मी दहावीत गेलेय, शाळा लवकर सुरु झाली नाही तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:15 PM2020-05-25T13:15:48+5:302020-05-25T13:15:53+5:30
.. मी दहावीत गेलेय, आणि आता मला खूप टेंशन आलंय अभ्यासाचं, मी काय करू?
मी आता दहावीत गेले आहे. सुट्टीत क्लास लावायचा होता पण लॉक डाऊनमुळे कुठलाच क्लास लावता आलेला नाही. शाळाही लवकर सुरु झाली नाही तर? अभ्यासाचं मला टेन्शन आलंय, मी काय करू?
- अक्षिता माळी, सोलापूर
अक्षिता तू आधी टेन्शन घेऊ नकोस. एक लक्षात घे, शाळा उशिरा सुरु झाली तर दहावीची परीक्षाही उशिराच होईल. तुम्हा मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ न देता परीक्षेचं वेळापत्रक तर नक्कीच लावलं जाणार नाही. शिवाय समजा तुला किंवा दहावीतल्या इतरही मुलांना आता शाळा आणि क्लास कुठेच जाता येत नाहीये तरीही दहावीची पुस्तकं तर बोर्डाने ऑनलाईन पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. ती तू नुसती वाचून काढू शकतेस ना? प्रश्न-उत्तर पाठ केली म्हणजे अभ्यास झाला असं कुठेय, पाठ्यपुस्तकांकडे महिती देणारी, इंटरेस्टिंग पुस्तकं म्हणून बघ आणि धडाधड वाचून काढ. एकदा नाही दोन चार वेळा. मग बघ जेव्हा केव्हा अभ्यासाला शाळेत सुरुवात होईल , तेव्हा तुला वर्गात गोष्टी किती पटापट समजतील. शिवाय आताच्या या वेळेचा उपयोग तुला पुढे काय शिकायची इच्छा आहे ठरवण्यासाठी तू करू शकतेस. वेगवेगळ्या विषयांची माहिती घे. त्यातले जे विषय तुला आवडत असतील त्यांची अधिक माहिती घे. पेपर वाच. तुङयाकडे इंटरनेट असेल तर अनेक विषयांवर ऑनलाईन कोर्सेस असतात ते कर. समजा तुला इतिहासाची आवड असेल, विज्ञानाची आवड असेल तर मुलांसाठीही अनेक कोर्सेस आहेत त्यांची माहिती घे. एखादा छोटा कोर्स करून बघ.
किंवा काही शिकायलाच हवं असंही नाहीये. ऑनलाईन जाऊन सोशल मीडियावर टाईमपास करण्यापेक्षा तिथे खूप काही वाचायला असतं ते शोध आणि वाचून काढ. या वेळेचा वापर दहावीनंतर काय यासाठी कसा करता येईल याचा विचार करून बघ.
हेच कर असं नाही. हे फक्त पर्याय आहेत. टेन्शन घेऊन काहीच होणार नाही, त्यापेक्षा पुढे काय होईल हे बघता येईल आत्ताचा वेळ मस्त घालव.