World Tourism Day 2018: आता बजेटची चिंता सोडा; कमी पैशात 'या' ठिकाणांना भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:38 AM2018-09-27T11:38:46+5:302018-09-27T11:40:02+5:30
27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही.
27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही. त्यामागे अनेक कारणं असतात पण बहुतांशी वेळा आढळणारं मुख्य कारण म्हणजे बजेट. एखाद्या ठिकाणी फिरायला जाणं म्हणजे खिशाला कात्री लागणारचं, पण आता बजेटची चिंता सोडा आणि बिनधास्त फिरा. IRCTC तुमच्यासाठी एक खास संधी उपलब्ध करून देत आहे. IRCTC ची अनेक टूर पॅकेजेस आहेत ज्यांच्यामार्फत तुम्ही कमी खर्चात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकता.
3,365 मध्ये वैष्णव देवी यात्रा
IRCTC वैष्णव देवीची यात्रा करणाऱ्या पर्यटकांसाठी स्वस्त पॅकेज तयार केलं आहे. या टूरच्या पॅकेजची किंमत 3 हजार 365 रूपये आहे. या पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून करण्यात येणार आहे आणि यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पॅकेजमध्ये रेल्वे प्रवासासोबतच, नाश्ता आणि तिथे राहण्याचा खर्चही समाविष्ठ करण्यात आलेला आहे. या टूर पॅकेजसाठी कमीत कमी 2 व्यक्तींची बुकिंग करणं गरजेचं आहे.
9 हजार रूपयांमध्ये रामेश्वरमची यात्रा
हे पॅकेज 5 दिवस आणि 4 रात्रींचं असून याची सुरुवात विजयवाडापासून होणार आहे. या पॅकेजमध्येही ट्रेन आणि इतर प्रवास खर्चासह यात्रेदरम्यान एसी रूममध्ये राहण्याची व्यवस्थाही करण्यात येते. ट्रिपल ऑक्यूपेंसी म्हणजेच जर 3 लोकं या टूर पॅकेजमध्ये एकत्र जात असतील तर प्रति व्यक्ती 9 हजार 15 रूपये इतके पैसे द्यावे लागतील. दोन लोकांसाठी 11 हजार 385 रूपये लागतील.
10 हजार रूपयांमध्ये 7 ठिकाणं फिरा
10 रात्री आणि 11 दिवसांच हे पॅकेज फार कमी पैशात 7 ठिकाणांची सफर घडवून आणतं. आणि तेही फक्त 10 हजार 820 रुपयांमध्ये या टूरची सुरूवात मदुराईपासून होईल, यामध्ये तुम्ही भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनने माहाकलेश्वर, ओमकारेश्वर, जयपूर, पुष्कर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि पंढरपूरची यात्रा करवण्यात येते. ट्रेनच्या प्रवासाव्यतिरिक्त या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहणं आणि 3 वेळेचं खाणं, नाश्ता, दुपारचं जेवणं आणि रात्रीचं जेवणंही देण्यात येतं.
11 हजार रूपयांमध्ये गोवा फिरा
4 रात्री आणि 5 दिवसांच्या गोव्याच्या या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होते. ज्यामध्ये ट्रेनने मुंबई ते गोव्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. गोव्याच्या हॉटेलमध्ये राहणं, साइटसीइंग, मांडवी नदीवर बोट क्रूझने फिरणं, गोवाच्या जास्तीत जास्त बीचेसवर फिरणं आणि 3 वेळेचं जेवणंही या टूर पॅकेजमध्ये देण्यात येतं.
9,750 रूपयांमध्ये कुर्गची यात्रा
दक्षिण भारतामध्ये असलेल्या कुर्गला स्कॉटलँड ऑफ इंडियाच्या नावानेही ओळखले जाते. हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या टूर पॅकेजमध्ये रस्त्यामार्गे प्रवास करावा लागेल. पॅकेजची सुरुवाच बेंगळूरू पासून होईल. याव्यतिरिक्त हॉटेलमध्ये राहणं आणि खाण्या-पिण्याचा खर्चही यामध्ये समाविष्ट असेल.