‘द वुमेन दे सॉ’ जगभरातल्या स्त्रियांची घुसमट दाखवणारं एक आगळं वेगळं छायाचित्र प्रदर्शन
By admin | Published: June 14, 2017 06:49 PM2017-06-14T18:49:50+5:302017-06-14T18:49:50+5:30
जगभरातील महिलांच्या भावविश्वाचं, त्यांच्या जगण्याचं अस्वथ करणारा छायाचित्र प्रदर्शनाचा अनुभव अजूनही इंटरनेटवर घेता येतो.
- सारिका पूरकर- गुजराथी
एका मुलीचं एका पत्नीत, आईत रुपांतर झाल्यावर तिच्या स्वातंत्र्याला किती कात्र्या लावल्या जातात हे भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला नवीन नाही. मात्र जगभरातही काही देशांमध्येही स्त्रिया ही जोखडं नाकारु शकत नाहीत. फ्रान्स हा त्यापैकीच एक देश.
फ्रान्समध्येही जिप्सी संस्कृतीनं महिलांना नानाविध बंधनात जखडून टाकलय. आपल्याकडे जसे भटके-विमुक्त लोकं, तसेच हे जिप्सी. जादू-टोणा, भविष्य सांगणे, घोड्यांचा व्यापार, धातूकाम अशी कामं करणारी ही जमात. साहजिकच मागासलेली. तर अशा या जमातीतील महिलांना सतत सामाजिक, कौटुंबिक मुस्कटदाबी सहन करावी लागली आहे. मग या महिलांच्या मनात किती घालमेल असेल? स्वच्छंदी जगण्यासाठी त्यांना किती धडपड करावी लागत असेल? याचा धांडोळा फ्रान्सच्या नेऊस सोला या बार्सिलोनाच्या महिला छायाचित्रकारानं तिच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतला. तिला या महिलांचे जे भावविश्व दिसलं ते तिनं कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. त्या छायाचित्रांची एक मालिकाच तिनं तयार केली. नवी दिल्लीत इंटरनॅशनल वुमन फोटोग्राफर्स अॅवार्ड या छायाचित्र प्रदर्शनात ‘ द वुमेन दे सॉ ’ या संकल्पनेवर आधारित ही छायाचित्रं सादर करण्यात आली.
प्रदर्शनात स्त्रीचे आणखी एक गंभीर रुप आपल्या समोर येते ते इराणच्या सोहिला सानाम्नो हिच्या छायाचित्रातून. या छायाचित्रात सोहिलाचे प्रमुख पात्र आहे रोघाय्ये ही २६ वर्षीय महिला. रोघाय्येवर काही वर्षांपूर्वी पाशवी बलात्कार झालाय. या घटनेनंतर कुटुंबानं आणि समाजानं तिची सतत हेटाळणीच केली. त्यामुळे रोघाय्ये निर्जीव बाहुली बनून गेलीय. या छायाचित्रात ती एका टेबलखाली एकदम धास्तावून बसलेली टिपलीय. वर तिचा भाऊ कपडे शिवण्याचे काम करतोय, या भावाची मुलं सांभाळण्याची सक्ती रोघाय्येवर केली जातेय...
दुसरीकडे कुवेतच्या फराह सालेम हिनं स्त्रीची वेगळीच व्यथा मांडलीय. तिने तिच्या छायाचित्रात एका महिलेला एका बॉक्समध्ये (जणू पिंजराच) अडकल्याचं दाखवलय. आणि हा बॉक्स वाळवंट, समुद्रकिनारा येथे तिने ठेवलाय. या चित्रातून फराह सांगतेय, की समाजानं तर महिलांना नेहमीच प्रथा-परंपरेत अडकवून अस्तित्त्वहीन बनवलंय परंतु महिलांनीही स्वत:च्या मर्यादांना बांधून ठेवलंय. त्या स्वत:च मोकळ्या होऊ पाहत नाहीयेत. आणि ही बंधनं समाजानं घातलेल्या बंधनांपेक्षा जास्त हानीकारक आहेत...आणि हे छायाचित्र त्या प्रदर्शनामध्ये विजयी ठरले.
जगभरातील महिलांच्या भावविश्वाचं, त्यांच्या जगण्याचं हे प्रतिबिंब अस्वस्थ करणारं आहे, त्याचबरोबर नवी प्रेरणा देणारंही आहे. इंटरनेटवर ‘द वुमेन दे सॉ’ नावाचा सर्च टाका तुम्हाला यातली काही छायाचित्र पाहायला मिळतील!