पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील गोवळकोट किल्ल्याला एकदा नक्की द्या भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:12 PM2020-02-12T18:12:44+5:302020-02-12T18:15:47+5:30
फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास आणि वेगळ्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास आणि वेगळ्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ऐतिहासीक ठिकाणं, किल्ल्यांना भेटी द्यायला आणि फेरफटरका खूप लोकांना आवडत असतं. तुम्ही सुद्धा किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर गोवळकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. चला तर मग जाणून घेऊया कुठे आहे गोवळकोट किल्ला.
चिपळूण हे मुंबई-पणजी महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे. तसेच चिपळूण कोकण रेल्वेनेही जोडलेले आहे. चिपळूण जवळ वशिष्ठी नदीची खाडी आहे. व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेल चा गोपाळगड तर खाडीच्या अंतर्भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला.
गोवळकोट उर्फ गोविंदगड असे या किल्ल्याचे नाव आहे. हा किल्ला अत्यंत लहानसा आहे. चिपळूणपासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिन्ही बाजुनी वस्ती आहे.चिपळूणच्या बाजारपेठेतून गडाकडे जाणारा मार्ग गाडीमार्ग असून खाजगी वाहने पायथ्यापर्यंत जातात.
गडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिर आणि त्याचे प्रांगण उत्तम प्रकारे सुशोभित केलेले आहे. पुर्वी या भागामधे करंजाची भरपूर झुडुपं होती. या झुडुपांमधे देवी प्रकटली म्हणून तीचे नाव करंजेश्वरी देवी पडले. या आठव्या शतकातील मंदिराचा सध्या जिर्णोद्धार करण्यात आला असून तेथे रहाण्याचीही उत्तम व्यवस्था आहे. मोक्याच्या जागी असलेल्या गोवळकोट किल्ल्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात आणून दुरुस्ती केली होती. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)
या ठिकाणीच जलशुद्धीकरण प्रकल्पाची भव्य इमारत आहे. या प्रकल्पाजवळून पाच दहा मिनिटांच्या काहीशा चढाव्यावर किल्ल्याची तटबंदी दिसते. या तटबंदीमधील दरवाजा मात्र नष्ट झालेला आहे. दोन्ही बाजूचे दोन बुरुज धरुन उभे आहेत. यातील डावी कडील बुरुजावर झेंडयाचा खांबावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. झेंड्याखालीच तोफही आहे. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्याड आहेत. उजवीकडील बुरुजावरही मोठय़ा आकाराच्या दोन तोफा पडलेल्या आहेत.बुरुजाच्या बाजुला असलेल्या उंचवटय़ावरुन गडाचा पुर्ण देखावा दिसतो. या किल्ल्याच्या आवारात तलाव सुद्धा आहे. तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर कोकण रेल्वेने आरामदायक प्रवास करून या ठिकाणी जाऊ शकता. ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)