तुम्हाला ‘चांगले पर्यटक’ व्हायचय का? मग हे मॅन्युअल वाचा आणि त्यातले नियम पाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:18 PM2017-09-09T15:18:29+5:302017-09-09T15:27:33+5:30
तुम्ही जिथे कुठे प्रवास करत असाल तिथला निसर्ग, तिथल्या संस्कृती आणि परंपरांचा मान ठेवा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या यजमानाला मान द्या,’ असं आवाहनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशनचे महासचिव तालिब रिफाई यांनी केलं आहे. जबाबदार पर्यटकांसाठीचं एक मॅन्युअल बनवलं आहे.
- अमृता कदम
तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का? या प्रश्नाचं उत्तर आपण सहजपणे ‘हो’ असंच देऊ. पण उत्तर देण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशन’नं जबाबदार पर्यटकांसाठीचं एक मॅन्युअल बनवलं आहे. त्याची नीट माहिती घ्या आणि त्यात सांगितलेल्या सगळ्या नियमांबद्दल तुम्ही काटेकोर असाल तरच स्वत:ला जबाबदार पर्यटक म्हणवून घ्या.
नियमांचं मॅन्युअल का?
तुम्ही जिथे जात आहात तिथल्या स्थानिक भाषेतले काही मोजके शब्द शिकून घ्या (आभारप्रदर्शनासाठी, काही प्रश्न विचारण्यासाठी, हॉटेलमध्ये आॅर्डर देण्यासाठी वगैरे), तुम्ही जी काही खरेदी कराल ती अत्यंत दुर्मिळ वनस्पती किंवा प्राण्यांना इजा करून बनलेली नसावी अशा लहान सहानच पण प्रवासात महत्त्वाच्या ठरणाºया गोष्टी नमूद केलेलं ‘ट्रॅव्हल, एन्जॉय अॅण्ड रिस्पेक्ट’ हे हॅण्डबुकच वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं प्रसिद्ध केलं आहे.
यंदाच्या समर सीझनमध्ये अनेक युरोपियन देशांत पर्यटक आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जबाबदार पर्यटनाची जाणीव विकसित करण्याची निकड भासू लागली. इटली आणि स्पेनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक यायला लागल्यानंतर स्थानिकांनी पर्यटनविरोधी मोहिमच उघडली. शिवाय शहरांमध्ये बेबंद पर्यटकांमुळे होणारे वाद आणि नुकसान याचाही राग या लोकांच्य मनात होता. स्पेनच्या बार्सिलोना शहरांत तर अनेक भिंतींवर 'tourists go back' आणि 'stop destroying our lives' अशा घोषणाही खरडल्या होत्या.
आपल्या शहरातील सुंदर ठिकाणांची नासधूस होऊ नये, लोकांनी वाट्टेल तसा धुडगूस घालू नये यासाठी इटलीमधल्या फ्लोरेन्स, रोम, मिलान, त्युरिन या शहरांनी अनेक गोष्टींवर चक्क बंदीच घालून टाकली. रात्री उशीरा रस्त्यांवर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं, खाद्य पदार्थांचे बाहेरु न येणारे ट्रक, शहरातल्या ऐतिहासिक वास्तू आणि कारंज्यांसमोर हातगाड्यांवरचे पदार्थ आणि पेयं विकण्यावर बंदी असे एक ना अनेक प्रतिबंध इटलीमधल्या शहरांनी लागू केले.
या घटनांनीच वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशनला पर्यटकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करु देणं गरजेचं वाटलं. ‘तुम्ही जिथे कुठे प्रवास करत असाल तिथला निसर्ग, तिथल्या संस्कृती आणि परंपरांचा मान ठेवा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या यजमानाला मान द्या,’ असं आवाहनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशनचे महासचिव तालिब रिफाई यांनी केलं आहे.
ही जबाबदार पर्यटनाची मोहीम जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये राबवली जाईल.
तुम्ही या मोहीमेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते जाणून घ्या. जर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही योग्य प्रकारे पालन करत असाल तर एक उत्तम पर्यटक म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही.
मॅन्युअलमधले नियम काय सांगतात?
1. तुमच्या यजमान देशाचा आणि त्या देशासोबतच्या आपल्या समान सांस्कृतिक धाग्यांचा सन्मान करा.
2. जिथे जात आहात तिथल्या भाषेतले काही ठराविक शब्द आवर्जून शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला स्थानिक लोकांशी जवळीक साधता येईल. त्यांचं मन तुम्ही जिंकून घेऊ शकाल.
3. तिथल्या लोकांचे भराभर फोटो घ्यायला लागू नका. फोटो काढण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्या. त्यांच्या खासगीपणाला मान देण्याची ही एक योग्य पद्धत आहे.
4. शक्यतो इको-फ्रेंडली गोष्टींचीच खरेदी करा.
5. पाणी आणि ऊर्जेची बचत करण्याचा प्रयत्न करा.
6. संरक्षित ठिकाणी फिरताना पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या जागांनाच भेट द्या, इथे-तिथे घुसण्याचा प्रयत्न करु नका.
7. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग हा पर्यटनावर अवलंबून असतो. त्यामुळेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तिथलेच हॅण्डीक्र ाफ्ट्स आणि उत्पादनं खरेदी करा. फार घासाघीस न करता त्या कलाकारांच्या मेहनतीचा मान ठेवत योग्य ती किंमत द्या.
8. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ज्या वस्तूंवर बंदी घातली गेली आहे, त्यांची खरेदी करु नका.
9. आरोग्य आणि सुरक्षिततेसाठीची योग्य काळजी घ्या. आणीबाणीच्या काळात वैद्यकीय मदत कशी मागवायची किंवा आपल्या दूतावासाशी कसा संपर्क साधायचा याची अगोदरच माहिती घ्या.
10. त्या-त्या देशातील काही मूलभूत कायदे आणि नियमांची माहिती करु न घ्या. मानवी हक्कांची कोणत्याही प्रकारे पायमल्ली होईल, अशी कृती करु नका.
आपल्या आनंदासाठी इतरांना कोणताही त्रास न देणं इतकी साधी बाब या जबाबदार पर्यटनाच्या मुळाशी आहे. हे एक पथ्यं जरी सांभाळलं तरी इतर नियम घोटण्याची तुम्हाला फार गरज पडणार नाही.