अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस वाढदिवस साजरा करण्यासाठी टोकियोला गेली. टोकियोबद्दल वाचाल तर तुम्हालाही जावंसं वाटेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:10 PM2017-08-12T18:10:12+5:302017-08-12T18:22:42+5:30

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनं आपला वाढिदवस साजरा करण्यासाठी जपानची राजधानी टोकियोची निवड केली. कारण इथे जितका वेग आणि आधुनिकता आहे, तितकीच परंपरा जपण्याची असोशीही. हा अनुभव प्रत्येकानच घेवून पाहावा असा!

You want to know why Jackline Fernandis choose Tokyo for celebrating her birthday | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस वाढदिवस साजरा करण्यासाठी टोकियोला गेली. टोकियोबद्दल वाचाल तर तुम्हालाही जावंसं वाटेल.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस वाढदिवस साजरा करण्यासाठी टोकियोला गेली. टोकियोबद्दल वाचाल तर तुम्हालाही जावंसं वाटेल.

googlenewsNext
ठळक मुद्दे* टोकियोमधलं सर्वांत पुरातन आणि त्यामुळेच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेलं मंदिर आहे हे. या मंदिरात बौद्धधर्मांतील कानोन देवीची सोन्याची मूर्ती आहे.* जर तुम्ही जानेवारी, मे किंवा सप्टेंबर महिन्यात जपानला गेलात तर तुम्हाला टोकियोमध्ये सुमोंच्या कुस्तीच्या तब्बल 15 दिवस चालणार्या  स्पर्धा पाहायला मिळू शकतात.* आख्ख्या जगात जर न वितळणारं आइस्क्रीम  कुठे मिळत असेल तर ते जपानमध्ये.

 

- अमृता कदम

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आपला वाढिदवस साजरा करण्यासाठी रवाना झाली ते थेट जपानची राजधानी टोकियोला. ट्विटर, इन्स्टाग्रामवर जॅकीचे मस्तीच्या मूडमधले फोटो दिसताहेत. त्याचबरोबर पाहायला मिळतोय टोकियोचा नजाराही. आशियाई देशातलं टूरिझम म्हटलं की पटकन आठवतात ते म्हणजे सिंगापूर, थायलंड, मलेशिया हे छोटे छोटे देशच. पण जॅकलीनच्या या व्हेकेशनचे फोटो बघून तुम्हालाही जर जपानला फिरायला जावंसं वाटत असेल तर तुमच्यासाठी टोकियोमधल्या काही मस्ट व्हिजिट’ठिकाणांची खास माहिती.

सेन्सो-जी

टोकियोमधलं सर्वांत पुरातन आणि त्यामुळेच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेलं मंदिर आहे हे. या मंदिरात बौद्धधर्मांतील कानोन देवीची सोन्याची मूर्ती आहे. इसवी सन 628मध्ये ही मूर्ती दोन कोळ्यांना सापडली होती. या मंदिराचा जीर्णोद्धार 1649मध्ये करण्यात आला असून त्याच्या बाहेरच्या भिंतींना सुरेख लाल रंगात रंगवलं गेलं आहे. जपानमधील प्राचीन आणि नंतरच्या काळात दुर्मिळ झालेल्या इडो स्थापत्यशैलीचा हे मंदिर एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या प्राचीनपणामुळेच कदाचित त्याच्याबद्दलच्या अनेक दंतकथा जपानमध्ये प्रचलित आहेत.

टोकियो नॅशनल म्युझियम

या संग्रहालयात जपानमधल्या कला, संस्कृती आणि इतिहासाशी जोडलेल्या वस्तुंचं जगातील सर्वांत मोठं कलेक्शन आहे. मातीकाम, बौद्धकालीन मूर्तीकला, सामुराई सरदारांच्या तलवारी, किमोनो आणि इतरही बर्याच खास जपानी शैलीतल्या वस्तूंमधून तुम्हाला या देशातील लोकांचा इतिहास आणि संस्कृतीचं आकलन होईल.

