प्रवासाला जायचं आणि आजारी पडून यायचं.. कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:49 PM2017-09-02T12:49:39+5:302017-09-02T12:52:17+5:30
प्रवासादरम्यान ही काळजी घ्या आणि ठेवा स्वत:ला फिट!
- मयूर पठाडे
प्रवासाला जायचं म्हणजे त्यासाठी अगदी देशाबाहेर किंवा खूप लांबच गेलं पाहिजे असं नाही. बºयाचदा आपल्या कामासाठीही अनेकदा आपला प्रवास होत असतो. काही जण तर नोकरीनिमित्तानं रोज अपडाऊन करीत असतात.
प्रवास कुठलाही असो, काही गोष्टींची नियमित काळजी घेतली गेली पाहिजे, नाहीतर आपल्याआरोग्यासाठी ते महागात पडू शकतं. कारण प्रवासादरम्यान इन्फेक्शन होण्याचं आणि आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं असतं.
प्रवासात काय काळजी घ्याल?
१- प्रवासात आपल्या खाण्याकडे नेहमीच व्यवस्थित लक्ष द्या, कारण दुषित अन्नपदार्थांमुळे आपल्या आरोग्याची वाट लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पोटदुखी, डायरिया, गॅसेस.. यासारखे आजार नेहमीच प्रवासाची देण असते.
२- प्रवासाच्या दरम्यान एक काळजी आवर्जुन घेता येईल, ती म्हणजे सातत्यानं आपले हात स्वच्छ धुणं. इन्फेक्शनची शक्यता त्यामुळे बरीच कमी होते.
३- प्रवासाच आपलं घरचं स्वच्छ पाणी कायम आपल्या बरोबर असावं. किमान घरातून निघताना तरी जेवढं पाणी आपल्याला आपल्यासोबत कॅरी करणं शक्य आहे, तेवढं नक्कीच घ्यावं. नंतर मिनरल वॉटर बोटल्सचा वापर करता येईल, पण कुठल्याही परिस्थितीत हॉटेल किंवा इतर ठिकाणंच पाणी पिण्याचा मोह टाळावा. पैसे जातील, पण आरोग्यासाठी शेवटी तेच उपयुक्त ठरेल.
४- प्रवासादरम्यान आपण नेहमी आळसावलेले असतो. प्रवासानं अंगदेखील आंबलेलं असतं. अशावेळी जितकं जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहाता येईल तितकं चांगलं. प्रवास संपल्यानंतर जिथे कुठे आपला मुक्काम असेल, त्या ठिकाणी किमान हलका व्यायामही अवश्य केला पाहिजे.
५- प्रवासात उन्हाची आणि पावसाची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाच्या तडाख्यानं आणि सातत्यानं पावसात भिजल्यानं आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो.
६- आपला प्रवास जर मोठा असेल, विशेषत: परदेशात जायचं असेल तेव्हा तर आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.