काय झाडी, काय डोंगार...; पावसाळी पर्यटन एकदम ओक्के करायचे आहे ना?, येथे भेट द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 05:46 AM2022-07-03T05:46:42+5:302022-07-03T05:47:01+5:30
पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर थोडी वाकडी वाट करून, वेगळ्या पर्यंटनस्थळांकडे पहायला हवे.
तुषार म्हात्रे, पर्यटनप्रेमी, मुंबई
सुंदर झाडी, रमणीय डोंगर यांनी नटलेला मनमोहक निसर्ग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर विदेशातील स्थळे येतात. काही दिवसांपूर्वी ईशान्येकडील परिसरही अशाच नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी चर्चेत होता. पण हे ‘साजरे दुरचे डोंगर’ पाहण्यापूर्वी आपल्या अवतीभोवती सुद्धा तितकाच सुंदर निसर्ग आहे, याकडे आपले दुर्लक्ष होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर अशा अनेक प्रेक्षणीय जागा आहेत आणि पावसाळ्यांत तर अशा बहारदार जागांना शब्दश: बहर येतो. पावसाळी पर्यटनाच्या काळात अनेक पर्यटक विविध स्थळांना भेटी देतात. सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. यामुळे सुप्रसिद्ध स्थळांवर वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगच्या वाहनांच्या रांगा, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, वादावादी, कचरा, हलगर्जीपणा आणि अपघात असे प्रकार घडतात. हे टाळून पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर थोडी वाकडी वाट करून, वेगळ्या पर्यंटनस्थळांकडे पहायला हवे. सुंदर ‘झाडी-डोंगर’ असणाऱ्या महाड परिसरातील अशाच काहीशा स्थळांबाबत जाणून घेऊया.
सव
या थंड पण आल्हाददायक वातावरणात गरम पाण्याने स्नान करणे कोणाला आवडणार नाही? हे गरम पाणी निसर्गत:च मिळाले तर? फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तर आपल्यालाच या पाण्यापर्यंत पोहोचावे लागेल. मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ आल्यावर सावित्री नदीचा प्रवाह दिसू लागतो. या नदीपलीकडे जो हिरवागर्द परिसर दिसतो तिथे सव येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. होडीने नदी ओलांडून पलीकडे जायचे. गर्द झाडीतल्या पायवाटेने गेल्यावर आपण कुंडापाशी पोहोचतो. या कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा अतिशय स्वच्छ दर्गा आहे. जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान इथे ऊर्स असतो. कुंडाच्या तळाला नारळाचे खोड बसवल्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. यामुळे येथे, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास वस्ती असून, बहुतेक घरे मुस्लिम बांधवांचीच आहेत. इथे यायला आणखी एक वाट आहे, महाड-आंबेत रस्त्यावरून कच्च्या पायवाटेने गेल्यासही कुंडाशी पोहोचता येते. इथल्या नैसर्गिक उष्ण पाण्यात त्वचारोग बरे होतात, असे म्हटले जाते.
गांधारपाले
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागूनच डोंगरात ही बौद्ध लेणी आहेत. सरळ दिशेच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर हा लेणीसमूह पाहता येतो. चैत्यगृह, विहार असलेल्या लेण्यांच्या गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मूर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत. लेण्यांच्या समोरचे दृश्य केवळ अवर्णनीय. महामार्गालगतची सावित्री नदी आणि खाडीचा संगम वरून पाहता येतो. या नदीपात्रापलीकडे वसलेले महाड शहर आणि रमणीय परिसर पाहणे हा एक स्वतंत्र आनंदानुभव आहे. या लेणी परिसरातील लहान झऱ्यांचा आनंद लुटू शकता.
शिवथरघळ
निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम असलेले हे ठिकाण म्हणजे ‘शिवथरघळ’. महाडपासून तीस किमी अंतरावर ही घळ आहे. सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या वाघजई दरीच्या कुशीतील हे ठिकाण. काळ नदीच्या काठावर कुंभे शिवथर कसबे शिवथर, व आंबे शिवथर अशा तीन वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या गर्द झाडीने झाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या निसर्गरम्य सुंदर घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत. येथे जाण्यासाठी महाडवरून बस सुविधा आहेच. खाजगी वाहनाने थेट घळीच्या पायथ्याशी पोहोचता येते.
वाळणकोंड
सुुप्रसिद्ध शिवथर घळीपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा हा सुंदर परिसर म्हणजे ‘वाळणकोंड’. या डोहाला ‘वाळणकुंड’ किंवा ‘वाळणकोंडी’ असेही म्हटले जाते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उगम पावणारी काळ नदी डोंगरातून वाहत येत वाळण गावाच्या सपाटीला लागते. या नदीपात्राच्या खडकात पाण्याच्या प्रवाहामुळे एक मोठा डोह तयार झाला आहे. नदीपात्रातील रांजणकुंडांमुळे तयार झालेला तीस मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीचा हा डोह. डोहाच्या कडा इतक्या ताशीव की त्यात अडकलेल्या व्यक्तीला दोराशिवाय चढणे अशक्य व्हावे. खोलीही अथांग. उन्हाळ्याच्या दिवसांतही न आटणारा हा जलकुंड. रोज अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहावरील ब्रिटीशकालीन झुलत्या पुलावरून हा डोह पाहण्यासाठी येतात. यातील काहीजणांच्या हातात मुरमुरे असतात. पर्यटक निळ्याशार डोहामध्ये मुरमुरे टाकतात. अचानक पाण्याखाली थोडी हालचाल जाणवते. जलाचा पृष्ठभाग काळ्या-पांढऱ्या रंगाने चमकू लागतो. क्षणार्धात शेकडो मासे तरंगताना दिसतात.
पर्यटनस्थळी ही घ्या काळजी
जिथे जाणार आहात तेथील स्थळे सध्या सुरू आहेत का, याची चौकशी करावी. पावसाळी स्थळांच्या ठिकाणी अनेकदा खडकांवर शेवाळामुळे पाय घसरू शकतो, यासाठी चांगल्या प्रतीचे शूज घ्यावेत. दुचाकीने जाणार असाल तर गाडी काळजीपूर्वक चालवावी कारण रस्ते निसरडे असतात. महत्वाचे म्हणजे तिथल्या स्थानिकांना परिसराची चांगली माहिती असते, त्यांचा नक्की सल्ला घ्या. बाकी मस्त फिरा, झाडी डोंगर पहा. आनंद घ्या काळजी घ्या..