काश्मीरमध्ये ट्युलिप बहरलाय, मग जायचं का?

By admin | Published: April 12, 2017 01:41 PM2017-04-12T13:41:46+5:302017-04-12T13:41:46+5:30

46 वेगवेगळ्या जातींचे 20 लाखांहून अधिक ट्यूलिप असलेलं आशियातलं सगळ्यात मोठं ट्यूलिप गार्डन आहे. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे गार्डन 5 एप्रिलपासून खुलं झालं आहे.

Tulip grew in Kashmir, so why not go? | काश्मीरमध्ये ट्युलिप बहरलाय, मग जायचं का?

काश्मीरमध्ये ट्युलिप बहरलाय, मग जायचं का?

Next


- अमृता कदम

46 वेगवेगळ्या जातींचे 20 लाखांहून अधिक ट्यूलिप असलेलं आशियातलं सगळ्यात मोठं ट्यूलिप गार्डन आहे. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे गार्डन 5 एप्रिलपासून खुलं झालं आहे. ट्युलिपचा बहर आणि काश्मीरचं सौदर्य यांचा मेळ बघण्याचा योग जुळून आला आहे.


काश्मीरमध्ये सध्या अशांततेचं वातावरण आहे. पण तरीही पर्यटकांचं या नंदनवनाबद्दलचं आकर्षण कमी होत नाही. या आकर्षणामध्ये आता भर पडली आहे, ट्यूलिप गार्डनची. 46 वेगवेगळ्या जातींचे 20 लाखांहून अधिक ट्युलिप्स असलेलं हे गार्डन आशियातलं सगळ्यांत मोठं ट्युलिप गार्डन आहे. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी यंदा हे गार्डन 5 एप्र्रिलपासून खुलं झालं आहे.


हे गार्डन खुलं झाल्यानंतरच 15 दिवसांच्या ट्युलिप फेस्टिव्हलचाही आरंभ झाला आहे. गेल्या वर्षी दहशतवादी बुऱ्हान वानीच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली, त्यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला बराच फटका बसला होता. खोऱ्यातील पर्यटनाची झालेली ही हानी भरु न काढण्याचा भाग म्हणून बहार-ए-काश्मीर या उपक्रमाला सुरूवात झाली. या बहार-ए-काश्मीर अंतर्गतच या ट्युलिप फेस्टिव्हलचीही सुरूवात झाली आहे.


इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या ट्युलिप गार्डनचं पूर्वीचं नाव सिराज बाग. 2008 साली या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं. हिमाच्छादित पर्वतरांगांच्या पायथ्याशी तब्बल 30 एकरांच्या परिसरात हा बगीचा पसरला आहे. काश्मीरमधला पर्यटनाच्या दोन महिन्यांच्या कालावधीचा राज्याला आर्थिक दृृष्ट्या अधिकाधिक फायदा करून घेण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेली बाग पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे.


गेल्या वर्षी जवळपास पावणेदोन लाख पर्यटकांनी या बागेला भेट दिली. त्यातून 58 लाखांचा महसूल राज्याला मिळाला. यंदा तीन लाख पर्यटक ट्युलिप गार्डनला भेट देतील असा राज्याच्या पर्यटनविभागाचा अंदाज आहे. काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात पावसानं थैमान घातलं, ते पाहता पर्यटकांच्या संख्येवर फरक पडू शकतो. पण वातावरण पुन्हा आल्हाददायक निर्माण झाल्यानंतर गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास पर्यटन विभागाला आहे. ट्युलिप फुलांचं आयुष्य अवघं तीन ते चार आठवड्यांचं असतं. त्या कालावधीत जितके जास्त पर्यटक काश्मीरला भेट देतील, तितकं चांगलं!


बहार-ए-काश्मीर आणि ट्युलिप फेस्टिव्हलमध्ये पारंपरिक काश्मिरी खाद्यपदार्थांचा तसेच हस्तवस्तूंचेही स्टॉल्स असतील. ‘आलमी मुशायरा’ या कार्यक्र माचंही आयोजन ट्युलिप फेस्टिव्हलमध्ये केलं आहे. ज्यामध्ये जागतिक कीर्तीचे कवी त्यांच्या उर्दू रचना सादर करतील.


काश्मीरमधल्या दहशतवादाच्या समस्येपलीकडे जाऊन काश्मीरची कला, संस्कृती, परंपरा इतर देशवासीयांपर्यंत तसेच परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ट्युलिप गार्डन आणि फेस्टिव्हलच्या निमित्ताने केला जात आहे. तुमची उन्हाळ्याची सुटी अजून प्लॅन झाली नसेल तर अजूनही हातात बराच वेळ आहे, बहरलेल्या ट्युलिप गार्डनची सैर करण्यासाठी!


 

Web Title: Tulip grew in Kashmir, so why not go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.