व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

By किरण अग्रवाल | Published: December 11, 2023 03:41 PM2023-12-11T15:41:44+5:302023-12-11T15:49:21+5:30

अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात. 

Vietnam an emerging tourist destination, favourite among indians as rupee is bigger than vietnam dong | व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

>> किरण अग्रवाल 

विदेशात जायचे म्हटले की सर्वात पहिले चिंता सतावते ती तेथील भाषेची व खर्चाची. यातही भाषेची अडचण आता निकाली निघाली आहे, कारण परस्परांचा संवाद हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करून देणारे ॲप्स आता निघाले आहेत. राहिला प्रश्न खर्चाचा, तर एक देश असाही आहे जेथे तुम्ही आपले अवघे पाचशे रुपये घेऊन जरी गेलात तरी तेथील चलनात तुम्ही मालामाल होतात व लखपती ठरतात. व्हिएतनाम हे त्या देशाचे नाव. 

अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला युद्धात झुंजवून हरवणारा देश म्हणून व्हिएतनामकडे पाहिले जाते. सुमारे वीस वर्षे चाललेल्या युद्धात अमेरिकेचे ५० हजाराहून अधिक सैनिक बळी गेले. अखेर अमेरिकेने युद्धातून माघार घेतली व १९७५ मध्ये दक्षिण व उत्तर व्हिएतनाम एकत्र झाले. त्यामुळे अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात. 

भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामी चलन 'डॉन्ग'चे मूल्य खूपच  कमजोर आहे. भारतीय एक रुपया म्हणजे व्हिएतनामचे २८० ते २८५ डॉन्ग होतात. या हिशेबाने विचार करता अवघे पाचशे रुपये जरी आपण तेथे घेऊन गेलोत तरी १ लाख ४० हजार ४०० डॉन्ग आपल्या खिशात येतात. दहा हजाराचे तब्बल २८ लाख होतात. त्यामुळे आम्हीही व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेलो असता तेथील राजधानी हनोईच्या विमानतळावर उतरल्यावर 'मनी एक्सचेंज' करून ५० हजारात थेट करोडपती बनलो. अर्थात हे मूल्य डॉन्ग मध्ये असते, त्यामुळे खर्च करताना साधारणतः भारतीय मूल्याच्या थोड्याफार कमी अधिक फरकानेच हजारो डॉन्ग खर्चावे लागतात. या डॉन्गवर हो चि मिन्ह यांचे छायाचित्र असते. उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोघांना एकत्र आणणारे मिन्ह यांना तेथे मोठा मान आहे. हानोई मधील 'माझोलियम'मध्ये त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. 

दीर्घकालीन युद्धाचा इतिहास असलेला हा देश त्यासंबंधीच्या जखमा व वेदना विसरून आता वेगाने विकासाकडे आगेकूच करीत आहे. भारतातून सुमारे ५०/६० हजाराच्या पॅकेजमध्ये थायलंड, दुबई, मलेशिया, इंडोनेशिया आदि ठिकाणी विदेश वारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांना नवीन डेस्टिनेशन म्हणून अलीकडे व्हिएतनाम मोठ्या प्रमाणात खुणावू लागले आहे. सुमारे दहा कोटी लोकसंख्येच्या या देशाला तीन हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने निसर्ग सौंदर्याची जणू लयलूटच या देशात अनुभवयास मिळते. 

पाण्याने वेढलेल्या पर्वतराजींचे व युनेस्को प्रमाणित 'हा लॉंग बे' व क्रूझने त्यातील फेरफटका, राजधानीचे शहर व मध्यवस्तीतून जाणाऱ्या रेल्वेचे आकर्षण असलेले 'ह नोई', सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी व ड्रॅगन ब्रिजवरील आतिषबाजीसाठी प्रख्यात असलेले 'दा नांग', पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्याकडे पाहता यावे असे धुक्यात हरविणारे 'बाना हिल्स', भल्या मोठ्या बास्केटच्या आकारातील गोल बोटीत बसून भ्रमंती करायला मिळणारे 'कोकोनट व्हिलेज', सा पा डोंगर, मेकाँग आयलंड, भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून असलेला 'मिसान' डोंगराळ प्रदेश, ओल्ड सिटी म्हणून युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित व आकाश कंदीलांनी सजलेल्या बोटीतून प्रवासाचा आनंद देणारे 'होई अन' आदी अनेक ठिकाणे आहेत, जेथे भेटी देता येऊ शकतात. निसर्गाला जपत व त्यासोबत विकासाशी सांगड घालत हा देश प्रसन्नता व बहारदार पर्यटनासाठी वेगाने डेव्हलप होत असल्याने व्हिएतनाममधील ट्रिप संस्मरणीयच ठरते. 

(कार्यकारी संपादक, लोकमत अकोला)
 

Web Title: Vietnam an emerging tourist destination, favourite among indians as rupee is bigger than vietnam dong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.