासामध्ये बाळासाठी आवश्यक असं बेबी लोशन, मॉश्चरायझर बरोबर घ्या. हवामानातल्या बदलामुळे बाळांच्या नाजूक त्वचेवर लगेचच परिणाम होऊ शकतो.* बेबी फूड, मिल्क पावडर आणि दूधासारखे पातळ पदार्थ सांडणार नाहीत अशा डब्यांमध्येच भरा. केवळ खाद्यपदार्थांसाठीच बनवलेल्या पॉलिप्रोपिलिन कंटेरनरचा वापर तुम्ही करु शकता.

- अमृता कदम



करीना कपूर, सैफ अली खान असो की शाहीद कपूर, मीरा राजपूत असो. यांनी धड वर्षही पूर्ण न झालेल्या आपल्या बाळांना थेट परदेशातली सैर करून आणली. नाहीतर आपण. लहान बाळासोबत 40 किमी अंतरावरच्या गावाला जायचं म्हटलं तरी बाळाच्या काळजीनं घरातून पाय निघवत नाही. इतक्या लहान बाळाला घेऊन प्रवास कसा करायचा? प्रवासात त्याचं खाणं-पिणं कसं सांभाळायचं? त्याची काळजी कशी घ्यायची? असे अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे मग मुलं मोठी झाल्याशिवाय कुठे फिरायला जायलाच नको असं बायका जाहीर करून टाकतात आणि काही काही तर तसं वागतातही. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर बाळांना घेऊनही लांबचा जवळचा कोणताही प्रवास सुखकर होऊ शकतो.

बाळासोबत प्रवास करताना

1. बेबी स्ट्रोलर सोबतच असू द्या

वजनाला हलका, फोल्ड करता येईल असा बेबी स्ट्रोलर नेहमी सोबत ठेवा. त्यामुळं तुम्हाला बाळाला घेऊन फिरणं सोयीचं होईल. तुम्ही शॉपिंग साठी फिरत असाल किंवा दुस-या कुठल्या कामात असाल तर बाळाला स्टोलरमध्ये ठेवू शकता. त्यामुळे तुम्हालाही मोकळेपणानं फिरता येईल आणि बाळालाही ढकलगाडीत बसण्याचा आनंद मिळेल.


 

2. ‘स्कीन केअर’ विसरु नका

प्रवासामध्ये बाळासाठी आवश्यक असं बेबी लोशन, मॉश्चरायझर बरोबर घ्या. हवामानातल्या बदलामुळे बाळांच्या नाजूक त्वचेवर लगेचच परिणाम होऊ शकतो. तसंच खास बाळांसाठीचे वेट वाइप्सही सोबत असू द्या. थोड्याथोड्या वेळानं वेट वाइप्सनं बाळाला पुसून घेतलं की त्यांनाही फ्रेश वाटतं. हॉटेलमधले साबण किंवा बॉडी वॉश बाळांसाठी वापरु नका. त्यामुळे त्यांना एलर्जी देखील होऊ शकते.

3.इनफ्लॅटेबल मॅट्रेसेस वापरा

कारमधून प्रवास करत असताना बाळाच्या आरामासाठी इनफ्लॅटेबल मॅट्रेस हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल अनेक गाड्यांच्या सीटची रचनासुद्धा बाळांना आरामात बसता येईल, इकडून तिकडे लोळता येईल अशी असतेच. पण तरीही मॅट्रेस सोबत ठेवणं केव्हाही चांगलंच. या मॅट्रेस पोर्टेबल आणि वागवायलाही सोप्या असतात. त्याच्यामुळे बाळ एकदम शांतपणे झोपू शकतं आणि झोपेत ते सीटवरून खाली पडेल ही धाकधूकही राहात नाही.

 

4. बाळाची वरचेवर तपासणी करत राहा

प्रवासात बदलत्या वातावरणात बाळाची तब्येत नीट आहे का नाही हे मधूनअधून तपासत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ‘कॉन्टॅक्टलेस इन्फ्रारेड थर्मामीटर’ची मदत होऊ शकते. हा थर्मामीटर तीन ते पाच सेंटिमीटरच्या अंतरावरूनच तापमान मोजतो. शिवाय त्यामध्ये साधारण 30 ते 32 नोंदी राहू शकतात. त्यामुळे बाळाच्या शरीराचं आधीचं तापमान आणि नंतरचं तापमान यात किती फरक आहे, हेसुद्धा तुम्हाला कळू शकतं.

5. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता पाळा

लहान बाळांना जंतुसंसर्ग चटकन होतो. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. त्यांना वरचेवर नीट पुसून घेण्यासोबतच त्यांचे कपडेही अधूनमधून बदला. घामामुळे किंवा ओलसरपणामुळे बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच बाळांचे कपडे स्वच्छ आणि कोरडे असणं गरजेचं आहे. डायपरही किती ओला झालाय, किती खराब झालाय तेही तपासत राहा.

6. बाळाचं खाणं वेगळं आणि नीट ठेवा

बेबी फूड, मिल्क पावडर आणि दूधासारखे पातळ पदार्थ सांडणार नाहीत अशा डब्यांमध्येच भरा. केवळ खाद्यपदार्थांसाठीच बनवलेल्या पॉलिप्रोपिलिन कंटेरनरचा वापर तुम्ही करु शकता. त्यातून काहीही बाहेर सांडतही नाही आणि पदार्थ नीट टिकतात, खराब होत नाहीत.

7. नॅसल एस्पिरेटरचा वापर करा

वातावरणातल्या बदलामुळे बाळाला सर्दी, नाक चोंदण्यासारखे त्रास होतात. त्यामुळे श्वास घ्यायला अडचण होऊ शकते. बंद नाक मोकळं करायला नॅसल एस्पिरेटरची मदत होते. बॅटरीवर चालणारे एस्पिरेटर घ्या, म्हणजे एकदा चार्ज करून तुम्हाला ते दिवसभर सोबत बाळगता येईल.

8. बाळांना स्तनपान करण्याचा सोपा मार्ग

बाहेर बाळाला स्तनपान करायला द्यायला ब-याचजणींना संकोच वाटतो. त्यावरचा सोपा उपाय म्हणजे ब्रेस्ट पंप. ते मॅन्युअल किंवा इलेक्ट्रिक  अशा दोन्ही स्वरु पात मिळतात. गरज असेल तेव्हा वापरायचे आणि नंतर काढून स्वच्छ करु न ठेवायचे, इतकं सोपं काम आहे.

मूल मोठ्ठं झाल्यावर फिरू म्हणण्यापेक्षा आता मुलाला सोबत घेऊन फिरण्याचा आनंद घेण्याची सवय लावून घ्या. अत्याधुनिक साधन-सोयींच्यामुळे ही गोष्ट सहज शक्यही आहे.

 

 

Web Title: Traveling with baby.. No problem.. Only take care of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.