गुबगुबीत सशासारख्या उडय़ा मारून पाहा; म्हणजे कळेल काय ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:11 PM2020-06-03T13:11:15+5:302020-06-03T13:11:32+5:30

बनी हॉप्स.

bunny hops- do it home -exercise. | गुबगुबीत सशासारख्या उडय़ा मारून पाहा; म्हणजे कळेल काय ते!

गुबगुबीत सशासारख्या उडय़ा मारून पाहा; म्हणजे कळेल काय ते!

Next
ठळक मुद्देआज आपण हाच व्यायाम करू. याला म्हणायचं ‘बनी हॉप्स’ म्हणजे सशाच्या उडय़ा.

मला ससा फार आवडतो. कसा मस्त पांढराशुभ्र आणि गुबगुबीत! अर्थात ससे काही फक्त पांढऱ्या  रंगाचेच असतात, असं नाही, पण आपण बऱ्याचदा पाहतो, तो ससा पांढऱ्या  रंगाचाच असतो.
सशांना चालताना तुम्ही कधी पाहिलं आहे?- त्याचं चालणं म्हणजे उडय़ा मारणंच असतं. ससा म्हणजे मुलुखाचा भित्र. लहानपणी तुम्ही सशाची ती गोष्ट ऐकलीच असेल. पण सशाच्या खऱ्या  गोष्टीही ऐकायला तुम्हाला फार आवडेल.
तुम्हाला माहीत आहे, ससा एवढा चपळ का आहे? आणि अगदी बारीकशीही चाहूल त्याला कशी काय लागते?
- कारण सशाला जवळपास चारही बाजूंचं दिसतं. त्यामुळे त्याला पकडणंही फार अवघड असतं. एकाचवेळी सगळीकडचं त्याला दिसत असलं तरी अगदी नाकासमोरचं मात्र त्याला दिसत नाही. सशाचे कान आणि नाकही अगदी तीक्ष्ण असतात. वासावरुनही अनेक गोष्टी तो सहज ओळखतो. त्याच्या मिशा त्याच्या शरीराच्या रुंदीएवढय़ा असतात. का माहीत आहे? - समजा एखादं बीळ दिसलं, तर त्या बिळात आपण जाऊ शकू की नाही, हे त्याला आपल्या मिशांवरुन कळतं. आपल्या गोष्टीतल्याप्रमाणोच ससा तसा झोपाळू प्राणी आहे. दिवसातून किमान आठ ते दहा वेळा तो मस्तपैकी ताणून देतो.
ससा भित्री भागूबाई असला, तरी तो पळतो मात्र दणक्यात. त्याच्या या पायांमुळेच त्याला आपल्या शत्रूपासून संरक्षण करणं शक्य होतं. 
सशाच्या रंगरुपाकडे जाऊ नका, त्याच्यासारख्या उडय़ा मारून पाहा, नाही नानी आठवली तर माझं नाव दुसरं! आज आपण हाच व्यायाम करू. याला म्हणायचं ‘बनी हॉप्स’ म्हणजे सशाच्या उडय़ा.
कसा कराल हा व्यायाम?
1- गुडघ्यात वाकून उभे राहा. फार जास्तही नाही आणि फार कमीही नाही.
2- पाठ ताठ ठेवा.
3- दोन्ही हात कोपरात वाकवून ससा उभा राहतो तसं उभे राहा.
4- याच स्थितीत आता मारा उडय़ा.
5- हा व्यायाम आणखी चॅलेंजिंग करायचा असेल, तर जास्त लांब उडी मारा. 
6- आपल्याला जमेल तेवढय़ाच उडय़ा मारा, पण सुरुवातीला जास्त बिलकूल नको
यामुळे काय होईल?
1- पायांची, मांडय़ांची ताकद वाढवण्यासाठी हा टेरिफिक व्यायाम आहे.
2- लोअर बॉडीसाठीही हा एकदम हटके  व्यायाम आहे. 
3- तुमच्या शरीराची मोबिलीटीही त्यामुळे वाढेल.
माराल मग या सशाच्या उडय़ा?
बघा मारून आणि सांगा मला काय झालं ते?  चालता, बसता आलं का ते? 
- तुमचीच ‘सस्सूबाई’, ऊर्जा

Web Title: bunny hops- do it home -exercise.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.