‘लझानिया’ एकदा खाऊन तर बघा !
By admin | Published: April 12, 2017 12:48 PM2017-04-12T12:48:35+5:302017-04-12T13:04:09+5:30
पिझ्झा आणि पास्ता हे कोणाला आवडत नाही. पण हे आणि एवढंच म्हणजे इटालियन फूड नाही. नुकताच लझानिया नावाचा इटालियन पदार्थ खाल्ला. पिझ्झा पास्ताप्रमाणे तोही खाणाऱ्याला वेड लावतो.
- भक्ती सोमण
मुलांच्या बाबतीत पालकांची नेहमी तक्रार असते. ती म्हणजे मुलं भाजी खात नाहीत. त्यामुळे आई मुलांनी भाज्या खाव्यात म्हणून निरनिराळ्या युक्त्या शोधून काढत असते. मग त्यात भाज्यांचे पराठे, कटलेट, घावन असे काय काय प्रकार आई करत असते. आता तर मुलांसाठी भाजी चवदार करण्याचा नवीन फंडा म्हणजे त्यात चीज घालायचं. सध्या असा चीजचा भरपूर वापर इटालियन पदार्थात होतो आहे. त्यामुळे पिझ्झा, पास्ता हे प्रकार मुलांना आवडतात.
इटालियन पदार्थांत भाज्यांचा मुबलक वापर केला जातो. त्यात ते पदार्थ चीज घालून केलेले असतात. तसेच क्रीमचाही भरपूर वापर केलेला असतो. इटालियन हर्ब्स, पार्सली, पांढरे-काळे मिरे, चिली फ्लेक्स हे घटक इटालियन पदार्थात मुख्यत्वाने वापरले जातात. याशिवाय रावियोली, पास्त्याच्या शीटपासून लझानिया, रातातुली, मोसाका, रिझोतो राईस असे अनेक प्रकार इटालियन जेवणात येतात.
नेहमीच पिझ्झा, पास्ता खाऊन कंटाळा आल्यानं यावेळी मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये गेले, तेव्हा लझानिया खाल्ला. लझानिया ही लांब शीट असते. त्या शीटमध्ये उकडलेला पालक, मशरूम, कांदा, लसूणचे सारण पसरवून त्यावर चीज मग पुन्हा लझानिया शीट घातली जाते. असे आणखी २-३ वेळा केलं जातं. सगळयात वर चीज घालून ही डिश मायक्रोव्हेवमध्ये किमान २० मिनिटं बेक केली जाते.
ही डिश खाताना चीजमुळे मजा तर येत होतीच पण थोडी टँगीही लागत होती. वेगळ्या पद्धतीनं तयार होणाऱ्या या इटालियन पदार्थांचं म्हणूनच लोकांना विशेष आकर्षण सध्या वाटतंय. आपल्याकडे जेवण करताना ज्याप्रमाणे मोहरी, हिंग, हळद, तिखट हे प्रकार वापरावेच लागतात त्याप्रमाणे इटालियन पद्धतीत प्रत्येक पदार्थांत चीज वापरणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं.
आपण खातो त्या चीजव्यतिरिक्त ३०० चीजचे प्रकार आहेत. पण रोजच्या वापरात साधारणपणे मॉझरेला, रिकोटा, पामेझान, प्रोसेड चीजेसचा वापर प्रामुख्यानं केला जातो. त्याचबरोबरीनं प्रत्येक पदार्थात टॉमेटो सॉस म्हणजेच कॉर्नकसे घालण्यालाही इटालियन पद्धतीच्या जेवणात फार महत्त्व आहे. कॉर्नकसेचे महत्व भारतीय पदार्थात ज्याप्रमाणे ग्रॅव्हीचे असते अगदी तसंच आहे.