थंडीचा हंगामातच पक्षीवैभव अनुभवता येतं..तुम्ही काही प्लॅन केलं आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:40 PM2017-11-15T13:40:12+5:302017-11-15T13:51:25+5:30
इंडियन स्किमर, ग्रेटर स्पॉटेड इगल, पांढºया पाठीची गिधाडं या पक्षांनी ओडिशातल्या भितरकनिका अभयारण्यात आपला मुक्काम ठोकायला सुरूवातकेलीये. यांच्यासारखे अनेक पाहुणे अजून यायचे बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात अशा खास पक्षी अभयारण्यांची सैर करायला विसरु नका.
- अमृता कदम
हिवाळ्याच्या आगमनासोबतच थंड प्रदेशातून भारतात विविध ठिकाणी पक्षांचं स्थलांतरही सुरु होतं. हे पंखधारी पाहुणे आपलं खाद्य आणि निवारा शोधत भारताच्या विविध भागात पोहचतात. इंडियन स्किमर, ग्रेटर स्पॉटेड इगल, पांढ-या पाठीची गिधाडं यांनी तर ओडिशातल्या भितरकनिका अभयारण्यात आपला मुक्काम ठोकायला सुरूवातही केलीये. यांच्यासारखे अनेक पाहुणे अजून यायचे बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात अशा खास पक्षी अभयारण्यांची सैर करायला विसरु नका. हे पक्षी पाहण्यासाठी तुम्ही वैज्ञानिक, पक्षीनिरीक्षक असण्याची अट बिलकुल नाहीये. डोक्यावर मस्त हॅट चढवून, हातात दुर्बिण घेऊन बाहेर पडा. या रंगीबिरंगी दुनियेतले अनेक चमत्कार तुम्हाला या पक्षांच्या रु पानं पाहायला मिळतील.
सुलतानपूर पक्षी अभयारण्य ( हरियाणा)
या अभयारण्याला भेट द्यायचा उत्तम काळ आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे. गुरु ग्राममधल्या या अभयारण्यात अगदी सैबेरिया, युरोप,अफगाणिस्तानातून हजारहून अधिक प्रकारचे पक्षी या काळात कूच करतात. त्यात ग्रेटर फ्लेमिंगो, आशियाई कोकिळा, सैबेरियन यलो वॅगटेल, रोझी पेलिकन, युरोशियन विजन, असे विविध पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण अभयारण्य पहायला तुम्हाला दीड ते दोन तास लागतात.
भरतपूर पक्षी अभयारण्य (राजस्थान)
राजस्थानमधलं हे अभयारण्य जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. पक्षीनिरीक्षकांसाठी या काळात हे अभ्यासाचं एक प्रमुख ठिकाण बनतं. या ठिकाणी मुख्यत: मध्य आशियातून अनेकविध पक्षी हिवाळ्यात पोहचतात. या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे.
चिल्का सरोवर पक्षी अभयारण्य (ओडिशा)
भारतीय उपखंडात स्थलांतरित पक्षांच्या मुक्कामाचं हे सर्वात मोठं स्थळ आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. विशेषत: फ्लेमिंगोंच्या मुक्कामासाठी हे ठिकाण अधिक प्रसिद्ध आहे. अनेक जलचर पक्षीही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ब्लॅकबक, गोल्डन जॅकल यासारखे जंगली प्राणीही आढळतील. इथल्या प्रसिद्ध अशा चिल्का डॉल्फिनचं दर्शनही तुम्हाला इथेच होऊ शकतं. नानाप्रकारच्या पक्षांना पाहताना इथल्या नितांत सुंदर अशा निसर्गसौंदर्याची पाशर््वभूमीही असते, हे विशेष. खा-या पाण्याचा हा तलाव इथल्या मनोरम सूर्योदय आणि सूर्यासाठी ओळखला जातो. या अभयारण्याचा तुम्ही आॅक्टोबरपासून मार्चपर्यंत केव्हाही जाऊ शकता.
नल सरोवर पक्षी अभयारण्य ( गुजरात)
इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहे. नलसरोवर हे गुजरातमधलं सर्वाधिक दलदलीचं क्षेत्र लाभलेलं अभयारण्य आहे. दरवर्षी नोव्हेबर ते फेब्रुवारी या काळात 200 हून अधिक प्रकारचे पक्षी स्थलांतरासाठी येतात. इथल्या शाही पाहुण्यांच्या यादीत रोझी पेलिकन्स, फ्लेमिंगो, व्हाईट स्टॉर्क यांचा समावेश होतो. एकाच ठिकाणी इतक्या पक्षांची विविधता असल्यानं हे ठिकाण म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्गाहून कमी नाही.
रंगनिथट्टू पक्षी अभयारण्य ( कर्नाटक)
कावेरी नदीच्या काठावर वसलेलं हे पक्षी अभयारण्य कर्नाटकमधलं सर्वात मोठं पक्षी अभयारण्य आहे. डिसेंबरच्या मध्यापासून या ठिकाणी स्थलांतरित पक्षांच्या आगमनाला सुरूवात होते. जवळपास चाळीस हजारहून अधिक स्थलांतरित पक्षांचा मुक्काम या ठिकाणी होतो. यातले अनेक पक्षी हे अगदी लॅटिन अमेरिकेतूनही येतात. शिवाय उत्तर भारतातूनही काही पक्षांचं आगमन इथे होतं. जानेवारी ते सप्टेंबर या काळात तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता.
थट्टेकाड पक्षी अभयारण्य (केरळ)
नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत केव्हाही इथे भेट देता येते. नोव्हेंबर महिना सुरु झाला की हिमालयाच्या रांगेतून पक्षांच्या 40 विविध प्रजाती आणि 19 आंतरराष्ट्रीय प्रजाती केरळमधल्या या अभयारण्याच्या दिशेनं झेपावतात. सायबेरियन स्टॉर्क, पेन्टेड स्टॉर्क, कॉटन टील असे दुर्मिळ पक्षी तुम्हाला या अभयारण्यामध्ये पाहता येतात. सदाहरित आणि घनदाट झाडीनं नटलेला हा परिसर असल्यानं इथे पक्षांचा ओढा असणं साहजिक आहे. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सालीम अली यांनी या अभयारण्याचं वर्णन ‘the richest bird habitat in peninsular India’ असं केलेलं होतं. शिवाय कोकिळांचा स्वर्ग असंही या अभयारण्याला म्हटलं जातं. कारण विविध प्रकारच्या कोकिळा या अभयारण्यात पाहायला मिळतात.
केवळ शॉपिंग, हॉटेलिंग अशी तुमची पर्यटनाची व्याख्या नसेल तर पक्षीनिरीक्षणासाठी केलेलं पर्यटन हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.