सतत तुमची चिडचिड होत असेल, तर हे घ्या त्यावरचं उत्तर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:03 PM2020-06-03T13:03:23+5:302020-06-03T13:03:42+5:30
.. तरी बरं!
तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीच तुमच्या मनासारखं होत नाही? म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला होता, पण नेमकं परीक्षेच्या वेळी बरं नव्हतं म्हणून चांगले मार्क्स मिळाले नाहीत.. किंवा तुम्ही खरंच गृहपाठ केला होता, पण तुम्ही खरंच वही घरी विसरलात आणि मग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली.. किंवा तुम्ही लग्नाला जाण्यासाठी तुमच्या सगळ्यात आवडत्या नवीन ड्रेसला इस्त्री करायला घेतलीत आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि त्या गडबडीत नेमकं त्याचं वरचं नेट जळलं आणि आता तो घागरा तुम्ही घालू शकत नाही..
जाऊदे. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत सारख्या घडत असतात आणि त्यामुळे आपली त्या त्या वेळी भयंकर चिडचिड पण झालेली असते. आणि सारखं सारखं असं व्हायला लागलं की आपल्याला वाटतं, की अश्या सगळ्या गोष्टी फक्त माङयाच बाबतीत होतात. इतर सगळ्यांचं सगळं छान होतं. मलाच फक्त हवं तसं काही होत नाही. आणि मग आपणही प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायला लागतो. पण आपल्याला जरी असं वाटत असलं तरी ते काही खरं नसतं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात हेही खरं नसतं आणि आपल्या बाबतीत सगळं वाईटच घडतं हेही खरं नसतं. पण ज्यावेळी काहीतरी असं मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते हँडल कसं करायचं ते आपल्याला कळत नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. आणि त्यावरचं उत्तर आहे, तरी बरं!
प्रत्येक वेळी असं काही तरी झालं की त्याहून काय वाईट घडलं असतं त्याचा विचार करायचा आणि स्वत:ला सांगायचं की, ‘तरी बरं, इतकं वाईट काही घडलं नाही!’
म्हणजे सगळ्यात आवडता नवीन घागरा खराब झाला, तरी बरं, दुसरा एखादा ड्रेस घालायला होता. एकच ड्रेस असता तर मी लग्नात काय घातलं असतं? असा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कमी त्रस होतो.
परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का?