निसर्गाचे वरदान लाभलेला पेब गड
By नामदेव मोरे | Published: June 4, 2023 01:22 PM2023-06-04T13:22:29+5:302023-06-04T13:23:05+5:30
माथेरानच्या डोंगररांगेतील निसर्गाचे वरदान लाभलेला टुमदार किल्ला म्हणजे पेब अर्थात विकटगड. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांसाठी सर्व ऋतूमधील एक दिवसाच्या भटकंतीसाठी हा उत्तम पर्याय असला, तरी पावसाळ्यात पेबच्या भटकंतीसाठी पर्यटक विशेष प्राधान्य देत असतात.
- नामदेव मोरे
सुराज्यातील धान्य कोठार अशी ओळख असलेल्या या किल्ल्याच्या कड्यावरील गणपतीही विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील पुरातन बांधकामांचे अवशेष हा जसा अभ्यासाचा विषय आहे, त्याच पद्धतीने गडावरील मंदिरे व आकर्षक मूर्ती हाही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. पेब गडावरील गणरायाची मूर्तीही अशीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. माथेरानच्या मिनी ट्रेनचा ट्रॅक ओलांडून गडाकडे जाताना डोंगराच्या सुळक्यालाच गणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. हा सुळका रंगवल्यामुळे खडकामध्ये गणपतीची भव्य मूर्ती कोरल्याचा भास होतो.
कर्जतच्या डोंगररांगेत असलेल्या पेब किल्ल्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. घनदाट जंगलाच्या माथ्यावरील पेबचा ट्रेक करताना पर्यटकांना निसर्ग सौंदर्य मोहित करते. स्वराज्याच्या काळात गडावर धान्याचा साठा ठेवला जायचा. याविषयी उल्लेख इतिहासामध्ये सापडतो.
गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या पुढे महादेवाचे मंदिर असून, त्याच्या भिंतीवरही पेबी देवीची मूर्ती कोरलेली आहे. टाक्यांच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरण्यात आली आहे. पावसाळ्यात गड व परिसराचे निसर्गसौंदर्य अवर्णनीय असल्यामुळे या कालावधीमध्ये पेब किल्ल्यावर भटकंतीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असते.
तटबंदीसाठी शिडी
गडावर तटबंदीचे अवशेष पाहता येतात. गडावर एक मोठी गुहा व त्याच्या वरील बाजूला छोटी गुहा आढळते. तटबंदी चढून जाण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो. गडावर पुरातन बांधकामांचे अवशेष, दत्ताच्या पादुका आढळतात.
कसे जाल?
नेरळ रेल्वे स्टेशनला उतरून एक वाट माथेरानला व दुसरी वाट पेब किल्ल्याकडे जाते. धबधबा, टॉवर्सला लागून असलेली वाट व मधील वाट अशा तीन वाटा असून, मधल्या वाटेने गडावर सहज जाता येते.
काय पाहाल?
पेब किल्ल्याच्या पायथ्याशी पेबी देवीचे मंदिर आहे. गडावरील कड्याला गणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. भव्य गणपती हे किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण, गडावरील तटबंदी, गुहा, छोट्या गुहा, मंदिर, त्यावरील मूर्ती, दत्ताच्या पादुका व गडावरून दिसणारा माथेरान ते पनवेलपर्यंतचा परिसर पाहण्यासारखा आहे.