व्यायाम करताय ? चाला, अस्वलाची चाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:57 PM2020-06-08T17:57:06+5:302020-06-08T17:58:14+5:30
बेअर क्रॉल
काय मग? जंगली आणि पाळीव प्राण्यांशी तुमची दोस्ती झाली की नाही?
कोणते प्राणी आणि कोणत्या प्राण्याचा व्यायाम तुम्हाला जास्त आवडला?
आज मी तुम्हाला जंगलातल्या सर्वात डेंजर प्राण्याची माहिती आणि त्याच्या व्यायामाविषयी सांगणार आहे. जंगलातला सर्वात डेंजर प्राणी (अर्थात माणसासाठी) म्हणजे अस्वल. जंगल अभ्यासकही नेहमी या प्राण्यापासूनच सांभाळून राहायला सांगतात.
या प्राण्यात एकतर ‘येडी’ ताकद असते आणि डोकं थोडंसं कमी. म्हणजे सणकी. जंगली अस्वलाच्या कचाटय़ात सापडलं, तर आपल्या केसाळ पंज्यात लपलेल्या धारदार नख्यांनी तो माणसाचं मांस थेट हाडांर्पयत; अगदी कवटीही सोलून काढू शकतो. अस्वलं तशी बोजड असतात. पाय छोटे असतात. त्याला दिसतं कमी, पण तब्बल दीड किलोमीटरवरचा वास त्याला कळू शकतो.
आज अस्वलाचा, ‘बेअर क्रॉल’ हा व्यायाम आपल्याला करायचा आहे.
कसा कराल हा व्यायाम?
1- अस्वल जसं आपल्या चारही पायांवर उभं राहतं, तसं आपले दोन्ही पाय आणि दोन्ही हात जमिनीवर टेकवा.
2- ढुंगणं थोडं उंच करा. ढुंगण पाठीच्या वर असलं पाहिजे. पोट थोडं आत घ्या.
3- दोन्ही हातांत खांद्याइतकं अंतर घ्या.
4- नजर समोर.
5- आधी उजवा हात आणि डावा पाय पुढे घेत एक पाऊल टाका.
6- आता डावा हात आणि उजवा पाय.
7- चाला अशा पद्धतीनं.
यामुळे काय होईल?
1- तुमच्या शोल्डरमधली ताकद वाढेल.
2- पाठ मजबूत होईल.
3- पोटाचे मसल्स तयार होतील.
4- मांडय़ांचे स्नायू बळकट होतील.
5- हात दणकट होतील.
अस्वलाची ही चाल सुरुवातीला जमणार नाही, अवघड वाटेल, पण एकदा का ही चाल तुम्हाला जमायला लागली, की मग बघा, तुमची ‘नखं’ कशी बाहेर येतील ते!.
- तुमचीच जंगली ‘सोलकढी’, ऊर्जा