डेहराडूनमधल्या रामगढ गावात जा ....फिरण्यासोबतच शेतीही शिकून या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:32 PM2017-11-30T18:32:46+5:302017-11-30T18:39:31+5:30
उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये अशी एक जागा आहे. याठिकाणी पर्यटक शेती शिकण्यासाठी येतात. आॅरगॅनिक फार्मिंग अर्थात जैविक शेतीमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डेहराडूनमधल्या या छोट्याशा गावाचं नाव आहे रामगढ. हे रामगढ शोले फिल्ममधलं नसलं तरी आहे मात्र तितक्याच कमालीचं.
- अमृता कदम
फिरायला जाण्याचा मुख्य उद्देश हा रोजच्या धकाधकीतून बाहेर पडून निवांतपणा अनुभवण्याचाच असतो. त्यामुळे ब-याचदा पयर्टकांचा कल हा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याकडेच असतो. पण निसर्गाला अनुभवण्यासोबतच त्याचा भाग होण्याची, त्यामध्ये समरसून जाण्याची संधी तुम्हाला मिळाली तर? उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये अशी एक जागा आहे. याठिकाणी पर्यटक शेती शिकण्यासाठी येतात. आॅरगॅनिक फार्मिंग अर्थात जैविक शेतीमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डेहराडूनमधल्या या छोट्याशा गावाचं नाव आहे रामगढ. हे रामगढ शोले फिल्ममधलं नसलं तरी आहे मात्र तितक्याच कमालीचं.
देहरादूनजवळच्या या छोट्याशा गावात काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की लोक गावात राहायला तयार नव्हते. रोजगाराची साधनं उपलब्ध नसल्यानं स्थलांतराचं प्रमाण वाढलं होतं. गाव अगदी सुनसान होत चाललं होतं. पण हळूहळू इथे जैविक शेतीची बीजं रोवली गेली. त्यानंतर चित्र पालटलं. आज इथे पर्यटक केवळ फिरायलाच येत नाहीत तर या जैविक शेतीतले बारकावे शिकायलाही ते येतात.
दरवर्षी देशातलेच नव्हे तर अगदी जपान, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, अमेरिकेतूनही हजारो विद्यार्थी या गावाला भेट देतात. या छोट्याशा गावात राहून जैविक शेती करण्याचा अनुभव त्यांना विलक्षण आनंद देतोय. इथे राहून जैविक शेती जवळून पाहण्याची, स्वत: शेतक-याना त्यांच्या कामात मदत करायची संधी त्यांना मिळते. पर्यटकांना राहण्यासाठी गावात खास व्यवस्था केली जाते. संख्या जास्त असेल तर अगदी कॅम्पही लावले जातात. मग अगदी एकत्रितपणेच सगळे भोजन बनवतात. गप्पांच्या मैफलीत रात्र जागवतात. आनंदाबरोबरच या नव्या प्रकारच्या शेतीची किती आवश्यकता आहे याबद्दल त्यांच्या मनात जागृतीही वाढतेय.
डेहराडूनसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वसल्यामुळे रामगढच्या आसपास फिरण्यासाठीचीही अनेक ठिकाणं आहेत. शेतीच्या कामातून थकला की या ठिकाणी जाऊन फिरून येऊ शकता. त्यामुळे निसर्गानं नटलेल्या डोंगरराजीतल्या या टुमदार गावात राहण्याचा आणि शेती शिकण्याचा हा विलक्षण अनुभव सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरतो.
इमारतींच्या जंगलातून बाहेर पडून तुम्हीही शेतक-याचं आयुष्य एकदा तरी अनुभवायला हरकत नाही. मस्त फिरण्याचा अनुभव तर मिळेलच, पण स्वत: शेतीचा अनुभव घेतल्यानं तुम्हाला त्यातून एखादी बिझनेस आयडियाही मिळू शकते.