लोहगडावरची गर्दी पाहिली असेलच! 'विकेण्ड ट्रेक' प्लॅन करताय?; मग हे एकदा वाचा!

By विराज भागवत | Published: July 7, 2023 06:33 PM2023-07-07T18:33:29+5:302023-07-07T18:34:56+5:30

आला पावसाळा, खुशाल सर करा किल्ला पण... स्वत:ला सांभाळा!

You must have seen the crowd on Lohgad Trek Fort so If you are Planning a weekend trek Then read this first | लोहगडावरची गर्दी पाहिली असेलच! 'विकेण्ड ट्रेक' प्लॅन करताय?; मग हे एकदा वाचा!

लोहगडावरची गर्दी पाहिली असेलच! 'विकेण्ड ट्रेक' प्लॅन करताय?; मग हे एकदा वाचा!

googlenewsNext

Lohgad Trek Viral Video: पावसाळा आणि पर्यटन हे एक समीकरण आहे. वीकेंडला पर्यटक बाहेर एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जातात. हल्ली तर पावसाळ्यात ट्रेकिंगला अक्षरश: ऊत येतो. शहरात किंवा रिसॉर्टवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सुटीच्या दिवशी आता किल्ल्यांवर गर्दी होऊ लागली आहे. लोहगडावर रविवारी हजारो पर्यटक चार तास अडकून पडले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. कळसूबाईवर देखील ट्रेकिंग करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. गडकिल्ल्यांवर येण्याचे आकर्षण वाढते ही बाब सकारात्मक आहे, पण त्याचा अतिरेक होत असल्याने मोठी दुर्घटनाही नक्कीच घडू शकते. या पार्श्वभूमीवर 'बाण हायकर्स'चे दिवाकर साटम यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला.



किल्ल्यांवर अचानक गर्दी का वाढली?
ट्रेकर्सचं प्रमाण वाढलं ही सकारात्मक गोष्ट आहे, पण टुरिस्ट आणि ट्रेकर यांच्यातला फरक आता लोक विसरत चालले आहेत. योग्य मार्गाने ट्रेकिंग केलं जात नाही. पूर्वी ट्रेकिंग हे संस्थात्मक पद्धतीचे होतं. पण आता याचा इव्हेंट व्हायला लागला आहे. याच्याकडे लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. ट्रेक आयोजित करून त्यातून पैसे कमावणे यात गैर काहीच नाही पण असे ट्रेक घेऊन जाणाऱ्या संस्थांनी थोडीशी जबाबदारी ओळखली पाहिजे.

ट्रेक लीडर्स, ट्रेकिंग संस्थांनी जबाबदारी ओळखली पाहिजे!
हरिहर, लोहगड, विसापूर, कळसूबाई अशा ट्रेकची सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे माझ्याकडेही बरेच लोक याच ट्रेकबद्दल विचारणा करत असतात. पण एका पॉईंटला आपल्याला देखील त्यांना नाही म्हणता आले पाहिजे. कारण प्रत्येक किल्ल्याची एक मर्यादा असते. ती आपणच पाळायला हवी. लोहगडाचा व्हिडीओ आपण पाहिला. तिथे ५ हजाराहून अधिक लोक गेले होते, पण त्या गडाची तितकी क्षमता नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. ट्रेक ग्रुप्सने जर बेजबाबदारपणे जास्तीत जास्त संख्या तिथे नेली तर एखाद्या दिवशी लोकल ट्रेनसारख्या चेंगराचेंगरीची घटना घडू शकते आणि त्यानंतर सरकार थेट त्या ट्रेकिंग साइटवरच बंदी घालेल. मग अशा वेळी आपण वैयक्तिक ट्रेकर्सना रोखू शकत नाही. पण संस्थात्मक ट्रेकिंग करणाऱ्यांनी मात्र काही नियम स्वत:ला घालून घेतले पाहिजेत.

ट्रेकिंग आणि पर्यटन यातला फरक समजून घ्या!
महाराष्ट्रात ३५० हून अधिक किल्ले आहेत. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये अनेक चांगल्या जागा आहेत. तेथील गोष्टींबाबत लोकांना नीट समजावून सांगायला हवे. ट्रेकिंग तुम्हाला घडवत असतं. त्यातून तुम्हाला बरंच काही शिकता येऊ शकतं. पण आजकाल बरेच लोकांना ट्रेकिंग कशासाठी करायचं हेच माहिती नसतं. फार कमी लोक असे असतात ज्यांना काही तरी शिकायचं असतं. ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. जसे आपण पहिली ते दहावी सर्व विषय शिकतो, तसं ट्रेकरदेखील सुरूवातील सर्व प्रकारच्या साईट्स एक्स्प्लोर करत असतो. मग दहावीनंतर आपण एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करतो तसे महत्त्वाचा विषय निवडतो, त्यानुसार ट्रेकरला सुरूवातीला काळ ट्रेकिंग केल्यावर समजते की त्यांना कशात रस आहे. त्यानुसार तो आपले ट्रेक निवडतो.