रोगोकु कोकुगिकान

जपान म्हटलं की आपल्याला तिथले अवाढव्य सुमो हटकून आठवतातच. रोगोकु कोकुगिकान हे या सुमोंच्या लढतीचं जपानमधलं सर्वांत मोठं स्टेडिअम आहे. जर तुम्ही जानेवारी, मे किंवा सप्टेंबर महिन्यात जपानला गेलात तर तुम्हाला टोकियोमध्ये सुमोंच्या कुस्तीच्या तब्बल 15 दिवस चालणार्या स्पर्धा पाहायला मिळू शकतात. पण या स्पर्धा पाहताना तुम्हाला जर समालोचनही ऐकायचं असेल तर तुम्हाला इथे मिळणारा एक रेडिओ घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमधून समालोचन ऐकता येईल.

कोईशिकावा कोराक्युएन

हा सतराव्या शतकात बांधला गेलेला बगीचा शहरातला सर्वांत सुंदर बगीचा म्हणून ओळखला जातो. चीनी आणि जपानी लॅण्डस्केपचा अनोखा संगम इथे तुम्हाला पहायला मिळतो. या बागेत फेरफटका मारत असताना एनगेस्तू-क्यो (पूर्ण चंद्राचा पूल) आणि लाकडाचा असलेला स्युतेन-क्यो या दोन पुलांना भेट द्यायला अजिबात विसरु नका. अर्थात, या बागेचं सौंदर्य खर्या अर्थानं अनुभवायचं असेल तर चेरी ब्लॉसमच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये जायला हवं. चेरीचा बहर पाहाण्यासाठी जगभरातून पर्यटक या काळात जपानची वाट धरतात.

 

क्रूझिंग

सतराव्या शतकात शोगुन घराण्यातल्या राजा टोकुगावा इवासूने टोकियोमध्ये वाहतुकीसाठी कालवे बांधले. व्यापार आणि वाहतुकीबरोबरच एक मनोरंजनाचं केंद्र म्हणूनही हे कालवे हळूहळू विकसित होऊ लागले. इथे वेगवेगळ्या जलक्रीडांचं आयोजन होऊ लागलं. सध्या या कालव्यांमुळे टोकियो हे ‘क्रूझिंग डेस्टिनेशन’ म्हणूनही मान्यता पावत आहे. तर इथल्या स्थानिक नागरिकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीनं आजही या कालव्यांचं महत्त्व कायम आहे.
 

फिश आणि आइस्क्रीमची ट्रीट

अख्ख्या जगात जर न वितळणारं आइस्क्रीम कुठे मिळत असेल तर ते जपानमध्ये. काही शेफच्या पाककलेत झालेल्या चुकीतून म्हणा किंवा अपघातातून म्हणा या आइस्क्रीमचा ‘शोध’ लागला. टोकियोला आल्यावर जपानी भाषेत ‘फुगू’ म्हणून ओळखल्या जाणार्या माशाचीही चव घेऊन बघायलाच हवी. जगातील माशांच्या सर्वांत विषारी प्रजातींपैकी एक म्हणजे फुगू मासा. पण तरीही जपानमध्ये तो आहाराचा एक भाग बनून येतो. उगीच नाही जगभरातल्या लोकांना जपानी माणसाबद्दल कुतूहल वाटत!

शॉपिंग

टोकियोमध्ये तुम्हाला हटके, पारंपरिक, अत्यंत महागड्या, ब्रॅण्डेड अशा सर्व तर्हेच्या वस्तू पहायला मिळतात. इथली पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली मार्केट म्हणजे गिंझाचं डोव्हर स्ट्रीट मार्केट, बाहुल्या आणि जपानी मिठाईसाठी कागुराझाका मार्केट, महागड्या शोरु मध्ये खरेदीसाठी रोप्पोंगी मार्केट तसंच नाका-मेग्युरो मार्केट आहे.
आपले खास क्षण साजरा करण्यासाठी सेलिब्रेटी बीच लोकेशन्स, आर्यलण्ड, पर्वतरांगातली निसर्गरम्य ठिकाणं निवडतात. पण जॅकलीननं सतत कामामध्ये बुडालेल्या जपानमधलं टोकियोसारखं गजबज आणि गर्दीचं ठिकाण निवडलं. कारण इथे जितका वेग आणि आधुनिकता आहे, तितकीच परंपरा जपण्याची असोशीही. म्हणूनच जपान आणि जपानी लोकांच्या या परस्परविरोधाचा मेळ घालण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही तुमच्या सुटीसाठी टोकियोला पसंती द्यायला हरकत नाही.

 

Web Title: You want to know why Jackline Fernandis choose Tokyo for celebrating her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.