पावसाळ्यात ट्रेकिंगला जावे का?
पावसाळ्यात अभ्यासू ट्रेकर्सने किल्ल्यांवर जाऊ नये. कारण पावसाळ्यात किल्ल्यांचे बरेचसे अवशेष हिरवळीमुळे झाकले गेलेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही केवळ मज्जा करायला किंवा भिजायला जाऊ शकता. पावसाळ्यात निसर्ग जास्त छान दिसतो त्यामुळे पर्यटक तेथे जातातच. रिल्स किंवा फोटोग्राफी करण्याचा प्रत्येकालाच मोह होतो.

ट्रेकर्सना अभ्यासाची सवय लावा!
महत्त्वाची बाब अशी असते की बरेच लोकांना कल्पनाच नसते की त्या किल्ल्याचे महत्त्व काय, तेथे पाहण्यासारख्या बाबी काय, त्यामुळे अशा ठिकाणी नुसतीच गर्दी होते. अशा वेळी ट्रेकर्सना महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती देणे, त्यांना अवगत करणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला जाता तेव्हा तुम्ही ज्यांच्यासोबत जात असता त्यांना असे विचारले पाहिजे की- तुमच्या संस्थेकडे सुरक्षेची काय साधने आहेत? तुमच्याकडे आपात्कालीन स्थितीतील काही संपर्क आहे का? तुम्ही रोप वापरणार आहात का? असे प्रश्न विचारले जायला हवे. पण साधारणपणे लोक विचारतात की ट्रेकमध्ये जेवायला काय आहे? अशा वेळी ट्रेकिंग संस्थांनी या हौशी पर्यटकांना ट्रेकिंगबद्दल नीट समजावून सांगायला हवे आणि त्यांचे प्रबोधन करायला हवे. 

नियमन करायला हवे!
ट्रेकिंगला वाढणारी गर्दी पाहता ज्याप्रमाणे जंगल सफारीसाठी काही ठराविक प्रवाशांनाच एका दिवसात प्रवेश मिळतो, तसेच काहीसे गड-किल्ल्यांच्या बाबतीत करायला हवे. सर्वच गडकिल्ल्यावर हे शक्य नाही हे मलाही माहिती आहे. पण अंधरबन मध्ये ट्रेकिंग जेव्हा बंद करण्यात आले होते, त्यावेळी तेथील गावकऱ्यांनी पुढाकार घेत नियमन करून ट्रेकिंग सुरू ठेवण्याबाबत सांगितले. अशा पद्धतीने स्वयंशिस्त आणि स्वयंनियमनातून नक्कीच तुम्ही चांगले काम करू शकता.

पावसाळ्यात ट्रेकिंगच्या दृष्टीने कठीण किल्ले कोणते?
अलंग मदन कुलंग (अलंगड मदनगड कुलनगड) हा पावसाळ्यातील सर्वात कठीण ट्रेक मानला जातो. याचे कारण म्हणजे या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी तुम्हाला कडेकपाऱ्यांतून आणि दगडांचा आधार घेऊन चढाई (Rock climbing) करावे लागते. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी शेवाळ असल्याने या ट्रेक खूपच कठीण होतो. हल्ली पावसाळ्यात अलंग कुलन मदन वर चढाई करणं ही गर्वाची बाब मानली जाते. पण अशा रिस्क घेण्यानेच बरेच वेळा अपघात घडतात. कुठल्याही किल्ल्यावर आपण कधीही जाऊ शकतो, फक्त आपण वैयक्तिक स्तरावर किती सक्षम आहोत हे आपण ओळखलं पाहिजे, दुसऱ्याच्या भरवशावर ट्रेक करू नये. 

काय काळजी घ्यावी?
तुम्ही ज्या गोष्टी सक्षमपणे करू शकता त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. जर मी एखाद्या ट्रेकची तयारी केली आहे, तर किल्ल्यावर एखाद्या तलावात पोहोण्याचा मोह टाळला पाहिजे. राजमाचीच्या किल्ल्यावर मी ट्रेक करतो पण माझी पोहायची तयारी नाही, तर मी तलावात पोहण्याचा मोह टाळायलाच हवे. इगतपुरीच्या ट्रिंगलवाडी सारख्या ट्रेकला जाताना किंवा इतर कुठेही जाताना तुम्ही ज्यासाठी तयार आहात तितकंच साहस करा. प्रत्येक गोष्टीवर सरकारचं नियंत्रण असू शकत नाही. त्यामुळे तेथे तुम्हालाच स्वत:ची शिस्त पाळावी लागणार. कारण हा प्रकार वाढत गेला तर यातून नजीकच्या काळात खूप मोठी दुर्घटना घडू शकते आणि ती बाब कोणालाच परवडणारी नाही.

Web Title: You must have seen the crowd on Lohgad Trek Fort so If you are Planning a weekend trek Then read this first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.